पूरस्थितीचा अंदाज अचूकतेने देणारे प्रारूप विकसित 

पूरस्थितीचा अंदाज अचूकतेने देणारे प्रारूप विकसित 
पूरस्थितीचा अंदाज अचूकतेने देणारे प्रारूप विकसित 

कान्सास विद्यापीठातील संशोधक ज्यूड कास्टेन्स यांनी या वर्षी कान्सास येथे झालेल्या पावसांचे नेमके मोजमाप करून, त्यानुसार होणाऱ्या नदीच्या पाण्याच्या पातळीचा अचूक अंदाज स्थानिक प्रशासनाला दिला आहे. या प्रत्यक्ष वेळेवर पाऊस, त्यानुसार प्रवाहातील बदल यांची माहिती नोंदवून, अचूक अंदाज देणाऱ्या नावीन्यपूर्ण प्रारूपामुळे कान्सास येथे या वर्षी वसंतामध्ये सर्वाधिक पाऊस होऊनही पूरस्थितीचे अचूक अंदाज मिळवणे शक्य झाले.  ज्यूड कास्टेन्स यांनी आपल्या एक दशकापूर्वी पीएच.डी.च्या प्रबंधासाठी केलेल्या अभ्यासामध्ये कान्सास येथील पाऊस आणि पूरस्थितीचा अभ्यास केला होता. मात्र, सतत पडत असलेल्या पावसामध्ये प्रत्यक्ष स्थितीनुसार बदलणाऱ्या घटकांनुसार विस्तृत क्षेत्रावरील वाढत्या पाणीपातळीचे प्रमाण आणि खोली यांचे अंदाज यामध्ये मोठी तफावत पडत असते. त्याचा फटका अचानक उद्भवणाऱ्या पूरस्थितीद्वारे सर्वसामान्यांना बसू शकतो. हा माहितीमध्ये पडणारा फरक कमी करण्याचा प्रयत्न कास्टेन यांनी केला आहे.  २००७ मध्ये आग्नेय कान्सास भागामध्ये तीव्र पूरस्थितीमध्ये अशाच माहितीतील तफावतीचा फटका सर्वसामान्यांना बसला होता.  या वर्षीच्या वसंतामध्ये (मे २०१९) कान्सासमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. कान्सास जल कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी कास्टेन्स यांच्यासह काम केले आहे. त्यासाठी आवश्यक नकाशे, प्रवाहातील विविध मापके आणि राष्ट्रीय हवामान सेवा विभागातील नदीच्या पातळीचे संभाव्य अंदाज अशा अनेक घटकांची मदत घेतली. त्यातून कोणत्या विभागामध्ये नदीची पातळी पूरस्थितीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेतला.  त्याविषयी माहिती देताना कास्टेन्स म्हणाले, की मी कान्सास जल विभागासोबत मे महिन्यामध्ये काम केले. त्यात प्रत्यक्ष वेळेनुसार होत जाणाऱ्या बदलांचा वेध घेतला. पूर्वी या विभागासोबत केलेल्या कामांमध्ये पूरस्थितीसंदर्भात सर्व माहितीसाठा जमवला होता. त्याची सांगड प्रत्यक्ष घटकांशी घालत कान्सासच्या पूर्वेकडील अर्ध्यापेक्षा अधिक भागांची माहिती जमा केली.  उदा. जर तुम्ही ५९ महामार्गावर लॉरेन्सच्या दक्षिणेकडे प्रवास करत असाल, तर तुम्हाला वाकारुसा नदीवर यूएसजीएस प्रवाह मापकांचे बॉक्स दिसतील. अशा सुमारे २०० मापकांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. ती सातत्याने नकाशावर नोंदवली जात असून, त्यावरून भविष्यातील पूरस्थितीचा अंदाज मिळवला जात आहे.  असा झाला उपयोग ः  सध्याची फेमाद्वारे वापरली जाणारी व पूरस्थितीचा अंदाज देणारी अनेक प्रारूपे ही अधिक गुंतागुंतीच्या हायड्रोडायनॅमिक तत्त्वावर आधारित आहेत. मात्र, कान्सास येथील अधिकाऱ्यांसह कास्टेन्स यांनी या वर्षी २०१९ मध्ये ऐतिहासिक पावसामध्ये काम केले. त्यातून विकसित केलेल्या प्रारुपाला फ्लडप्लेन असे नाव दिले आहे. त्याविषयी माहिती देताना कास्टेन्स यांनी सांगितले, की आम्ही नेओशो नदीच्या जॉन रेडमोंड तलावाच्या दक्षिणेकडील भागामध्ये सुमारे १०० मैल अंतरापर्यंत खाली ओक्लोहोमापर्यंत माहिती घेतली. त्यामुळे या तलावातून विसर्ग करण्याचे नियोजन करणे आणि त्याविषयी माहिती सार्वजनिक करणे सोपे झाले. कारण कोणत्याही पुराबाबत योग्य वेळी माहिती उपलब्ध होणे आणि त्याचा अंदाज मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत हे प्रारूप नक्कीच यशस्वी झाले आहे. हे तत्त्व वापरून सर्वत्र प्रत्यक्ष वेळेवर अंदाज देणे शक्य होऊ शकते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com