पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

सध्या पावसाळी वातावरणामुळे वेलींच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग जोरात वाढला. वेलीतील जिबरेलीन्सचे प्रमाण वाढलेले असून, सायटोकायनीन कमी झाले. परिणामी काही समस्या बागेत जाणवू शकतात.
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे व्यवस्थापन
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे व्यवस्थापन

गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. पावसानंतर काही काळ उघडीप मिळाली तरी बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे द्राक्षबागेत समस्या वाढताना दिसत आहेत. तापमानात घट झालेली असून आर्द्रतासुद्धा वाढलेली आहे. वेलींच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग जोरात वाढला. वेलीतील जिबरेलीन्सचे प्रमाण वाढलेले असून, सायटोकायनीन कमी झाले. परिणामी काही समस्या बागेत जाणवू शकतात. वेलीचा वाढता जोम ः पावसाळी वातावरणामुळे वेलीचा जोम सतत वाढताना दिसून येईल. यावेळी शेंडा वाढ जोमात होऊन पेऱ्यातील अंतर वाढलेले दिसेल. अशा स्थितीत काडीवरील शेंड्याकडील डोळ्यात बाळी निघताना दिसून येईल. यामुळे उशिरा छाटलेल्या बागेत सूक्ष्मघड निर्मितीची समस्या जाणवेल. हे टाळण्याकरिता वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असेल. वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता महत्त्वाच्या उपाययोजना - १) शेंडा पिंचिंग करणे, २) नत्राचा वापर बंद करणे, ३) पालाशची उपलब्धता फवारणी व जमिनीद्वारे करणे, ४) वेलीवर निघालेल्या बगलफुटी काढून टाकणे इ. वर सुचवलेल्या उपाययोजना केल्यानंतर सबकेनवरील मुख्य डोळा फुटण्याची समस्या दिसून येते. वाढ विरोधकांचा व बाजारात उपलब्ध टॉनिक किंवा संजीवकांचा वापर जास्त केलेल्या बागेमध्ये वेलीतील सायटोकायनीनचे प्रमाण अचानक वाढते. परिणामी हा डोळा (टायगर बड) फुटतो. उशिरा खरड छाटणी झालेल्या बागेत सूक्ष्मघड निर्मितीची समस्या येऊ शकते. काही बागेत नुकतेच सबकेन तयार झाल्याची किंवा काही बागेत सबकेनसुद्धा झालेले नाही, अशी परिस्थिती असेल. अशा ठिकाणी नत्राचा वापर पूर्णपणे बंद करावा. स्फुरद व पालाशयुक्त खत वेलीस उपलब्ध करावे. अशा परिस्थितीत ०-४०-३७ हे खत २ ते ३ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे फवारणी करावी. ज्या बागेत वाढीचा जोर जास्त असेल, तिथे पालाशयुक्त खतांचा पुरवठा महत्त्वाचा असेल. यामध्ये ०-०-५० किंवा एसओपी या ग्रेडमध्ये उपलब्ध खत जमिनीतून चार ते पाच किलो प्रती एकर प्रमाणे द्यावे. ज्या वेलीवर ०-४०-३७ किंवा पालाशची फवारणी केली आहे, त्यावर दुसऱ्या खतांची फवारणी शक्यतो टाळावी. वातावरणातील जास्त बदलामुळे संजीवकांची फवारणी महत्त्वाची असेल. ज्या ठिकाणी बगलफुटी निघाल्या आहेत, त्या फुटींवर दोन ते तीन पाने अवस्थेत ६ बीए ( १० पीपीएम ) अशी फवारणी करावी. दुसरी फवारणी ४ ते ५ दिवसाच्या अंतराने युरासील (२५ पीपीएम) ची करावी. वेळीच छाटणी झालेल्या बागेत सूक्ष्मघड निर्मिती या पूर्वीच झालेली असावी. या बागेत बदलत्या वातावरणात शेंडा वाढ वरील परिस्थितीच्या तुलनेत कमी होईल. परंतु, काडीची परिपक्वता लांबणीवर जाण्याची शक्यता असेल. या करिता पालाशयुक्त खताचा वापर फक्त गरजेचा असेल. या सोबत शेंडा पिंचिंग करून घ्यावे. फक्त टिकली मारणे या वेळी फायद्याचे असेल. बऱ्याचशा बागेत शेंडा पिंचिंग केल्यानंतर निघालेल्या बगलफुटीवर नवीन घड दिसून येतात. अशा स्थितीत द्राक्षबागायतदार संभ्रमात पडतो. मात्र, याचा परिणाम पुढील हंगामात होत नाही. यामुळे शेंड्यावरील फक्त टिकली बाहेर काढावी. बऱ्याचदा बागायतदार पाऊस आला की पालाश व स्फुरदयुक्त खताची फवारणी करतात. त्यासोबत संजीवकांचा भडिमार करतात. त्यामुळे विनाकारण खर्च वाढतो. शक्यतोवर हे टाळण्याकरिता फक्त पालाशयुक्त खतांचा पुरवठा करणे व शेंडा पिंचिंग करणे इतकाच उपाय महत्त्वाचा ठरतो. खुंटरोप व्यवस्थापन सध्याच्या परिस्थितीत खुंट रोपाची लागवड केलेल्या बागेत या वातावरणात वाढ होणे गरजेचे आहे. मात्र, मागील महिन्यापर्यंत वाढत्या तापमानामध्ये रोपांची वाढ चांगली झाली नसेल. खुंट रोपाच्या फुटींची वाढ थांबलेली असावी. अशा वेळी काडीची परिपक्वतासुद्धा झाली असेल. वाढ झाली नसल्यास काडी बारीक राहिली असेल. ही काडी बारीक राहिल्यास कलम करण्याकरिता आवश्यक ती जाडी मिळणार नाही. या गोष्टींचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत खुंटरोपांचा रिकट घेणे महत्त्वाचे आहे. हा रिकट घेण्याची वेळ महत्त्वाची आहे. जमिनीपासून एक ते दोन डोळे सोडून रिकट घ्यावा. यानंतर निघालेल्या फुटींचे व्यवस्थापन व्यवस्थितरीत्या करण्याकरिता डिएपी ३० ते ४० किलो व युरिया १० ते १५ किलो प्रती एकर प्रमाणे जमिनीतून उपलब्धता करावी. या नंतर निघालेल्या फुटीपैकी सरळ, सुदृढ व निरोगी तीन ते चार फुटी राखून इतर फुटी काढून घ्याव्यात. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com