आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगात

गुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली आहे. मात्र, परिसरात उसाची उपलब्धता, गुऱ्हाळामध्ये स्वच्छता, कुशल व अकुशल मजुरांची उपलब्धता यांचा विचार करून या उद्योगात व्यावसायिक दृष्टिकोनातून उतरावे.
आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगात
आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगात

गुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली आहे. मात्र, परिसरात उसाची उपलब्धता, गुऱ्हाळामध्ये स्वच्छता, कुशल व अकुशल मजुरांची उपलब्धता यांचा विचार करून या उद्योगात व्यावसायिक दृष्टिकोनातून उतरावे. गेल्या ४० वर्षात प्रत्येक कुटुंबाची सरासरी शेती धारणा ही २ हेक्‍टर वरून १ हेक्‍टरपेक्षा ही कमी झाली आहे. परिणामी या शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नांचे प्रमाण कमी झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा कल हा उसासारख्या नगदी पिकाकडे वळत आहे. बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी हे साखर कारखान्यावर अवलंबून असले तरी अनेक ठिकाणी गूळ तयार निर्माण करणे हा प्रचलित व परंपरागत उद्योग आहे. गुळाचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी जागरूकता वाढत असल्याने त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. परिणामी गूळ प्रक्रिया उद्योगाकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. कोणताही उद्योग करायचे तर त्यात अनेक संधी आणि आव्हाने असतात. तो करण्यासाठीचे काही निकष असतात. गूळ उद्योगाच्या उभारणीतील काही शंका, प्रश्न व ते सोडवण्याच्या उपाययोजना यांची माहिती घेऊ. गूळ उद्योग कोणी करावा ? उद्योग कोणीही सुरू करू शकतो. मात्र, उद्योग उभारणी करणे व उत्तमरीत्या चालवणे हा एक वसा आहे. तो समर्थपणे पेलण्यासाठी व्यावसायिक बारकावे समजून घेण्याची नितांत गरज आहे. केवळ आपल्याकडे जमीन आहे किंवा उसाचे क्षेत्र आहे, गुंतवणुकीसाठी पैसा आहे म्हणून गूळ उद्योग सुरू करू नये. कितीही चांगले तंत्रज्ञान घेतले तरी उद्योगाची सफलता ही तुमच्या चिकाटी, जिद्द, समजून घेण्याची वृत्ती व व्यावसायिक प्रामाणिकपणा यावर अवलंबून असते. दुर्दैवाने हे आपल्या शिक्षण पद्धतीत शिकवले जात नाही. हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकावे व आत्मसात करावे लागते. दुरून सगळेच डोंगर साजरे दिसत असले तरी त्यातील अडचणी व आव्हाने जवळ गेल्यानंतर कळतात. असेच गूळ उद्योगाचेही आहे. गूळ उद्योगातील प्राप्त परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टीने काम करत मार्ग काढायची तयारी असल्यास या उद्योगामध्ये उतरावे. अन्यथा, आपल्या परिसरात बंद किंवा आजारी गुऱ्हाळे अनेक असू शकतात. गूळ उद्योगातील काही प्रमुख बाबी: गूळ बनवण्याच्या शास्त्राचे अभियांत्रिकी दृष्टीने अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये समावेश होतो. कोणत्याही अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कच्च्या मालाची नियमितता व गुणवत्ता, प्रक्रियेची स्वच्छता, प्रक्रियेसाठी वापरले तंत्रज्ञान, पक्क्या मालाची टिकवण क्षमता व गुणवत्ता या बाबी महत्त्वाच्या असतात. गूळ उद्योगात याचा विचार केला पाहिजे. कच्च्या मालाच्या निवडीचे निकष, गुऱ्हाळ घरांची स्वच्छतेला पूरक मांडणी, गूळ प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा प्रमाणात योग्य प्रमाणातील वापर व प्रक्रिया कार्यान्वित असताना घेतलेले वेगवेगळे निर्णय हे महत्त्वाचे ठरतात. गूळ उद्योग किती क्षमतेचा करावा? गूळ उद्योगाची क्षमता ही उसाचे प्रतिदिन गाळप या प्रमाणात सांगण्यात येते. आज बाजारामध्ये ५ टन प्रतिदिन ते ५०० टन प्रतिदिन या क्षमतेचे प्रकल्प उपलब्ध आहेत. आपल्याला गूळ उद्योग किती क्षमतेचा करायचा हे ठरवण्यासाठी पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या असतात १) आपली किती भांडवल गुंतवणूक (कॅपिटल कॉस्ट) करण्याची तयारी आहे. २) आपल्या उद्योगाच्या जवळ दहा ते वीस किलोमीटर परिसरात उसाचे क्षेत्र आहे का? हा ऊस आपल्याला योग्य दरात मिळतो का? ३) आपल्याकडे किती खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) आहे? ४) गुळाची बाजारपेठ कोणती? तयार झालेला गूळ कुठे, कधी व कोणत्या स्वरूपात विकणार आहात? ५) आपल्याकडे परिसरातील कौशल्य असलेले व पूर्णवेळ काम करणारे मनुष्यबळ किती आहे? ६) आपण याआधी गूळ उद्योग किंवा दुसरा कोणता उद्योग केला आहे का? वरील सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करून आपण किती क्षमतेचे गुऱ्हाळ करावे, हे साधारणपणे ठरवता येते. गूळ उद्योगातील मनुष्यबळ : गूळ उद्योग हा शेतीपूरक प्रक्रिया उद्योग असल्यामुळे साधारणपणे असे उद्योग हे शेती किंवा ग्रामीण भागात केले जातात. परंपरागत गूळ उद्योगात आपल्याला कुशल व अकुशल कामगारांची गरज असते. आज वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या शहरांच्या जवळ असलेल्या ग्रामीण भागात स्थानिक कामगार सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गूळ उद्योगात कुशल कामगारांमध्ये गुळव्या (गूळ बनवणारा) व काही प्रमाणात जळव्या (इंधन टाकून जाळ नियंत्रित करणारा) या दोघांचा समावेश होतो. गुळव्या हा आपल्या अनुभवाच्या जोरावर एखाद्या पारंगत स्वयंपाक्यासारखा गूळ बनवत असतो. जळव्या हा त्याच्या आदेशानुसार जाळावर नियंत्रण करून गूळ बनवण्याच्या प्रक्रियेत त्याला मदत करत असतो. गूळ बनवणे हे अनुभवसिद्ध काम असल्याने चांगला गुळव्या मिळवणे व टिकवून ठेवणे ही या व्यवसायातील मोठी अडचण असते. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या कौशल्यावर अवलंबून असलेला उद्योग हा कधीही अडचणीत येऊ शकतो. परंपरागत गूळ उद्योगांमध्ये अनेक अवजड व जोखमीची कामे असल्याने कामगार मिळण्यात अडचणी येतात. कुशल व अकुशल मनुष्यबळ समर्थपणे सांभाळणे, हे यशस्वी गूळ उद्योगाचे द्योतक आहे. गूळ उद्योगातील तंत्रज्ञान : अलीकडे गूळ उत्पादनासाठी स्वयंचलित प्रकल्प आहे का, अशी विचारणा होते. स्वयंचलित प्रकल्प म्हणजे एका बाजूने ऊस टाकायचा व दुसऱ्या बाजूने गूळ बाहेर पडेल, अशी अनेकांची समजूत असते. दुर्दैवाने असा प्रकल्प तरी अजून आमच्या पाहण्यात नाही. गूळ उद्योगामध्ये स्वयंचलित प्रकल्प म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. परंपरागत गूळ प्रकल्पामध्ये सर्व निर्णय हे गुळव्या किंवा प्रकल्पाचा मालक घेत असतो. या निर्णयांची अंमलबजावणी कामगार करत असतात. मात्र, स्वयंचलित प्रकल्पामध्ये काही निर्णय हे प्रकल्पातील प्रक्रियेच्या मोजमापावर घेतले जातात. उदा. गूळ बनवण्याचा पॉइंट, इंधन टाकण्याचे प्रमाण कमी जास्त करणे, रसाचा सामू (पीएच) नियंत्रित करणे इ. तसेच स्वयंचलित प्रक्रियेत कामगारांचे कष्ट कमी करण्याच्या योजना असतात. उदा. पाक ढवळणे, मळी काढणे, तयार झालेली चाचणी कढईतून थंड करावयाच्या वाफ्यात घेणे इ. स्वयंचलित प्रकल्पांचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. १) गुळाची नियमित गुणवत्ता मिळते. २) कुशल कामगारांवर कमी अवलंबून राहावे लागते. स्वयंचलित गूळ प्रकल्प घेण्यापूर्वी त्यामुळे आपले कोणते फायदे होणार आहेत, हे जाणून घ्यावेत. उद्योग म्हणून गुऱ्हाळाचा विचार ः

