agriculture stories in marathi, management of waste water in rural area agrowon special article on drought | Agrowon

ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन 
डॉ. उमेश मुंडल्ये
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे काम गृहनिर्माण प्रकल्प, शाळा, महाविद्यालये, इतर आस्थापने यांनी त्यांच्या परिसरात केले तर एकूणच सांडपाणी नैसर्गिक स्रोतांमध्ये मिसळणं बंद होईल आणि जलस्रोत चांगले राहतील. यासाठी लोकसहभाग आणि सातत्य महत्त्वाचे आहे. 

शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे काम गृहनिर्माण प्रकल्प, शाळा, महाविद्यालये, इतर आस्थापने यांनी त्यांच्या परिसरात केले तर एकूणच सांडपाणी नैसर्गिक स्रोतांमध्ये मिसळणं बंद होईल आणि जलस्रोत चांगले राहतील. यासाठी लोकसहभाग आणि सातत्य महत्त्वाचे आहे. 

मागील लेखामध्ये आपण निवासी भागातील सांडपाणी व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं. ते शहरी, निमशहरी भागात करणं सहज शक्य आहे. मागचे काही लेख वाचून काही वाचकांनी विचारणा केली, की आमच्या गावात अनेक नाले आणि ओढे आहेत. पण, त्यात सांडपाणी मिसळलं जाते, कधी अजाणता तर कधी बेफिकीरीने. पण त्यामुळे तो स्रोत तर खराब होतोच, पण त्या स्रोताच्या आजूबाजूच्या भागातील विहिरींचे पाणीही खराब होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूजल साठा खराब होतो. या प्रश्नावर तुम्ही कधी काही उपाय केलाय का? किंवा यावर सर्वसामान्य माणसाला करता येईल, परवडेल असा काही उपाय करणे शक्य आहे का? या बाबत आजच्या लेखात जाणून घेऊयात. 

सांडपाणी व्यवस्थापनाची सर्व ठिकाणी नसलेली सुविधा, लोकांमधील याबाबत असलेला जाणिवेचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे सांडपाणी व्यवस्थापन हा प्रश्न बिकट झालाय आणि येत्या काही वर्षांत तो हाताबाहेर जाणार आहे, असे माझ्या अभ्यासावरून तयार झालेले मत या प्रकल्पाचे मूळ ठरले. याला कारण होता रत्नागिरीतील फगरवठार भागातला फणशीचा परिसर. इथून परटवणी नदीचा उगम होतो. या भागात असलेला झरा जवळपास वर्षभर वाहतो. त्या झऱ्याचे रूपांतर नंतर एका अगदी लहानशा पण बारमाही वाहणाऱ्या नदीत होतं, जी साधारण ३ ते ४ किमीनंतर समुद्राला मिळते. 
शहराची वाढ वरच्या भागात असलेल्या पठारावर मोठ्या प्रमाणात झाली आहे. इथून उतार समुद्राकडे आहे आणि वरचा पठाराचा भाग पूर्णतः जांभा दगडाचा आहे, जो काही प्रमाणात पाणी धरून ठेवतो आणि बाकी सोडून देतो. त्यामुळे इथे बांधलेल्या इमारतींच्या सांडपाण्याला जायला या ओढ्याशिवाय दुसरा सोपा, कमी खर्चिक, नैसर्गिक मार्ग नाही. त्यामुळे माणसाच्या सहज प्रवृत्तीनुसार पैसे वाचविण्यासाठी आजूबाजूच्या साधारण दोन अडीच किलोमीटर परिसरात असलेल्या गृहसंकुलांमधून बिलकूल प्रक्रिया न केलेले सांडपाणी एका व्यवस्थित बांधलेल्या गटारातून या नदीत आणून सोडलेले आहे. तिथेच सुरवातीला एक बंधारा आहे, ज्याच पूर्वी खूप पाणी साठायचं, पण आता भरपूर गाळ आणि कचरा, विशेषतः प्लॅस्टिक, साठून बंधारा भरून गेला आहे. हे गटारातील सांडपाणी ओढ्याच्या पाण्याबरोबर वाहून पुढे जाते आणि जमिनीत मुरते. त्यामुळे त्याच्या प्रवाहाच्या खालच्या भागातील भूजल साठा खराब झाला आहे आणि त्यामुळे त्या भागातील विहिरींचे पाणी खराब झाल्याने त्या विहिरींमध्ये पाणी असूनही वापरता येत नाही अशी परिस्थिती आहे. 

