कोरडवाहू पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून पीक उत्पादनासह जमिनीची सुपीकता तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.
कोरडवाहू पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
कोरडवाहू पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

पाण्याची उपलब्धता आणि जमीन यांचा योग्य समन्वय साधून फायदेशीर पीक पद्धतीचा वापर हे कोरडवाहू शेतीतील महत्त्वाचे सूत्र आहे. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून पीक उत्पादनासह जमिनीची सुपीकता तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. कोरडवाहू शेतीतील हेक्टरी उत्पादन वाढविणे, प्रतिकूल वातावरणात चांगले उत्पादन मिळणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. कोरडवाहू शेती उत्पादन वाढीसाठी उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांचा (जमीन, हवामान, पाणी) शास्त्रीयदृष्ट्या पुरेपूर उपयोग करून सुधारित तंत्रज्ञानाद्वारे विकास करता येईल. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : कोरडवाहू शेतीत शेणखत, कंपोस्ट, जिवाणू संवर्धक, गाळ आदी पर्यायी खतांचा वापर करून रासायनिक खतांची मात्रा कमी करता येते. त्यातून २५ ते ३० टक्के खर्च कमी करता येतो. हेक्टरी ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत संकरित ज्वारीस दिल्यास शिफारसीत रासायनिक खतांची मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. कडधान्यांसाठी रायझोबियम तर तृणधान्यांसाठी ॲझोस्पिरीलम, अझोटोबॅक्टर यांचा वापर केल्यास रासायनिक खतांची मात्रा २० ते २५ टक्क्यांनी कमी करता येते. शेणखत आणि कंपोस्ट खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. एकात्मिक खत व्यवस्थापन ः

  • जमिनीची सुपीकता टिकून राहते.
  • रासायनिक खतांबरोबर शेणखत, गांडूळखत, जैविक खतांचा वापर करता येतो.
  • जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वाढ होते. जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारतात.
  • भरखते व हिरवळीची खते वापरल्याने जमिनीतील अविद्राव्य स्थितीतील अन्नद्रव्ये विद्राव्य स्थितीत येतात. पिकांना सहज उपलब्ध होतात.
  • सेंद्रिय खतांचे महत्त्व ः जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.

  • जैविक हालचाली कार्य करतात. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
  • जैविक खते वातावरणातील अन्नद्रव्ये शोषून घेऊन त्यांची जमिनीत भर घालतात. अझोटोबॅक्टर, रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत त्यांचा अंतर्भाव करतात.
  • सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खते वापरल्यास त्यांचा कार्यक्षम उपयोग होतो.
  • रासायनिक खतांची मात्रा अवलंबून असणारे घटक ः

  • जमिनीचा प्रकार
  • जमिनीची सुपीकता
  • उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण
  • पीक पद्धती व पीक जाती
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याची पध्दत ः

  • पेरणीच्या वेळी जमिनीतून घन स्वरुपात शेणखत किंवा कंपोस्ट खतासोबत ः जस्त सल्फेट, लोह सल्फेट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते-१: २० ते २५ किलो प्रति हेक्टरी
  • उभ्या पिकांमध्ये- (२ ते ३ वेळा फवारणी) ः जस्त सल्फेट, लोह सल्फेट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते-२ ः (०.५ ते १ टक्के.) ५० ते १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी
  • जिवाणू संवर्धकांचा वापर ः

  • जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयोग होतो. ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, अझोस्पीरिलम, निळे-हिरवे शेवाळे आणि ॲझोला पिकास नत्र पुरवितात.
  • बॅसीलस पॉलिमिक्स जिवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.
  • मायकोराईझा जिवाणू स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शिअम, सोडीयम, जस्त, तांबे जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात.
  • जस्त आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारे जिवाणू ः

