सोयाबीनवरील कीडीची ओळख

सोयाबीनवरील कीडीची ओळख
सोयाबीनवरील कीडीची ओळख

सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढरी माशी इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. उत्तर कर्नाटकामध्ये प्रामुख्याने आढळणारी शेंदरी शेंग पोखरणारी अळी गेल्या वर्षापासून आपल्या राज्यातही आढळून येत आहे.  १) खोडमाशी  प्रादुर्भावाची वेळ ः या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो.  प्रादुर्भावाची लक्षणे : खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असतानाच सहजपणे ओळखू येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे १५ ते २० दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळल्यास त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही. शेवटी फक्त प्रौढ माशी निघून गेलेले छिद्र फांदीच्या खोडावर दिसते.  २) चक्री भुंगा :   प्रादुर्भावाची वेळ : - या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो.  प्रादुर्भावाची लक्षणे : शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते, तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. ही अळी नुकसान सुरू करू शकते. चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे खापेच्या वरील भाग वाळून जातो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ, फांदी व खोड आतून पोखरत जमिनीच्या दिशेने जाते.  ३) तंबाखूवरील पाने खाणारी अळी :  प्रादुर्भावाची वेळ : - या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात अधिक दिसून येतो. दिवसा या अळ्या पानांखाली अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री बाहेर पडून नुकसान पोचवतात.  प्रादुर्भावाची लक्षणे :  अंड्ड्यातून निघालेल्या सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या समूहाने पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानास छिद्र पाडत नाहीत. असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. मोठ्या झाल्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात. पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळ्या फुलेसुद्धा खातात.  ४) उंटअळ्या :  प्रादुर्भावाची वेळ : साधारपणे पीक १५ ते २० दिवसांचे झाले की त्वरित उंट अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसतो.  प्रादुर्भावाची लक्षणे :  या किडींच्या लहान अळ्या पानांच्या खालचा हिरवा भाग खरवडून खातात, त्यामुळे पानांचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. काही काळानंतर असे पातळ पापुद्रे फाटतात. त्या ठिकाणी छिद्रे दिसतात. मोठ्या अळ्या पानांना वेगवेगळ्या आकाराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.  ५) घाटे अळी : -  प्रादुर्भावाची वेळ : या किडीचा प्रादुर्भाव पीक एक महिन्याचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. पिकास फुले व शेंगा लागल्यानंतर तो वाढलेला आढळतो.  प्रादुर्भावाची लक्षणे ः   पिकास फुले लागलेली नसताना ही अळी पाने खाते. कळ्या, फुले व शेंगा लागल्यानंतर ती त्यांना नुकसान पोचवू लागते. प्रादुर्भावग्रस्त कळ्या, फुले व लहान शेंगा खाली जमिनीवर पडतात. मोठ्या शेंगांना ही अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. एकाच शेंगेला एकापेक्षा जास्त छिद्रेसुद्धा आढळतात. या अळीची विष्ठा, पानांवर, शेंगावर व खाली जमिनीवर पडलेली आढळते. ६) शेंदरी शेंग पोखरणारी अळी -  प्रादुर्भावाची वेळ व लक्षणे :  जुलैमध्ये लागवड झाल्यानंतर या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सुरू होतो. जास्त प्रादुर्भाव शेंगा पक्वतेच्या काळामध्ये ऑक्टोंबर महिन्यात होऊ शकतो. प्रथम अवस्थेतील अळी पिवळ्या रंगाची असते. ती शेंगाना छिद्र पाडून आत जाऊन बिया खाते. अळीची विष्ठा तेथे आढळून येते. नंतर पाचव्या अवस्थेत या अळीचा शेंदरी (गुलाबी) रंग होतो. त्यानंतर ती अळी शेंगाना छिद्र करून बाहेर जमिनीवर पडून कोषावस्थेमध्ये जाते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com