कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली ओळख

जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (ता. धरणगाव) व परिसरातही कापूस हे प्रमुख पीक आहे. मात्र, या पारंपरिक पिकासोबत लाडली येथे भेंडी पिकाची उत्तम शेती केली जाते.
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली ओळख
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली ओळख

जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (ता. धरणगाव) व परिसरातही कापूस हे प्रमुख पीक आहे. मात्र, या पारंपरिक पिकासोबत लाडली येथे भेंडी पिकाची उत्तम शेती केली जाते. येथे उत्पादित होणारी भेंडी निर्यातक्षम असून, वाशी (मुंबई) येथील बाजारातही चांगली ओळख मिळवली आहे. कापूस पट्ट्यात लाडलीने भेंडी पिकाची कास धरली असून, काढणीच्या हंगामात गावातून रोज १० ते ११ मेट्रिक टन भेंडी बाजारात पाठवली जाते. गिरणा नदीकाठी वसलेल्या लाडली गावातील जमीन काळी कसदार, हलकी व मध्यम प्रकारची आहे. नदीकाठाकडील भागात जलसाठे मुबलक असून गावाच्या पश्‍चिम, दक्षिण भागात जलसाठे कमी आहेत. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन कि.मी. एवढ्या अंतरावरून जलवाहिन्या टाकत सिंचनाची सुविधा केली आहे. या गावात कपाशी हे प्रमुख पीक असून, काही प्रमाणात केळीही आहे. रब्बीमध्ये मका, हरभरा, गहू ही पिके असतात. मात्र, घरात खेळता पैसा येण्याच्या उद्देशाने गावातील दोन तीन प्रयोगशील शेतकऱ्यांनी २००५ मध्ये भेंडी लागवडीचा प्रयोग केला. त्यात फायदा दिसून आल्याने कापसाचे क्षेत्र कमी करून भेंडी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. भेंडी उत्पादकांची संख्या वाढत आज गावात १२० शेतकरी भेंडी पीक घेतात. दरांमध्ये चढउतार असले तरी शेतकऱ्यांची एक ते पाच एकरपर्यंत भेंडी असते. गावाचे एकूण शिवार सुमारे २७३ हेक्‍टर असून, त्यातील दरवर्षी सुमारे १८० ते २०० एकर भेंडीखाली असते. पावसाळ्यातील लागवड अधिक पावसाळ्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये भेंडीची अधिक लागवड केली जाते. जानेवारीमध्ये लागवडीची उन्हाळी भेंडीही गावात असली तरी मजुरांची समस्या, उष्णता यामुळे तिचे पावसाळी भेंडीच्या तुलनेत क्षेत्र कमी असते. पावसाळ्यातील भेंडीला सिंचनाची गरजही कमी असते. हलक्‍या, पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रात ही भेंडी अधिक असते. सुमारे १५ ते २० शेतकरी पावसाळ्यात भेंडीला ठिबकची व्यवस्था करतात; तर उर्वरित शेतकरी पाट पद्धतीने सिंचन करतात. भेंडीकाढणी लागवडीनंतर ४५ दिवसांत सुरू होते. काढणीला मजुरांची गरज असते. या पिकामुळे गावात रोजगार मिळतो. त्यातून महिलांना १५० रुपये प्रतिदिन इतकी मजुरी मिळते. लहान शेतकरी काढणीसाठी आपल्या कुटुंबीयांवर अवलंबून असतात. जागेवरच खरेदी; वाशीच्या बाजारातून निर्यात लाडलीच्या भेंडीची खरेदी जागेवरच किंवा शिवारात केली जाते. अनेक मध्यस्थांनी आपले शेतकरी जोडून ठेवले आहेत. ते आपल्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम भेंडीसाठी बियाणे व कीडनाशकांचा पुरवठा करतात. काढणीनंतर त्याची रक्कम येणाऱ्या उत्पन्नातून कपात करतात. मध्यस्थ वाशी (मुंबई) येथील बाजारात पाच व तीन किलोच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून भेंडीची पाठवणूक करतात. भेंडीची वाशी बाजारातील मोठे खरेदीदार आखातासह युरोपात निर्यात करतात. दोन रुपये प्रिमियम, दर टिकून लाडलीच्या भेंडीला पंचक्रोशीतील इतर गावांमधील भेंडीच्या तुलनेत दरवर्षी किलोमागे दोन रुपये अधिक दर मिळतो. त्याचे कारण म्हणजेच शेतातच प्रतवारी, चांगली हाताळणी, लांबलचक, चवदार, हिरवीगार, चमकदार भेंडीचे उत्पादन. २०१७ मध्ये प्रतिकिलो २० ते २८ रुपये, २०१८ मध्ये २५ ते ४० रुपये आणि २०१९ मध्येदेखील २४ ते ३५ रुपये प्रतिकिलो असे चांगले दर जागेवर मिळाले आहेत. काढणीच्या हंगामात गावातून रोज १० ते ११ मेट्रिक टन भेंडीची पाठवणूक केली जाते. असे आहे नफ्याचे गणित भेंडीला मागील तीन वर्षे सरासरी ३० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे. भेंडीला काढणी व कीडनाशके फवारणीचा खर्च अधिक येतो. लागवडीनंतर ४५ दिवसांनंतर काढणी सुरू होते. दर एक दिवसाआड काढणी केली जाते. किमान ५० तोडे केले जातात. मागील दोन वर्षे एकरी एक लाख १० हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्यात एकरी सर्व खर्च वगळता निव्वळ नफा ६० ते ६५ हजार रुपये मिळतो.

मी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात दोन एकरामध्ये भेंडीची लागवड करतो. खर्च वजा जाता एकरी किमान ६० हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. दर कमी जास्त होतात, त्याप्रमाणे नफ्याचे प्रमाण कमीजास्त होते. आमची जमीन हलकी असली तरी जिद्दीने भेंडीचे दर्जेदार, भरघोस उत्पादन आम्ही साध्य करतो. भेंडीची गावातील ८५ टक्के शेतकरी लागवड करतात. - गजानन प्रताप पाटील, ९६२३३३९५१९ शेतकरी, लाडली (ता. धरणगाव, जि. जळगाव).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com