  • कोणताही उद्योग हा ग्राहकांच्या गरजा व मागणी यानुसार उत्पादनाची निर्मिती करतो. सुदैवाने आज लोक साखरेला पर्याय शोधत असून, गूळ त्यांना उत्तम पर्याय दिसतो. उत्पादित केलेला गूळ हा ग्राहकांच्या अपेक्षांना पात्र ठरला पाहिजे. अलीकडे गुळाचा वापर प्रामुख्याने सण समारंभाला अधिक असतो. त्याला वर्षभर मागणी राहण्याच्या दृष्टीने नियोजन केले पाहिजे.
  • ग्राहकांच्या प्रमुख अपेक्षा ः
  • हानिकारक रसायनांचा वापर नसावा.
  • स्वच्छ पद्धतीने गूळ बनवणे.
  • गुळामध्ये जास्त टिकवण क्षमता असणे.
  • वापरण्यासाठी सुलभ अशा पावडर किंवा खडा स्वरूपात असणे.
  • गुणवत्तेमध्ये सातत्य असणे.
  • या अपेक्षांना आपण तयार करत असलेला गूळ उतरला पाहिजे. यासाठी गूळ उद्योगातील बारकाव्यांचा अभ्यास करून व्यावसायिक दृष्टिकोनातून वाटचाल केल्यास या शेतीपूरक उद्योगात आपण यशस्वी होऊ शकतो. डॉ. विशाल सरदेशपांडे, ९३२५०११८६५ (अनुबंध सह प्राध्यापक, आय. आय. टी., मुंबई.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com