agriculture stories in Marathi, integrated fertilizer with organic needed | Agrowon

एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची आवश्यकता

डॉ. विलास पाटील
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून असणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. यात कृषी संशोधन, तंत्रज्ञान आणि विस्तार यांचा मोलाचा वाटा आहे. आज जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मातीच्या पोषणासाठी सेंद्रिय घटकांची आवश्यकता व्यक्त करतानाच केवळ सेंद्रिय किंवा केवळ रासायनिक खतांवरील शेती शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने योग्य राहणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून असणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. यात कृषी संशोधन, तंत्रज्ञान आणि विस्तार यांचा मोलाचा वाटा आहे. आज जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मातीच्या पोषणासाठी सेंद्रिय घटकांची आवश्यकता व्यक्त करतानाच केवळ सेंद्रिय किंवा केवळ रासायनिक खतांवरील शेती शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने योग्य राहणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा अन्नधान्य उत्पादनाचा दर अधिक ठेवण्यामध्ये कृषी तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरले आहे. १९६०-७० या दशकामध्ये रासायनिक खतांचा वापर, त्याला प्रतिसाद देणारे सुधारित बियाणे आणि त्याला काही प्रमाणात मिळालेली सिंचनाची जोड यांमुळे उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळाली. भारतीय शेतीचे पूर्ण रूप पालटून गेले. जुन्या कमी उत्पादन देणाऱ्या, अधिक पक्वता काळ असणाऱ्या पीकजाती पडद्याआड गेल्या. नवीन संकरित सुधारित वाण आल्याने हेक्टरी उत्पादनात दुपटीने-तिपटीने वाढ झाली. मात्र, काही वर्षांमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचे अत्यल्प प्रमाण, पाण्याचा अयोग्य वापर यांमुळे जमिनीची प्रत बिघडून गेली. त्याचा फटका बसून उत्पादनवाढीचा वेग कमी झाला. दरम्यानच्या काळामध्ये खते, पाणी, वीज, वाहतूक, बी बियाणे यांच्या किमतीमध्ये वाढ होत गेली. शेतकरी हवालदिल झाला. अशा टप्प्यांमध्ये एक वर्ग सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करू लागला. मातीच्या सुपीकतेचा विचार करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. मात्र, निव्वळ सेंद्रिय शेती करण्यामधील धोके या वर्गाकडून दुर्लक्ष केले जातात. आजपर्यंत विकसित होत गेलेल्या कृषी विज्ञानासाठी अनेक शास्त्रज्ञांनी पूर्ण आयुष्य वेचले आहे. शास्त्रीय पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या तत्त्वाविषयी चुकीचे भ्रम फैलावले जात आहेत. निव्वळ सेंद्रिय शेतीने समस्या सुटणार नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये, त्यांचे स्वरूप यांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. त्याद्वारे शेतीचे आरोग्य उत्तम ठेवत उत्पादनात सातत्य आणणे शक्य आहे.

माणसांच्या वाढीसाठी ज्याप्रमाणे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे आवश्यक असतात. त्यासाठी भाकरी, भाजी, डाळ, दही, दूध अशा अनेक अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी कर्ब, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, जस्त, लोह, मॅग्नीज, तांबे, बोरॉन, क्लोरीन, माकेब्डेनम व निकेल या अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी पहिली तीन अन्नद्रव्ये कर्ब, हायड्रोजन व प्राणवायू ही क्रमश: हवा व पाणी यांतून मिळतता. पिकाद्वारे उरलेल्या १४ अन्नद्रव्यांचे शोषण योग्य स्वरूपामध्ये असल्यावरच जमिनीतून केले जाते. उदा. नत्र हे अन्नद्रव्य पिके नायट्रेट या स्वरूपात शोषतात. पिकाला युरिया खत दिल्यानंतर जमिनीतील विविध जिवाणू कार्यरत होतात. त्यातील नायट्रोसोमानरी, नायट्रोबॅक्टर यांसारखे जिवाणू अमाईडयुक्त नत्रचे रूपांतर प्रथम अमोनिअमयुक्त नत्रामध्ये, त्यानंतर नायट्रेट स्वरूपात करतात.

