नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रे
तळ्यामधील मत्स्य संवर्धनात असुधारित मत्स्यसंवर्धन, निमसुधारित मत्स्यसंवर्धन आणि सुधारित मत्स्य संवर्धन केले जाते.
मत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तसेच रासायनिक गुणधर्मात सामू, सेंद्रिय कार्बन, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद हे महत्त्वाचे घटक तपासावेत. तळ्यामधील मत्स्य संवर्धनात असुधारित मत्स्यसंवर्धन, निमसुधारित मत्स्यसंवर्धन आणि सुधारित मत्स्य संवर्धन केले जाते.
मत्स्यसंवर्धन करताना सर्वप्रथम कोणत्या अडचणींना सामारे जावे लागेल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. मत्स्यसंवर्धन म्हणजे तलावातील पाण्यात अनुकूल वातावरण निर्माण करून प्रामुख्याने छोट्या तळ्यामध्ये कार्प मासे, देशी मांगूर, मरळ, गिफ्ट तिलापिया, पंकज, पाबदा, शिंगी इत्यादी माशांचे संवर्धन केले जाते. याचबरोबरीने गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन, शोभिवंत माशांचे संवर्धन, निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी व इतर माशांचे संवर्धन अशा निरनिराळ्या प्रकारे करता येते. कार्प जातीच्या माशांचे संवर्धन वेगवेगळ्या आकारमानाच्या तलावात करता येते.
तळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनात विविध पद्धती आहेत. तळ्यामधील मत्स्य संवर्धनात असुधारित मत्स्यसंवर्धन, निमसुधारित मत्स्यसंवर्धन आणि सुधारित मत्स्य संवर्धन केले जाते. असुधारित पद्धतीमध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध खाद्य मासे ग्रहण करीत असतात. पारंपरिक मत्स्यशेतीमध्ये पूरक खाद्याचा वापर न करता कमी खर्चिक सेंद्रिय व असेंद्रिय खताचा वापर करतात.
निमसुधारित मत्स्य संवर्धन पद्धत ः
१) वेगवेगळ्या हवामानात विविध ठिकाणी निमसुधारित मत्स्यसंवर्धन पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये खतांच्या वापरासोबत पूरक खाद्यदेखील माशांना पुरविले जाते.
२) या पद्धतीमध्ये तळ्याची तयारी, संचयन घनता, खतांचा पुरवठा, नियमित पूरक खाद्य इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरतात.
३) पूरक खाद्य बनविताना स्थानिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेले घटक उदा. शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड, भाताचा कोंडा, गव्हाचे पीठ इत्यादींचा योग्य प्रमाणात वापर करतात. वरील घटकांचे मिश्रण करताना प्रथिनांची मात्रा २५ ते ३० टक्के राहील याची काळजी घेतली जाते.
४) तलावाची खोली साधारण १.५ ते २ मीटर असावी. मत्स्य बोटुकलीची संचयन घनता (१० ते १५ ग्रॅम वजन) ५००० ते ७५०० प्रति हेक्टर एवढी ठेवतात.
सुधारित मत्स्य संवर्धन पद्धती ः
१) कमी जागेत माशांचे जास्त उत्पादन मिळण्यासाठी संचयन घनता अधिक ठेवली जाते. माशांना जास्त प्रमाणात पूरक खाद्य खाण्यासाठी पुरविले जाते. माशांना प्राणवायू मिळण्यासाठी या पद्धतीमध्ये एरीएटरदेखील वापरले जाते.
२) मत्स्य संवर्धन करताना योग्य जागेची निवड करणे हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी पाणी धरून ठेवणारी जमीन, गाळाची किंवा काळी माती असलेली जमीन, चिकण माती असणारी जमीन योग्य ठरते.
३) निवडलली जागा साधारणपणे अल्कधर्मी (सामू ७.५ ते ८) असावी. तळे बांधण्यापूर्वी पूर परिस्थिती, पर्जन्यमान, पाण्याचा निचरा इत्यादी बाबींचा विचार करावा.
४) मत्स्य संवर्धन करण्यासाठी सुमारे क्षेत्रफळ ०.४ ते १.० हेक्टर आकारमानाचे तळे असावे. संवर्धन तलावाची उंची १.५ ते २ मी व बांधाचा पाया १.५ मी रुंद असावा. बांधाच्या उताराचे प्रमाण १:१.५ एवढे असावे.
मत्स्य संवर्धनाचे टप्पे ः
१) मत्स्य संवर्धन सुरुवात करण्याअगोदर तलाव उन्हाळ्यात पूर्णपणे सुकवून घ्यावा. तळे सुकविल्यामुळे तळ्यातील उपद्रवी मासे व इतर अनावश्यक जिवाणू व प्राण्याचा नाश होतो, त्याबरोबर मातीची उत्पादकता वाढते.
