दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय असावे?

प्रकल्प अहवालात काय असावे?
प्रकल्प अहवालात काय असावे?

खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध संकलन केंद्राला भेट दिल्यामुळे अनेक नव्या बाबी त्याला समजल्या होत्या. वाडीतील उत्तम दूध उत्पादन घेणाऱ्या ज्ञानबामाउलीच्या गोठ्यालाही भेट दिली होती. सदाने सुचवलेल्या सकाळ एपीजी लर्निंग येथील तीन दिवसाचा कोर्सही तो करून आला होता. हे सर्व त्याला सदाला कधी सांगेन, असे झाले होते. दुपारी भेटल्यानंतर सदाला सर्व सांगताच तोही आश्चर्यचकित झाला. राहुलची धडपड त्याला स्पष्ट जाणवली. त्याने विचारले, ‘‘मग काय निर्णय पक्का का?’’ राहुल म्हणाला, ‘‘हो तर. दुग्ध व्यवसायाविषयीच्या प्रशिक्षणाने माझे डोळेच उघडले. या व्यवसायाची सर्व माहिती मिळाली. तुझ्यामुळेच मी दूध संकलन केंद्र. ज्ञानबांचे अनुभव आणि गोठा पाहिला. तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष दुग्ध व्यावसायिकासोबत डेअरीलाही भेट देता आली. मी १० म्हशी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदाला आता राहवले नाही. तो म्हणाला, ‘‘अरे, एकदम दहा म्हशी. पण भांडवलाचे काय?’’ त्यावर न दचकता राहुल म्हणाला, ‘‘त्याचीही तजवीज करतोय. बॅंकेसाठी प्रपोजल तयार करतोय. ही काय त्याचीच फाईल. प्रशिक्षणामध्ये म्हैसपालनातील सर्व मुद्द्यावर माहिती मिळाली. अगदी म्हशींच्या जातीची निवड, त्यांची खरेदी करताना घ्यावयाची काळजी, गोठा बांधणीचे तंत्र, म्हशींचे आजार, औषधोपचार, खाद्याचे व्यवस्थापन या बरोबरच दुधाची विक्री, शेणखतापासून कंपोस्ट व गांडूळ खतांची निर्मिती याबाबतची माहिती मिळाली. या प्रशिक्षणातच भांडवल मिळविण्यासाठी बँकेकडे प्रपोजल कसे द्यावे, त्यात काय काय समाविष्ट असावे, याची माहिती मिळाली. अगदी एक नमुना प्रकल्प अहवालही दिला होता. त्यानुसार मी हा प्रकल्प अहवाल बनवला आहे. त्यानुसार आर्थिक बाबीची माहिती, खर्च व ताळेबंद याबबतची सर्व कोष्टके तयार केली आहेत. एकदा तू नजरेखालून घाल. त्यात काय कमी जास्त असल्यास सांग. बॅंकेत एकदम अचूक माहिती दिली पाहिजे.’’ राहुलने सर्व कागदपत्रे गोळा करण्यासाठी धडपड केली होती. अशी सर्व कागद पत्रे जोडलेली फाईल घेऊन तो बॅंकेत गेला. बँकेतील कर्ज अधिकाऱ्यास भेटून दुग्ध व्यवसायासाठीच्या कर्जाविषयी विचारणा केली. त्यांनी कागदपत्रे न पाहताच ‘दुग्ध व्यवसायास कर्ज देत नाही’ असे सांगितले आणि पुन्हा समोरच्या संगणकामध्ये आपले काम सुरू केले. तो त्यांची विनवणी करत होता. बँक अधिकारी व राहुलचे काहीतरी बोलणे चालू असल्याचे केबिनमधून बँकेचे व्यवस्थापकही पाहत होते. बराच राहुल काहीतरी बोलतोय, पण अधिकारी त्याला दाद देत नाही, हे दिसताच त्यांनी शिपायाकरवी त्याला केबिनमध्ये बोलावले. त्याची सारी धडपड पाण्यात जातेय की काय, असे वाटल्याने राहुलही खरेतर रागवला होता. त्याने रागारागानेच मॅनेजर समोर आपली फाइल ठेवली. फाईल चाळता चाळता ते राहुलशी बोलू लागले. ते खरेतर त्याला जोखत होते. राहुलनेही न घाबरता अगदी दूध डेअरीच्या भेटीपासून प्रशिक्षणापर्यंत सर्व काही सांगितले. हे सर्व ऐकल्यावर व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले. त्यांनी राहुलला सांगितले, ‘‘प्रथमदर्शी तरी तुला प्रकल्प मला योग्य वाटतोय. या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून दोन दिवसात कळवतो. ’’ पुढे राहुल दोन दिवसांनी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘प्रथमदर्शी दुग्ध व्यवसायास कर्ज देत नाही म्हणाले, ते योग्य नव्हते. मात्र, आमच्या बँकेतील दुग्ध व्यवसायास दिलेल्या कर्जाची थकबाकी जास्त आहे. त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली.’’ तुमची फाइल पाहिली. मला तुमचा प्रकल्प योग्य वाटला. बॅंकेला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा विचार या प्रकल्पात केला गेलेला आहे. बँकेस आवश्यक असलेले जमीन व म्हशींचे तारण, दोन टप्प्यात होणारी १० म्हशींची खरेदी (प्रथम ५ व सहा महिन्यांनंतर ५ म्हशींची खरेदी), परतफेडीचा कालावधी, कर्जाची परतफेड सुरू होण्यापूर्वीचा ‘हप्ता नाही’ असा कालावधी ( gestation period) , कर्ज फेडीची दूध सोसायटीची हमी, शेड व जनावरांचा विमा इ. सर्व पाहता तुमचा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही सक्षम वाटतो.’’ थोडा वेळ थांबून मंजुरी पत्र घेऊन जाण्यास सांगितले. हे ऐकताच राहुल आनंदी झाला. त्याची सुमारे महिनाभराची धडपड फळाला आली होती.  

बॅंक प्रकल्प अहवालातील महत्त्वाची बाबी ः

  • स्वत:विषयी विशेषतः आपले शिक्षण, अनुभव आणि घेतलेल्या प्रशिक्षणाविषयी माहिती.
  • कुटुंबाविषयीची माहिती.
  • प्रकल्पातील तांत्रिक बाबी. त्यात कोणत्या जातीच्या म्हशी, कोठून खरेदी करणार, त्यांची वैशिष्ट्ये इ.
  • गोठा बांधण्याच्या जागेची माहिती, गोठ्याचा आराखडा व उभारणीसाठीचे अंदाजपत्रक. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे वीज, पाणी, मजूर, कडबा, हिरवा चारा, खाद्य यांची उपलब्धता.
  • दूध विक्री व्यवस्था , गोठा शेड व जनावरांचा विमा याची सविस्तर माहिती.
  • वरील सर्व घटकांविषयी आवश्यक ते पुरावे व कागदपत्रे. उदा. जमिनीचा ७/१२ उतारा, ८ अ
  • उतारा, म्हशी खरेदी करणार त्याबाबतचे पत्र, वीज व पाणी उपलब्धतेबाबतचे दाखले, दूध विक्री करणार असलेल्या सोसायटीचे सभासद असल्याचे पत्र, त्याच सोसायटीचे बँकेस वसुलीबाबतचे हमीपत्र.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com