कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी पद्धती

कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ, सोडओळ, सरी वरंबा, रुंद वरंबा व सरी इ. नावीण्यपुर्ण पेरणी पद्धती आहेत. या पद्धतींचा वापर केल्यास पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजन व व्यवस्थापन शक्य होते. पर्यायाने उत्पादनात वाढ शक्य होते.
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी पद्धती
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी पद्धती

कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ, सोडओळ, सरी वरंबा, रुंद वरंबा व सरी इ. नावीण्यपुर्ण पेरणी पद्धती आहेत. या पद्धतींचा वापर केल्यास पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजन व व्यवस्थापन शक्य होते. पर्यायाने उत्पादनात वाढ शक्य होते. जोडओळ पद्धत : प्रचलीत सरते, काकरी, अथवा तिफणीने शेताच्या उताराला आडवी सोयाबीनची पेरणी करावी. पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर कमी करुन, जोडओळीमध्ये पेरणी करावी. दोन जोळओळीमधील अंतर, दोन ओळीमधील अंतरापेक्षा दुप्पट राखावे. प्रत्येक जोडओळीनंतर मोकळी जागा राखली जाईल. पीक १५-२० दिवसांचे झाल्यानंतर त्या ठिकाणी डवऱ्याच्या फेरीवेळी डवऱ्याला दोरी बांधून अथवा बलराम नांगराने सरी पाडावी. मुलस्थानी जलसंवर्धन शक्य होईल. उदा. प्रचलीत पद्धत - दोन ओळीतील अंतर -४५ बाय ४५ सें.मी. जोळओळ पद्धत - दोन ओळीतील अंतर - ३० सेंमी. ६० सें.मी. बाय ३० सें.मी. बाय ३० सें.मी. १ फुटी काकरीने काकर पाडल्यानंतर मजुरांच्या साह्याने सोयाबीन बियांची पेरणी दोन झाडातील अंतरानुसार (७.५-८.० सेंमी) टोकन पद्धतीने करावी. दोन ओळी टोकल्यानंतर तिसरी ओळ खाली ठेवावी. दोन जोड ओळींमध्ये दोन फुटांची जागा खाली राहील. या ठिकाणी डवऱ्याच्या फेरीवेळी दांड, सरी अथवा गाळ पाडून घ्यावा. जोळ ओळीत पेरलेले सोयाबीन गादी वाफ्यावर येते. . फायदे : १) एकरी झाडांची संख्या शिफारशीनुसार (प्रचलीत पद्धतीएवढीच) राखली जाते. २) मोकळ्या जागेचा वापर विविध कारणांसाठी होऊ शकतो. उदा. मुलस्थानी जलसंवर्धन, अतिरीक्त पावसाचा निचरा, पिकांचे निरिक्षण, निगराणी, फवारणी, आंतरमशागत इ. ३) शेतात हवा खेळती राहते. ४) पिकाला सुर्यप्रकाशाचे वितरण एकसमान शक्य होते. ५) ओलीताची सोय असल्यास दांडाद्वारे पाटपानी अथवा स्प्रिंकलरची पाइप अंथरणे सोपे होते. सोडओळ पद्धत (पट्टापेर) : प्रचलीत पद्धतीप्रमाणे दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवून सरते, काकरी अथवा ट्रॅक्टरने शेताच्या उताराला आडवी पेरणी करावी. बैलजोडीचलीत पेरणी यंत्रद्वारे पट्टापेर ः