  • रासायनिक खतांद्वारे दिलेले जस्त ७५ टक्के मातीत स्थिर होते. जस्त विरघळण्यामध्ये बॅसिलस, मेगाटेरिअम व सुडोमोनस स्ट्रायटा हे जिवाणू आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी या बुरशीचा समावेश होतो.
  • हे सूक्ष्मजीव विविध प्रकारची सेंद्रिय व असेंद्रिय आम्ले स्त्रवतात. यातील सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल व कार्बोनिक आम्लांमुळे अविद्राव्य स्वरुपातील जस्त विद्राव्य स्वरुपात पिकास उपलब्ध होतो.
  • जिवाणू संवर्धकांचे फायदे ः

  • रोपे निरोगी राहतात. उत्पादनात चांगला पडतो.
  • जमीन अधिक सुपीक बनते, पोत सुधारतो.
  • बियाण्याची उगवण लवकर आणि जोमाने होते.
  • पिकाची कीड-रोग प्रतिकारशक्ती वाढते.
  • मुळांच्या संख्येत व लांबीत वाढ होते. त्यामुळे मुख्य खोडांपासून दूर व खोल असणारी अन्नद्रव्ये, पाणी पिकास उपलब्ध होते.
  • दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्रसाठा उपलब्ध होतो.
  • नत्र, स्फुरदयुक्त रासायनिक खतांच्या उपलब्धतेत वाढ होते.
  • पिकाचा दर्जा सुधारतो.
  • जमिनीच्या प्रकारानुसार रब्बी पीक पद्धती ः

    जमिनीचा प्रकार खोली (सेंमी उपलब्ध ओलावा (मिमी) घ्यावयाची पिके आणि पीक पद्धती
    मध्यम २२.५ ते ४५ ६० ते ६५ सुर्यफुल, करडई
    मध्यम खोल १) ४५ ते ६० ८० ते ९० ब्बी ज्वारी, करडई, रब्बी ज्वारी + करडई (६:३ /४:२), जवस + करडई (६:३ /४:२), जवस + मोहरी (५:१), आंतरपीक पद्धती
    २) ६० ते ९० १४० ते १५० रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, रब्बी ज्वारी + करडई (६:३), करडई + हरभरा (६:३/ ३:३/ २:४), हरभरा + सुर्यफुल (३:३) आंतरपीक पद्धती
    खोल ९० पेक्षा जास्त १६० पेक्षा जास्त रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पीक तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन, खरीप-रब्बी ज्वारी, करडई, हरभरा या दुबारपीक पध्दती घ्याव्यात.  

    खत व्यवस्थापन ः रब्बी ज्वारी :

  • ज्वारीची कडधान्यांसोबत फेरपालट फायदेशीर ठरते.
  • कोरडवाहू पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश द्यावे.
  • पेरणीवेळी नत्र, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी.
  • अझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणास प्रक्रिया करावी.
  • घरगुती बियाणे असल्यास ३०० मेश गंधकाची भुकटी चोळून बियाणांचा वापर करावा.
  • हरभरा ः कोरडवाहू स्थितीत पेरणीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी नत्र, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे आणि ट्रायकोडर्माची प्रक्रिया फायदेशीर ठरते. घाटे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. राजमा : पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी नत्राची अर्धी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी. रायझोबीयम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सूर्यफूल ः हेक्टरी ६० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी नत्राची अर्धी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी. पेरणीपूर्वी अझोटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणास प्रक्रिया करावी. करडई : पेरणीसाठी हेक्टरी २० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. पेरणीवेळी संपूर्ण खताची मात्रा द्यावी. खरिपात कडधान्य पीक घेतले असल्यास करडई पिकास नत्राच्या शिफारशीची ५० टक्के मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी अझोस्पीरिलम व स्फुरद विद्राव्य जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. जवस : पेरणीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. पेरणीवेळी संपूर्ण खताची मात्रा द्यावी. मोहरी पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. पेरणीवेळी पूर्ण खताची मात्रा द्यावी. सारिका नारळे- ९४०४१९४२८९ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com