किवी फळापासून प्रक्रिया पदार्थ

किवी फळापासून प्रक्रिया पदार्थ
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थ

किवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व गोड फळ आहे. मूलतः चीनमधील या फळाची भारतात लागवड हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये केली जाते. किवी फळझाडांची लागवड प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळते. किवी फळ बहुगुणी असून त्यात क, के, आणि ई ही जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात आहेत. याचबरोबर किवीमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असून, शरीराला आवश्यक असणारी ‘अँटिऑक्सिडंट घटक ही भरपूर प्रमाणात आहे.

शास्त्रीय नाव : ॲक्टिमीडिया डेलिसिओेसा पोषक मूल्ये प्रति १०० ग्रॅम

  • उष्मांक : ६१ किलोकॅलरी
  • कर्बोदके : १४.६६ ग्रॅम १५ टक्के
  • साखर : ८.९९ ग्रॅम
  • चरबी : ०.५२ ग्रॅम
  • प्रथिने : १.४४ ग्रॅम
  • पाणी - ८३ टक्के
  • जीवनसत्त्वे : क - ९२.७ मि.ग्रॅम ११२ टक्के, के - ४०.३ मि. ग्रॅम ३८ टक्के, ई - १.४६ मि. ग्रॅम १० टक्के.
  • खनिजे ः
  • १. कॅल्शिअम - ३४ मि. ग्रॅम - ३ टक्के
  • २.लोह - ०.३१ मि. ग्रॅम - २ टक्के
  • ३. तांबे - ०.१३ मि. ग्रॅम - ७ टक्के
  • औषधी गुणधर्म : किवीमधील फायबर आणि पोटॅशिअम हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते. पोटॅशिअमचे सेवन, सोडिअमचे प्रमाण कमी राहिल्यास हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका वाढतो. या फळांमध्ये ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे फायदा होतो.

  • किवी फळातील पोटॅशिअम मुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
  • किवी या फळामध्ये क जीवनसत्त्व हे ‘संत्रा’ फळाच्या तुलनेत पाच पटीने जास्त असतात.
  • किवी फळाच्या रसामुळे मुतखडा कमी होण्यास मदत होते.
  • किवी फळाचा रोजच्या आहारामध्ये वापर केल्यास बद्धकोष्ठता कमी होते.
  • या फळाच्या सेवनामुळे रक्तातील प्लेटलेटस् वाढतात.
  • प्रक्रियायुक्त पदार्थ : १. किवी बर्फी :

  • ५० किलो किवी हे फळे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यातील गर काढून घ्यावा. काढलेला गर एका कढईमध्ये घेऊन त्यामध्ये १० किलो साखर टाकून त्याचे मिश्रण तयार करावे. या मिश्रणाला १० ते १५ मिनिटे ६० अंश सेल्सिअस इतकी उष्णता द्यावी. एका कढईमध्ये ५ लिटर दूध घेऊन त्यामध्ये ५ किलो खवा व ४ किलो दूध पावडर मिसळून घ्यावी. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत उष्णता द्यावी.
  • तयार झालेल्या मिश्रणामध्ये किवीची साखर मिसळून तयार केलेला गर मिसळून घ्यावा. त्याला मंद आचेवर (१५ ते २० अंश सेल्सिअस तापमान ) १५ मिनिटांपर्यंत उष्णता द्यावी.
  • तयार झालेले मिश्रण हे एका तुपाचा लेप दिलेल्या सपाट ट्रेमध्ये पसरवून थंड करून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.
  • २. जॅम -

  • परिपक्व किवीची फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. धुतलेल्या किवीपासून गर वेगळा करावा. जॅम बनविण्याकरिता गराच्या वजनाएवढी साखर मिसळावी. त्यात प्रतिकिलो जॅम बनविण्याकरिता १.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून एकजीव मिश्रण करावे.
  • हे मिश्रण मंद आचेवर ढवळत राहावे. तयार झालेल्या मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश इतका झाल्यावर उष्णता देणे बंद करावे.
  • तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या भरणीत गरम गरम भरावा. बाटल्याची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी.
  • ३. जेली-

  • किवीपासून रस काढून घ्यावा. रसाच्या वजनाएवढी साखर आणि प्रतिकिलो सायट्रिक ॲसिड १.५ ग्रॅम मिसळावे.
  • जेलीला घट्टपणा येण्याकरिता पेक्टिन (फूडग्रेड) ४-६ ग्रॅम वापरून मंद आचेवर तापवावे.
  • तापवत असताना ब्रिक्स तपासून पाहावा. ६७.५ ब्रिक्स अंश झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे.
  • तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. झाकण लावून हवाबंद करावे. जेलीची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
  • सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com