  • बैलजोडीचलीत पेरणी यंत्र सर्वसाधारणपणे तीन दात्याचे असते. तिन दाती काकरीने, सरत्याच्या साह्याने अथवा तिफनीने पेरणी करताना प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना चौथी ओळ खाली ठेवल्यास शेतात तीन - तीन ओळीत पट्टापेर शक्य होते.
  • सहा ओळींचा पट्टापेर करताना पेरणी करतावेळी पलटून येताना तीन ओळींच्या बाजूला लागून तीन ओळी घ्याव्यात. त्यानंतर पलटून जाताना सातवी ओळ खाली ठेवावी. पुन्हा पलटून येताना तीन ओळी लागून घ्याव्यात. अशा प्रकारे सहा - सहा ओळींचे पट्टे तयार होतात.
  • बैलजोडीचलीत पेरणीयंत्र चार दाती असल्यास प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पाचवी ओळ खाली ठेवावी. शेतात चार - चार ओळींचे पट्टे तयार होतात.
  • ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राद्वारे पट्टापेर ः तीन ओळी पट्ट्यासाठी ः सोयाबीनचे ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र सात दात्यांचे असते. पट्टापेर करतेवेळी पेरणीयंत्राचे मधले चौथे छिद्र बंद करावे. ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना प्रत्येकवेळी आठवी ओळ खाली ठेवल्यास शेतात तीन - तीन ओळींचे पट्टे तयार होतात. पेरणीसाठी २५% बियाणे कमी लागेल. सहा ओळी पट्ट्यासाठी - प्रत्येकवेळी पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे लागून पेरणी केल्यास शेतात सहा-सहा ओळींचे पट्टे तयार होतील. पाच ओळी पट्ट्यासाठी - ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरचे प्रत्येकी एक छिद्र बंद करावे. म्हणजेच प्रत्येक सहावी ओळ खाली राहील. अशाप्रकारे प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना ट्रॅक्टरचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या ओळीत ठेवल्यास शेतात पाच - पाच ओळींचे पट्टे तयार होतील. सात ओळी पट्ट्यासाठी - प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना आठवी ओळ खाली ठेवावी. खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेरीवेळी डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सरी- दांड अथवा गाळ पाडून घ्यावा. पट्टापेर पद्धतीचे फायदे

  • पिकाची सुर्यप्रकाश, जागा, अन्नद्रव्ये, जमिनीतील ओल यासाठी होणारी स्पर्धा कमी होते. पिकाची एकसमान वाढ होते.
  • शेतात फीरायला जागा उपलब्ध असल्याने पिकाची निगराणी, निरिक्षण, फवारणी योग्य प्रकारे करता येते.
  • डवऱ्याच्या फेऱ्याच्यावेळी खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी सऱ्या काढल्याने पावसाचे मूलस्थानी संवर्धन, अतिरीक्त पाण्याचा निचरा शक्य होते.
  • शेतकऱ्याकडे ओलीताची सोय असल्यास सऱ्या आधीच पाडून ठेवलेल्या असल्यामुळे सऱ्यांद्वारे ओलीत किंवा तुषार सिंचन संचाची व्यवस्था असल्यास पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते.
  • मध्ये मध्ये ठेवलेल्या खाली ओळींमुळे शेतात हवा खेळती राहून पर्यायाने बुरशीजन्य रोगांपासून पिकाचा बचाव होतो. तसेच
  • काठावरील ओळींना पसरण्यासाठी जागा उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ शक्य होते.
  • दाण्याचा आकार व दर्जा एकसमान मिळतो.
  • या बाबींकडे लक्ष द्या

  • पट्टापेर पेरणी पद्धतीने पेरणी केल्यास पिकांची दाटी कमी होते.
  • बियाणांचे प्रमाणे पारंपरिक एकरी ३० किलो ऐवजी २५ ते १५ टक्क्यापर्यंत कमी होते.
  • सोयाबीन प्रमाणेच मुग, उडीद, हरभरा या पिकांसाठीही पट्टापेर पेरणी उपयुक्त ठरते.
  • सुधारित पट्टापेर पेरणी पद्धतीसोबत जैविक खतांची व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापनात झिंक सल्फेट अथवा सल्फर वापर, आंतरमशागत सुरुवातीच्या ३५-४० दिवसात पूर्ण करणे, पावसात खंड पडल्यास व ओलीताची सोय असल्यास फुलोऱ्यापूर्वी तसेच शेंगामध्ये दाणे भरताना संरक्षित ओलित करणे, फुलोरा व शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेत पीक संरक्षणाकडे लक्ष देणे या बाबी शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
  • जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक -कृषीविद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com