२) तळ्यामध्ये मत्स्यबीज संवर्धनापूर्वी चुना वापरल्याने तलावाच्या तळाशी साचलेले विषारी वायू नाहीसे होतात. आम्ल निर्देशांक वाढून तो स्थिर राहण्यास मदत होते. तळ्यातील पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवगांची वाढ योग्य प्रमाणात होते. तसेच मत्स्य बीजाला रोग होण्याची शक्यता कमी होते. एक हेक्टर क्षेत्राच्या तळ्यामध्ये २५० किलो या प्रमाणात तळभागात चुना मिसळतात.
३) माशांचे उत्पादन तळ्यातील मातीच्या भौतिक, रासायनिक व जीवशास्त्रीय गुणधर्मांवर अवलंबून असते. तळ्याच्या तळाला सेंद्रिय घटकांचे क्षारीकरण होऊन पोषणतत्त्वे पाण्याच्या बाहेर पडत असतात.
४) भौतिक गुणर्धमात मातीची पोत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तसेच रासायनिक गुणधर्मात सामू, सेंद्रिय कार्बन, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद हे महत्त्वाचे घटक तपासून मत्स्य तळ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे.
५) मत्स्य संवर्धन करताना तलावातील पाण्याच्या रंगाबाबत माहिती असणे आवश्यक बाब आहे. संवर्धन तलावात जमिनीचा तळ दिसत असेल तर संवर्धनयुक्त माशांच्या आहारातील मुख्य घटक प्लवंगाची उत्पत्ती पाण्यात कमी आहे असे समजावे. मातीसारखा, चहासारखा रंग पाण्यातील मातीच्या सूक्ष्म कणांची उपस्थिती दर्शवितो जे मत्स्य संवर्धनासाठी पोषक नसते. पाण्याचा हिरवा रंग वनस्पती प्लवंग दर्शवितो तसेच पाण्याचा बदामी किंवा तपकिरी रंग प्राणी प्लवंग दर्शवितो अशा पाण्यात माशांची वाढ जलद गतीने होते.
६) मत्स्यबीज संचयनापूर्वी पाणी सोडलेल्या तलावात वारंवार जाळी फिरवून स्थानिक व संहारक जातीचे मासे काढून टाकावेत. नवीन पाणी तळ्यात घेताना तलावाच्या आतल्या बाजूला बारीक जाळी बसवावी. तसेच काही रसायनांचा वापर करून देखील संहारक आणि मत्स्यभक्षक माशांचा नायनाट करता येतो. यामध्ये डेरिस रूट पावडर, मोहाची पेंड अथवा गूळ इत्यादी योग्य प्रमाणात संचयनापूर्वी १५ दिवस अगोदर वापर करावा.
७) मत्स्य संवर्धन तलावात प्राथमिक उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत उदा. शेणखत वापरावे. तसेच असेंद्रिय खतात उदा. युरिया, फॉस्पेट, नायट्रेट, अमोनिअम सल्फेट इ. खते वापरावीत. संवर्धन तलावात एकाच वेळी २ ते ३ खते वापरली जाऊ शकतात.
८) मत्स्य शेती करताना खाद्य व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. माशांना तलावात जेवढे खाद्य खायला लागेल तेवढेच खाद्य पुरवावे. अतिखाद्य अथवा कमी खाद्य माशांना पुरविल्यास त्याचे विपरीत परिणाम मत्स्य संवर्धानावर होते. मत्स्य शेती करत असताना पूरक खाद्याचे प्रमाण तलावातील माशांचे एकूण वजन व त्यांच्या वाढीच्या अवस्था यावर अवलंबून असते.
माशांचे संवर्धन ः
१) गोड्या पाण्यातील कटला, रोहू, मृगळ, गवत्या, सायप्रिनस यांच्या संवर्धनाचा कालावधी सर्वसाधारणपणे एक वर्षाचा असतो, तर देशी मागूर या जातीच्या माशांचा संवर्धन कालावधी ५ ते ६ महिन्यांचा असतो.
२) मरळ, पंकज, तिलापिया या जातीच्या माशांचा वाढीचा सर्वसाधारण वाढण्याचा कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असतो. हे मासे या काळात बाजारात विकण्या जोगे होतात.
३) शेततळ्यामध्ये कटला, रोहू, मृगळ, पंकज, तिलापिया, मरळ इत्यादी माशांचे संवर्धन करणे फायदेशीर ठरते. हवेतील प्राणवायू श्वसन करणारे कॅटफिश उदा. मरळ इत्यादी जातीच्या माशांचे संवर्धन अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे आहे.
संपर्क ः उमेश सूर्यवंशी, ९०९६९००४८९
(सहायक प्राध्यापक मत्स्य साधन संपत्ती व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर)
- 1 of 1100
- ››