पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये 

पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये 
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये 

पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची आवश्यकता असून, प्रत्येक अन्नद्रव्य पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करते. या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर विपरीत परिणाम होतात. अन्नद्रव्यांचे वर्गीकरण हे प्रामुख्याने पिकांच्या आवश्यकतेनुसार म्हणजेच भरपूर लागणारी (मुख्य), मध्यम प्रमाणात लागणारी (दुय्यम) आणि कमी प्रमाणात लागणारी (सूक्ष्म) अन्नद्रव्ये असे केले जाते. या सर्व अन्नद्रव्यांचे कार्य समजून घेऊन, त्यांचा विविध खतांद्वारे वापर केल्यास पिकांच्या जीवनचक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होतात. पिके निरोगी राहून उत्पादनामध्ये वाढ होते. 

नैसर्गिकरीत्या माती, पाणी आणि वातावरणातील हवेतून मोठ्या प्रमाणात पुरविली जाणारी अन्नद्रव्ये म्हणजे कर्ब, हायड्रोजन, ऑक्सिजन. ही अन्नद्रव्ये पिकांच्या आंतरिक प्रक्रियेत भाग घेतात. मात्र, खतांद्वारे पुरवठा करण्याची गरज नसते. 

नत्र :  कार्य ः पिकांच्या शरीरातील प्रथिने आणि हरितद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा नत्र हा महत्त्वाचा घटक आहे. नत्रामुळे पिकांची पाने हिरवीगार होऊन पानांची आणि खोडाची वाढ झपाट्याने होते. नत्रामुळे अन्नधान्य आणि कडधान्य बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. नत्राच्या योग्य पुरवठ्यामुळे स्फुरद, पालाश व अन्य अन्नघटकांच्या शोषणाला मदत होते. 

कमतरता ः नत्राच्या कमतरतेमुळे झाडांची अधिक परिपक्व झालेली पाने अगोदर हळूहळू पिवळी पडतात. मुळे आणि खोडांची वाढ मंदावते. झाडांना नवीन फूट होत नाही, फुले कमी येतात; तृणधान्य, दाणे व फळे पूर्णपणे पक्व होत नाहीत.  अधिक्य ः अधिक नत्रामुळे पालवीची अधिक वाढ होते. ती लुसलुशीत होऊन किडीचा प्रादुर्भाव वाढतो. 

स्फुरद :  कार्य ः पिकांच्या पेशींचे विघटन आणि त्यांच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज असते. स्फुरदाच्या यथायोग्य उपलब्धतेमुळे अंकुरण लवकरच होते. बाल्यावस्थेत लवकर मुळ्या फुटतात. मुळ्यांचे जाळे तयार झाल्याने पीक जमिनीवर लोळत नाही. फुले, दाणे भरपूर येतात. त्यातील खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढते. द्विदल वनस्पतीमध्ये स्फुरदाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळ्यांवरील गाठींच्या प्रामाणात वाढ होते. 

कमतरता ः स्फुरदाच्या कमतरतेमुळे सर्वसाधारणपणे पिकांची वाढ खुंटते. तृणधान्य, फळे आणि कडधान्याचे उत्पादन कमी होते. पानांवर जांभळसर छटा दिसते. पानावरील दाट हिरवेपणा आणि जांभळी छटा हे स्फुरदाच्या कमतरतेचे मुख्य लक्षण असते. आवश्यकतेपेक्षा स्फुरदाची अधिक मात्रादेखील पिकांवर अनिष्ट परिणाम घडवून आणते. 

पालाश :  कार्य ः पिकांची वाढ जोमदारपणे होऊन धांड्यामध्ये ताठपणा येतो. पिके अधिक वाढली तरी जमिनीवर लोळत नाहीत. कोरडवाहू शेतीमध्ये पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते. पेशींमध्ये पाणी अधिक साठवून राहते. पिकांमध्ये पिष्टमय आणि शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशाची गरज असते. पालाश हा विकराचा महत्त्वाचा घटक असून संश्लेशित शर्करा आणि पिष्टमय पदार्थ बिया, मुळे, कंद, फळांकडे वाहून नेण्याचे कार्य करते. प्रथिने तयार करण्याचे कामही पालाशमुळे नियंत्रित केले जाते. कीड-रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा पालाशमुळे वाढते. फळाचा आणि दाण्याचा रंग चकाकदार होतो. 

कमतरता ः जुन्या पानाच्या कडा पिवळसर होऊन पानांवर तांबडे ठिपके पडतात. सर्वसाधारण पिकांची वाढ मंदावते. पिकांचे धांडे कमजो18र होतात, शेंडे जळतात, बिया आणि फळांचा आकार ओबडधोबड होतो. 

मध्यम प्रमाणात लागणारी दुय्यम अन्नद्रव्ये-  चुना (कॅल्शिअम) :  कार्य ः हे अन्नद्रव्य पिकांच्या पेशीच्या आवरणाचा एक घटक असून, त्यामुळे पेशींची वाढ चांगली होते. पिके कॅल्शिअममुळे पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात, पिकांमध्ये योग्य ओलावा टिकविण्याचे कार्य चुन्यामुळे होते. चुन्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक योग्य राखून पिकांना इतर अन्नद्रव्यांच्या शोषणप्रक्रियेत मदत होते. चुन्यामुळे बीजनिर्मितीस चालना मिळते.  कमतरता ः कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानांवर आणि नवीन अंकुरणाऱ्या शेंड्यावर दिसतात. पानाच्या कडा फिकट होऊन मागे-पुढे मुडपतात. रोपे मुडपल्यासारखी होतात. 

मॅग्नेशिअम :  कार्य ः हे अन्नद्रव्य पानातील हरितद्रव्याचा केंद्रीय घटक असून, प्रकाश संश्लेशन क्रियेत भाग घेते. पानामध्ये अन्न तयार होऊन रंग येतो. मॅग्नेशिअम विकरांना क्रियाशील करण्यास मदत करते. प्रथिनांची निर्मिती कर्बोदके व मेद तयार करण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेशिअमचे कार्य महत्त्वाचे आहे. 

कमतरता ः मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे प्रथम जुन्या आणि नंतर नव्या पालवीस पिवळसर रंग येतो. जुन्या पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानावर हिरवे-पिवळे डाग पडतात. त्यानंतर काही भाग तपकिरी होतो. पाने गळून पडतात. 

गंधक :  कार्य ः गंधकाची सर्वाधिक गरज तेलबिया उत्पादनासाठी असते. कर्बोदके, प्रथिने, हरितद्रव्ये आणि ग्लुकोसाइटच्या निर्मितीसाठी गंधकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. गंधकाच्या प्रमाणशील उपलब्धतेमुळे जीवनसत्त्व ब, लिपोईक आम्ल, फॅरिडॉक्झिन आणि ग्लुईथाईनच्या जीवरासायनिक प्रक्रियेचा वेग वाढविण्यास मदत होते. 

कमतरता ः पिकाची वाढ खुंटते. प्रथम कोवळी पाने पिवळी पडतात. वाढबिंदूची वाढ खुंटायला लागते. पूर्ण परिपक्व आणि जुन्या पानांवर पिवळ्या-लाल- नारंगी रंगाची छटा पसरते. ती गळून पडतात. पिकांचे धांडे आणि पानांचे शेंडे कमजोर होऊन शेवटी गळून पडतात. फळधारणा मंदावते. द्विदल धान्यामध्ये नत्रस्थिरीकरण प्रक्रियेचा वेग कमी होतो. फुले कमी आणि वांझ निर्माण होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com