खरीप ज्वारी लागवडीची सूत्रे

पावसाचा अनियमितपणामुळे चाऱ्याची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. अशा वेळी खरीप ज्वारीची लागवड खालील सूत्रांचा वापर करून केल्यास फायदेशीर ठरेल.
खरीप ज्वारी लागवडीची सूत्रे
खरीप ज्वारी लागवडीची सूत्रे

अन्न आणि चारा उत्पादनासाठी महत्त्वाचे अन्नधान्य पीक म्हणजे ज्वारी. हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, सुमारे ४.१० लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. त्याची उत्पादकता १०.१८ क्विंटल प्रती हेक्टर आहे. पावसाचा अनियमितपणामुळे चाऱ्याची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. अशा वेळी खरीप ज्वारीची लागवड खालील सूत्रांचा वापर करून केल्यास फायदेशीर ठरेल. उत्पादन वाढीची प्रमुख सूत्रे

  • पेरणीचा कालावधी : जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा खरीप ज्वारी लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. पेरणीचा कालावधी लांबल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • बियाण्याचे प्रमाण : सुधारित वाणासाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
  • लागवडीचे अंतर व ताटांची संख्या : खरीप ज्वारीची पेरणी तिफणीने किंवा पाभरीने दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी व दोन झाडातील अंतर १५ सेंमी ठेऊन करावी. शिफारशीप्रमाणे हेक्टरी १.८० लाख झाडांची संख्या ठेवावी. त्या करिता गरज भासल्यास नांगी भरावी किंवा विरळणी करावी.
  • बीजप्रक्रिया : अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक, स्फुरद विद्राव्य जिवाणू २५० ग्रॅम प्रती ८ ते १० किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. उत्पादनात वाढ होते. उशिरा पेरणी करावी लागल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायामिथोक्झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी.
  • खत व्यवस्थापन : हेक्टरी ५ टन शेणखत मातीत चांगले मिसळून द्यावे. खरीप ज्वारीस ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रती हेक्टरी शिफारस आहे. त्यापैकी पेरणी करताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश द्यावे. शक्यतो पहिली मात्रा संयुक्त अथवा मिश्रखतातून (१५० किलो १०:२६:२६ मिश्रखत व ५० किलो युरियाच्या माध्यमातून) द्यावी. उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ८५ किलो युरियाद्वारे द्यावे. खते पेरणीच्या वेळी बियाण्याखाली ५ सेंमी द्यावी.
  • आंतर मशागत : पेरणीनंतर ८-१० दिवसांनी नांगी भरणी करावी. २० दिवसात १५ सेंमी अंतरावर १ रोप या प्रमाणे विरळणी करावी. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पीक ४०-४५ दिवसाचे होईपर्यंत दोन वेळा खुरपणी व दोन वेळा कोळपणी करावी. पेरणी झाल्यानंतर लगेच परंतु पीक उगवण्यापूर्वी अॅट्राझिन (५० टक्के डब्ल्यू. पी.) १ किलो प्रती हेक्टरी ७५०-१००० लीटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.
  • आंतरपीक : खरीप ज्वारी आणि सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात दोन ओळीतील लागवड करावी. तसेच खरीप ज्वारी अधिक तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणात लागवड करावी. ज्वारीचा नोंदणीकृत बिजोत्पादन कार्यक्रम घेत असताना आंतरपीक घेऊ नये.
  • बहुविध पीक पद्धती :- खरीप ज्वारी नंतर हरभरा किंवा जवस किंवा करडईची लागवड करावी.
  • पीक संरक्षण : (फवारणी प्रमाण -प्रती लीटर पाणी)
  • खोडमाशीच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर १४ दिवसांनी फवारणी, सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) २ मिली.
  • खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २ मिली.
  • अधिक लोह, जस्तयुक्त ज्वारी वाण ः परभणी शक्ती कोरडवाहू परिस्थीतीत कडबा आणि धान्यांचे उत्तम उत्पादन देणारे ज्वारीसारखे अन्य पीक नाही. मात्र, पीक परिपक्व होत असताना पाऊस आल्याने ज्वारीच्या दाण्यावर बुरशी वाढते. ज्वारी काळी पडते. परिणामी उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांना त्या तुलनेत उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून प्रसारित केलेले परभणी शक्ती या सरळ वाणाची लागवड करावी. या वाणाची वेळेवर काढणी केल्यास फायदेशीर ठरू शकते. वैशिष्ट्ये ः

  • परभणी शक्ती (पीव्हीके १००९) हा धान्य व कडब्याचे अधिक उत्पादन देणारा वाण विकसित करण्यात आला. या खरीप ज्वारी वाणामध्ये लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक प्रमाण असून, २०१८ या वर्षी महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला.
  • वंशावळ : आएस २६९६२-१ यापासून निवड
  • धान्य उत्पादन क्षमता : ३८.०० क्विंटल प्रती हेक्टर. ( अन्य तुल्यबळ वाण पीव्हीके ८०१ च्या तुलनेत २८.८६ टक्के व पीव्हीके ८०९ च्या तुलनेत २७.५८ टक्के जास्त उत्पादन देते. )
  • या वाणात लोह (४२ मिलीग्रॅम प्रती किलो) व जस्ताचे (२५ मिलीग्रॅम प्रती किलो) प्रमाण पीव्हीके ८०१ व इतर प्रचलित वाणांच्या तुलनेत अधिक आहे.
  • कडबा उत्पादन क्षमता : ११८.८३ क्विंटल प्रती हेक्टर. (अन्य तुल्यबळ वाण पीव्हीके ८०१ (परभणी श्वेता) च्या तुलनेत १६.८४ टक्के जास्त उत्पादन देते.)
  • या वाणाची धान्य तसेच कडब्याची प्रत ही तुल्यबळ वाण पीव्हीके ८०१ च्या बरोबरीची आहे.
  • हा वाण ज्वारीतील दाण्यावरील बुरशी रोगास, खोडमाशी तसेच खोडकिड्याला मध्यम सहनशील आहे.
  • सत्यता दर्शक बियाणाच्या बॅगेचे वजन ४ किलो असून, त्याची किंमत रु. २४० एवढी आहे.
  • डॉ. के. आर. कांबळे, ९४२१३२५५७५, डॉ. एल. एन. जावळे, ९४२१०८५९४७, डॉ. आर. आर. धुतमल, ७०३८०९१००४ (ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com