आता आपण सेंद्रिय पदार्थांचे शोषण कसे होते, ते पाहू. आपण कंपोस्ट, शेणखत वा कोणतेही सेंद्रिय खत जमिनीत टाकले असता त्यातील प्रथिने किंवा अन्य स्वरूपात नत्राचे रूपांतर अमोनिअम व नंतर नायट्रेट स्वरूपात होते. त्याचे पिकाद्वारे शोषण केले जाते. म्हणजेच तुम्ही सेंद्रिय किंवा रासायनिक खत काही दिले, तरी ते पिकांना कळत नाही. त्यांना फक्त नायट्रेट स्वरूपातून मिळाले पाहिजे.

सेंद्रिय पदार्थांची गरज का आहे?
कोणत्याही खतातील पोषक अन्नद्रव्यांच्या रूपांतरणासाठी जिवाणू आवश्यक असतात. त्यातील अनेक जिवाणूंचे अन्न हे सेंद्रिय कर्ब आहे. त्यांच्या वाढीसाठी सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकावे लागतात. यासोबतच जमिनीतील कणांच्या संरचनेमध्ये हवा आणि पाणी यांचे योग्य प्रमाण ठेवण्यसाठीही सेंद्रिय पदार्थ आवश्यक असतात.

एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजन एकक

  • पिकांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा केवळ सेंद्रिय पदार्थातून होत नाही. आपण पिकांची लागवड तुलनेने अतिजवळ करत असल्यामुळे रासायनिक खते देणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येक पिकांच्या रासायनिक खतांच्या शिफारशी शास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्वक ठरवलेल्या आहेत. माती परीक्षणानंतर योग्य ते बदल करत तेवढ्या प्रमाणातच खते दिल्यास फायदा होतो.
  • महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी वगळता अन्य विभागांमध्ये तापमान जास्त असल्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विदारण लवकर होते. या पदार्थांचा ऱ्हास लवकर होतो. या कारणामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण २ - ३ टक्क्यांपेक्षा जास्त राहत नाही. पर्यायाने पिकांना अन्नद्रव्यांचा कमी पुरवठा होतो. म्हणून मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वदूर जमिनींमध्ये निव्वळ सेंद्रिय शेती अशक्य आहे.
  • काही फळपिकांसाठी सेंद्रिय शेती होऊ शकते. ज्या शेतीमध्ये वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकतो, जमिनीचे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक जात नाही आणि पिकांनी व्यापलेल्या परिसरातून बाष्पीभवन कमी होत असेल, अशा ठिकाणी सेंद्रिय शेती काही प्रमाणात शक्य आहे.
  • आपल्या महाराष्ट्रातील वातावरणाचा विचार केला असता युरोपियन शेतकऱ्यांशी व त्यांच्या शेतीशी तुलना करता येणार नाही. युरोपीय खंडामध्ये थंड वातावरण असून, वर्षभर पाऊस किंवा बर्फ पडत असतो. उष्णतामानही अत्यंत कमी असल्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन झपाट्याने होत नाही. असे सेंद्रिय पदार्थ जमिनीत साचले जातात. तेथील अनेक जमिनींमध्ये ६ ते ७ टक्के व त्यापेक्षा जास्तही सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आढळते. तेथे काही प्रमाणात सेंद्रिय शेती शक्य होत आहे.
  • आपल्या राज्यात फळपिकांसाठी काही प्रमाणात सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. कारण, काही फळपिकांचे वर्षभर बहर येत असतात. अशा वेळी वर्षभर हळूवारपणे अन्नद्रव्ये पुरवठा सेंद्रिय पदार्थातून होऊ शकतो. या फळपिकाचेही एकाच हंगामात एकदाच भरघोस उत्पादन घ्यायचे असल्यास त्यासाठी रासायनिक खतांची जोड देणे आवश्यक वाटते.
  • नुसत्या रासायनिक अथवा सेंद्रिय खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची आवश्यकता आहे. यातून पिकाच्या पोषणाबरोबरच चिरस्थायी उत्पादनाची शाश्वती मिळू शकते. योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता करत राहिल्यास जमिनीचे आरोग्यही चांगले राहील, यात शंका नाही.

(माजी शिक्षण संचालक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...