जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
मसाला पिके
आले पिकावरील कंदमाशीचे व्यवस्थापन
सध्याच्या स्थितीमध्ये शेतात मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या किडींच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
आले पिकामध्ये कंदमाशी, खवले कीड, खोडकिडा, फुलकिडे अशा विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होते. हा प्रादुर्भाव शेतामध्ये व साठवणूक केलेल्या आल्यावरही होतो. मात्र, सध्याच्या स्थितीमध्ये शेतात मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या किडींच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
कंदमाशी ः
- सध्या महाराष्ट्रामध्ये या किडीचा आले (अद्रक) व हळद पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. कंदमाशी मुंगळ्याच्या आकाराची काळसर रंगाची असून, तिचे पाय शरीरापेक्षा लांब असतात.
- अळी पिवळसर पांढरी, बिनपायाची व डोक्याकडे निमुळती होत गेलेली असते. कंदमाशीची अळी अवस्था ही नुकसानकारक आहे. अळी आल्याचे कंद पोखरून आत शिरते. अळ्या कंदामध्ये शिरकाव केल्यामुळे पिथियम, फ्युजारियम या बुरशीजन्य रोगाची वाढ होते. कंद मऊ पडून कुजू लागतात. पुढे पाने पिवळी पडून संपूर्ण झाड वाळून जाते.
- जीवनक्रम ः कंदमाशी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. मादी माशी मातीच्या लहान ढेकळाखाली, जमिनीच्या भेगेत किंवा पृष्ठभागावर एकएकटी किंवा समुहाने अंडी घालते. अंड्यातून २ ते ५ दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. त्या कंदामध्ये शिरून उपजीविका करतात. अळ्यांची १३ ते १८ दिवसात पूर्ण वाढ होऊन कंदामध्येच कोषावस्थेत जातात. कोषावस्था १० ते १५ दिवसाची असते. नंतर कोषामधून प्रौढ माशी बाहेर पडते. अशाप्रकारे ४ आठवड्यामध्ये जीवनक्रम पूर्ण होतो.
एकात्मिक व्यवस्थापन ः
- हंगाम संपल्यानंतर शेतातील शिल्लक राहिलेले कंद, किडग्रस्त कंद व पिकाचे अवशेष जमा करून त्यांचा नायनाट करावा.
- प्रादुर्भावग्रस्त कंदाची साठवणूक करू नये.
- लागवडीसाठी निरोगी कंदाची निवड करावी.
- जास्त प्रादुर्भाव झालेली साठवणुकीतील कंद वेगळे करून नष्ट करावेत.
- शेतात उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत.
- पिकाची फेरपालट करावी. आले पिकानंतर पुन्हा आले किंवा हळद पीक त्याच जमिनीमध्ये घेऊ नये.
रासायनिक व्यवस्थापन
- आले पिकाच्या साठवणीअगोदर आणि लागवडीपूर्वी ती क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवावीत.
- जमिनीतून क्लोरपायरीफॉस (५० टक्के) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेवून आळवणी करावी.
- जुलै ते ऑक्टोबर दरम्यान १५ दिवसाच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मिली किंवा डायमिथोएट (३० टक्के) १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
टीप- लेखात उल्लेख केलेली कीडनाशके लेबल क्लेम किंवा संयुक्त ॲग्रेस्को अंतर्गत शिफारशीत आहेत.
डॉ. भय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८
(विषय विशेषज्ञ- किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
----
- 1 of 4
- ››