कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापन

मागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या आढळून येत आहे. ही प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आढळून आली.
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापन
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापन

मागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या आढळून येत आहे. ही प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आढळून आली. अशा बहुतांश बोंडांचा बाहेरील भाग निरोगी वाटत होता. काही बोंडांवर रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली होती. ही बोंडे फोडून बघितल्यानंतर आतील विकसित होणारे कपाशीचे तंतू व बिया मुख्यतः पिवळे ते गुलाबी रंगाचे होऊन सडल्याचे आढळले. बोंडातील बहुतांश एक ते दोन कप्पे, तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे दिसले. मात्र, आत कुठलाही कीटक किंवा अळी आढळली नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रमासहघबराटीचे वातावरण तयार झाले आहे. या समस्येची शहानिशा करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांंनी गेल्या वर्षी समस्याग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान काही भागात थोड्याफार प्रमाणावर आंतरिक बोंड सडण्याचा प्रकार दिसून आला होता. विविध सामाजिक माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचेही समजले. यामागील वास्तविक शास्त्रीय कारण शास्त्रज्ञांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावरील व्यवस्थापन असे. कपाशीतील बोंड सडण्याचे प्रकार व कारणे : मुख्यतः बोंड सडण्याचे दोन प्रकार आढळतात. १) बोंडाच्या बाहेरील पृष्ठभागावरून होणारा संसर्ग ः या प्रकारात मुख्यतः मृतजीवी, काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला कारणीभूत जिवाणू यांचा समावेश असतो. ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता असे घटक ह्या प्रकारच्या बोंड सडण्याला पोषक असतात. बोंडे उमलण्याच्या प्राथमिक अवस्थेत असे प्रकार साधारणतः आढळून येतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशीची वाढ झाल्याचे आढळते. २) आंतरिक बोंड सडणे ः ही समस्या प्रामुख्याने कमी प्राणवायू असताना तग धरणारे रोगकारक जीवाणू आणि आंतरिक रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. पावसाळ्यात होणारा संततधार पाऊस, ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व बोंडावरील रस शोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव या घटकांमुळे आंतरिक बोंड सडण्याची समस्या दिसून येते. बोंडाच्या बाह्य भागावर बुरशीची वाढ साधारणतः आढळून येत नाही. अशी बोंडे फोडून पाहिली असता जीवाणूंच्या प्रादुर्भावाने आतील रुई पिवळसर ते गुलाबी-तपकिरी रंगाची किंवा डागाळलेली दिसून येते. बोंडावरील पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो, अशा ठिकाणी जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. असा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याऐवजी नियमित निगराणी व कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच अवलंबाव्यात. बोंडे सडण्याच्या विकृतीवर उपाययोजना : १. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. यामुळे त्याठिकाणी रोगकारक घटकांची वाढ होणार नाही. २. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत रस शोषणारे ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी वेळेत योग्य उपाययोजना कराव्यात. ३. सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अतिआर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण्याच्या विकृती व्यवस्थापनासाठी पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी. (प्रमाण प्रति लिटर पाणी) कॉपर ऑक्सीक्लोराइड (५०% डब्लूपी.) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.२ ग्रॅम (टॅंक मिक्स) ४. बोंडाच्या बाहेरील पृष्ठभागावरून होणारा बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझीम (५०% डब्लू.पी.) १ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन (२०% डब्लू.जी.) १ ग्रॅम. ५. गरजेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. संपर्क ः डॉ. दीपक नगराळे, ९८२२३१४६४७ (केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com