कीटकांचा पालनासाठी होतोय खास अभ्यास 

कीटकांचा पालनासाठी होतोय खास अभ्यास 
कीटकांचा पालनासाठी होतोय खास अभ्यास 

नाकतोडे आणि क्रिकेट हे कीटक भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे संशोधकांचे मत आहे. सध्या ज्याप्रमाणे प्राणीज प्रथिनांसाठी पशूपालन केले जाते, त्याप्रमाणे भविष्यामध्ये कीटकांचे पालन करण्यासंदर्भात अभ्यास जगभरामध्ये केला जात आहे. म्युनिच तंत्र विद्यापीठामध्ये या कीटकांच्या आहार-विहारविषयक गरजांचा अभ्यास केला जात आहे. कीटकपालनातील अडचणी दूर करीत अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने पालन करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.  अन्य पशू-पक्षीपालनामध्ये हरितगृह वायूंची निर्मिती ही मोठी समस्या मानली जात आहे. त्यामुळे किमान हरितगृह वायूनिर्मिती करणाऱ्या व प्रथिनांचे मुबलक प्रमाण असणाऱ्या कीटकांवर संशोधकांनी अन्न म्हणून लक्ष केंद्रित केले आहे. हे कीटक कमीत कमी निविष्ठामध्ये वाढू शकतील. त्याविषयी माहिती देताना जर्मनी येथील म्युनिच तंत्र विद्यापीठातील प्राणिपोषणशास्त्र विभागातील प्रो. विलहेल्म विंडिश्च यांनी सांगितले, की कीटकांचे पालन आणि त्यापासून प्रथिनांची उपलब्धता हे सध्या जरी आश्वासक दिसत असले तरी त्यांचे व्यावसायिक पालन करताना अनेक अडचणी उद्भवू शकतात. मोठ्या प्रमाणात कीटकांचे पालन करताना त्यांच्या पोषकतेच्या गरजा अद्याप मानवाला माहीत नाहीत. त्यावर प्रचंड काम करावे लागणार आहे.  जर्मन - केनिया येथील संशोधकांचा गट क्रिकेट (Gryllus bimaculatus) आणि टोळ (Schistocerca gregaria) या कीटकांवर एकत्रितपणे काम करीत आहे. या दोन्ही जंगली कीटकांच्या व पानांवर जगणाऱ्या जाती आहेत. त्यांना सतत वर्षभर हिरवा पाला पुरवत राहणे, ही वाटते तितकी साधी गोष्ट नक्कीच नाही. त्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये दर्जा व सुरक्षितता यांचा विचार करून वाळवलेला, साठवता व वाहून नेण्याजोग्या व्यावसायिक खाद्याचा त्यांचा विचार करावा लागेल. या खाद्याच्या निर्मितीसाठी कीटकांच्या पोषकतेच्या नेमक्या गरजांचा नैरोबी येथील कीटक शरीरशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र केंद्रामध्ये अभ्यास केला जात आहे. तिथे दोन प्रजातीच्या कीटकांना वेगवेगळ्या प्रकारेच खाद्य देऊन, त्यांच्या निवड तपासली जात आहे. तसेच कोरडे कॉर्नस्टार्च, प्रथिन आणि फायबरयुक्त चवळी पाने, सोयाबीन अर्क आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण गाजराची भुकटी असे अनेक पर्याय ठेवले जात आहेत.  त्यातील खाद्याचे प्रमाण, प्रौढ कीटकाचे वजन यांच्या नोंदी केल्या. अशा प्रयोगांचे तीन तीन महिन्यांच्या दोन चाचण्या घेतल्या आहेत.  या प्रयोगाचे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे असल्याचे विंडिश्च यांनी सांगितले. ते म्हणाले की, गाय, वराह किंवा कोंबड्या अशा पाळीव प्राण्यांच्या तुलनेमध्ये कीटकांची चयापचय आणि पचनक्षमता वेगळी आहे. मात्र, कीटकांच्या प्रजातीनुसारही त्यामध्ये भेद आहेत. उदा. टोळ हे माणसांना पचनीय नसलेले फायबरही चांगले पचवू शकतात. क्रिकेट कीटकांच्या विष्ठेमध्ये फायबरयुक्त अन्नाचा समावेश होता. टोळ प्रथिनांवर वाढवल्यास वेगाने वाढतात, तर क्रिकेट कीटकांना स्टार्च आवश्यक असते. 

  • हे प्रयोग अद्याप प्राथमिक स्तरावरील आहेत. अशा प्रत्येक अभ्यासातून कीटकांच्या फार्मपर्यंतचा रस्ता प्रशस्त होत जाणार आहे. जे अन्य प्राणी किंवा माणूस पचवू शकत नाही, अशा अन्नावर वाढणाऱ्या कीटकांचेच पालन फायदेशीर ठरू शकेल. 
  • पुढील प्रकल्पामध्ये या कीटकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत विकारांचा शोध घेण्यात येईल. त्यातून वनस्पती फायबरचे ग्लुकोजमध्ये कसे रूपांतर होते, हे समजून येईल. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com