कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती फायदेशीर

जमीन आणि पाणी या नैसर्गिक घटकाचा पुरेपूर आणि परिणामकारकरीत्या फायदा करून घेण्कोयासाठी कोरडवाहू शेतीत निव्वळ एकच पीक न घेता मुख्य पिकाबरोबरच एक किंवा दोन आंतरपिके शास्त्रोक्त पद्धतीने घेणे गरजेचे ठरते.
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती फायदेशीर
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती फायदेशीर

महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५ टक्के क्षेत्र आहे. कोरडवाहू शेतीतील उत्पादनाचा वाटाही अधिक आहे. जमीन आणि पाणी या नैसर्गिक घटकाचा पुरेपूर आणि परिणामकारकरीत्या फायदा करून घेणे हे कोरडवाहू शेतीतील महत्त्वाची बाब ठरते. कोरडवाहू शेतीत निव्वळ एकच पीक न घेता मुख्य पिकाबरोबरच एक किंवा दोन आंतरपिके शास्त्रोक्त पद्धतीने घेणे गरजेचे ठरते. आंतरपीक पद्धतीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीवर एकाच वेळी योग्य अंतरावर पेरली जातात. आंतरपीक पद्धतीचे फायदे :

  • पावसाच्या अनिश्चित वितरणामुळे मुख्य पिकाची वाढ व उत्पादन बिघडल्यास आंतरपिकापासून निश्चित उत्पादन मिळते.
  • सतत बदलणाऱ्या लहरी हवामानामध्ये किमान एका तरी पिकाचे उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते.
  • रोग आणि किडीच्या उद्रेकाच्या स्थितीमध्येही काही प्रमाणात शाश्वत उत्पादन मिळू शकते.
  • आंतरपिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोडत असल्यामुळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम होते.
  • आंतरपिके पसरट व बुटकी असल्यामुळे जमिनीची धूप कमी होते. पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
  • सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त कोणत्याही प्रकारात पाऊस पडला तरी आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यास हमखास उत्पन्नाची हमी मिळते.
  • आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड ः

  • जमीन, हवा, पाणी, प्रकाश, अन्नद्रव्ये या नैसर्गिक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरीत्या उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते.
  • मुख्य पीक आणि आंतरपिकाच्या कायिक वाढीची वैशिष्ट्ये भिन्न असावी. उदा. मुख्य पिकाची वाढ उभट असल्यास आंतरपीक पसरट आणि बुटके असावे.
  • मुख्य पीक व आंतरपीक यांच्या मुळ संस्था भिन्न असाव्यात.
  • मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांशी जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इ. विविध नैसर्गिक घटकांसाठी स्पर्धा करणारे नसावे.
  • मुख्य आणि आंतरपिकाच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक (२०-३० दिवसांचा) असावा. ज्यामुळे दोन्ही पिकाच्या वाढीच्या अवस्था भिन्न राहून उत्पादन वाढीच्या सर्व घटकांचा फायदा दोन्ही पिकास मिळतो.
  • मुख्य आणि आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसावेत. ते एकमेकास पूरक असावेत.
  • आंतरपिके ही प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत.
  • मुख्य आणि आंतरपिकाच्या अंतर्भावामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत व्हावी.
  • आंतरपीक पद्धती खरीप ज्वारी + तूर (४:२/३:३) ः ज्वारी + तूर ही आंतर पीक पद्धती ३:३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात शिफारस केली आहे. ती शेतकऱ्यांना वरदानच ठरली आहे. ज्वारीचे पीक ११० ते ११५ दिवसात निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीच्या पिकास मोठ्या प्रमाणात (गरजेनुरूप) उपलब्ध होतो. मोकळी हवा, सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षाही निखळ तुरी पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक जोमदार येऊन अधिक उत्पादन मिळते. बाजरी + तूर (३:३) ः कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनी तथा उशिरा पेरणीसाठी या आंतर पीक पद्धतीची शिफारस केली आहे. बाजरी आणि तूर या पिकाचे ओळीचे प्रमाण ३:३ ठेवावे. ही आंतरपीक पद्धती उशिरा पेरणीसाठी फायदेशीर आहे. कापूस + उडीद (१:१), कापूस + मुग (१:१) एक ओळ कापसाच्या दोन ओळीतील अंतरामध्ये उडीद किंवा मुग घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. ही आंतरपीक पद्धती हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीमध्ये घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. कापसाच्या अमेरिकन संकरित (बीटी) आणि सरळ वाण (देशी कपाशी) यांच्यासाठी ९० बाय ९० व ९० बाय ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकन करून मध्ये उडिदाचे आंतरपीक घ्यावे. रासायनिक खतांच्या नियोजनात कापसाची शिफारस केलेली पूर्ण मात्रा, सोबतच २५ टक्के आंतरपिकाची खताची मात्रा मिळवून ही पूर्ण मात्रा कापूस + उडीद/ कापूस + मूग या आंतरपीक पद्धतीमध्ये वापरावी. कापूस + सोयाबीन (१:१) भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे, अशा भागात कापूस + सोयाबीन हे १:१ ओळीच्या प्रमाणात आंतरपीक घ्यावे. सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची उदा. एमएयुएस ७१ निवड करावी. उशिराने तयार होणाऱ्या वाणांची निवड आंतरपिकासाठी करू नये. सोयाबीन जलद वाढणारे आणि खादाड पीक आहे. खताच्या नियोजनात शिफारशीत केलेली ८० टक्के खताची मात्रा कापसाच्या ओळीत द्यावी. यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता, कापसाची वाढही चांगल्या प्रकारे होते. कापूस + तूर (६:१ / ८:१) ही एक पारंपारिक पट्टा पद्धती आहे. या आंतरपीक पद्धतीत कापसाच्या ६ किंवा ८ ओळीनंतर तुरीची एक ओळ घेतली जाते. सोयाबीन + तूर (४:२) मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्यवर्गीय असून हमखास उत्पन्न देणारी आंतरपीक पद्धती म्हणून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. मध्यम जमिनीत, हमखास पावसाच्या प्रदेशात व उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती आहे. डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३ (विषय विशेषज्ञ -कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com