प्रयोगाला सुरवात ः 
गेल्या वर्षी मी, ओमकार गिरकर आणि रत्नागिरीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यापक साईल शिवलकर, आम्ही या विषयावर प्रथम चर्चा केली. यावर आपण उपाय करू शकतो हे मी सांगितल्यावर एक प्रयोग म्हणून नैसर्गिक उपाय योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे वापरून वाहते पाणी शुद्ध करण्याचा एक अनोखा उपक्रम रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वी सुरू केला गेला. साधारणपणे अशा कामासाठी बंदिस्त योजना असते, ज्यात पाणी सोडले जाते आणि त्यावर प्रक्रिया करून मग बाहेर सोडले जाते. पण या प्रकल्पाचे वैशिष्ट्य हे की यात प्रवाह चालू असताना त्यावर प्रक्रिया केली गेली. 
यामध्ये या प्रकल्पाची आखणी, प्रत्यक्ष सर्वेक्षण करून योग्य उपाय आणि ते करण्यासाठी योग्य जागेची निवड, यातील विशेष वनस्पती आणि सर्वात महत्त्वाचे, पाणी तपासून योग्य जीवाणू कल्चर मिश्रण तयार करणे, ही माझी जबाबदारी होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी माझ्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे पाणी नैसर्गिक पद्धतीने, अत्यंत कमी खर्चात प्रक्रिया करून पुढे सोडता येते आणि त्याचा फायदा होऊन पाण्याची गुणवत्ता सुधारता येते हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी एक प्रकल्प करायचे ठरवले. 

  • १) प्रत्यक्ष सर्वेक्षण करून योग्य जागा निवडून, आवश्यक ते छोटे बदल करून एक ट्रिटमेंट सिस्टिम तयार केली. त्यात काही विशिष्ट वनस्पती आणि खास तयार केलेले जिवाणू मिश्रण यांचा योग्य वापर करून प्रवाहाचे पाणी या सिस्टिममधून पुढे पाठवले. सगळी मेहनत त्या मुलांच्या टीमने आणि त्यांचे महाविद्यालयातले मार्गदर्शक साईल शिवलकर यांनी घेतली आणि हा प्रकल्प कार्यरत झाला. 
  • २) पहिल्यांदा गैरसमज आणि माहिती नसल्याने स्थानिक लोकांनी यातली काही झाडे काढली. त्यामुळे या मुलांचे काम वाढले. मग परत सगळे काम केले आणि मग त्या सिस्टिमने आपले काम करायला सुरवात केली. 
  • या कामाचा परिणाम काय हे कळण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन प्रमाणित प्रयोगशाळेकडून त्याचं विश्लेषण केले. त्यातून आलेले निकाल हे उत्साहित करणारे आहेत. 
  • ३) पाण्यातील प्राणवायूची जैविक मागणी (BOD) शून्य, रासायनिक मागणी (COD) १२ मिग्रा प्रतिलिटर, पाण्यात विरघळलेला प्राणवायू आधीच्या तुलनेत एक हजार टक्के जास्त वाढलेला, क्षारांचे प्रमाण ३० टक्के कमी झाले इत्याद गोष्टी समोर आल्या आणि या कामाचे महत्त्व सगळ्यांच्याच लक्षात आले. 
  • ४) यातून एक महत्त्वाची गोष्ट पुढे आली की अशा स्थलानुरूप कामांमुळे कमी भांडवली खर्चात, कमी देखभाल खर्चात अशी काम करणे शक्य आहे. गरज आहे ती अशा कामांकडे डोळसपणे बघून त्याचं महत्त्व स्वीकारण्याची. 

या प्रकल्पासाठी मी आखलेल्या प्रक्रिया उपायावर प्रत्यक्ष काम करणारे विद्यार्थी आहेत, राजस भोसले, मिथिलेश मयेकर, मंथन खारवडकर, जितेंद्र देवरुखकर, अभिषेक कासेकर, चेतन कांबळे, विराज हरचकर, अनिमेष कीर, विश्वेश कीर, आकाश भाटकर. त्यांचे महाविद्यालयातील मार्गदर्शक साईल शिवलकर हे होते. या सर्वांची मोट बांधली ती ओमकार गिरकर या मुंबईत राहून कोकणात काम करणाऱ्या एका उत्साही अभियंत्याने. याला मदत केली ती नगराध्यक्ष, काही नगरसेवक आणि सुजाण नागरिकांनी. या प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मार्गदर्शक आणि सिस्टिमची आखणी, जागानिश्चिती करणे आणि झाडे, कल्चर मिश्रण यांची निवड आणि तयारी करणे हे काम माझ्याकडे होते. 

लोकसहभाग महत्त्वाचा ः 
आमच्या गटाने हे काम यशस्वीपणे करून मार्ग तर दाखवला. आता गरज आहे ती अशी कामं स्थलानुरूप कशी करता येतील ते पाहण्याची आणि योग्य ठिकाणी, योग्य प्रकारचं काम, योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची. यात लोकसहभागाची गरज आहे. त्यातून हे काम सर्वव्यापी होऊ शकेल. यातून पाण्याची गुणवत्ता सुधारेलच, पण आत्ता जे भूगर्भातील पाणी या सांडपाण्यामुळे खराब होतंय तेही होणार नाही आणि नैसर्गिक स्रोत आणि विहिरी यातलं पाणी परत वापरायोग्य होईल. त्यामुळे आज जाणवणारी पाणीटंचाई जाणवणार नाही. हे काम नदीच्या पूर्ण प्रवाहावर ठरावीक अंतरावर केलं की भूमिगत जलसाठे चांगले राहतील आणि चांगल्या पाण्याची टंचाई हा विषय राहणार नाही. 
शहर वा गाव कोणतंही असो, हे काम गृहनिर्माण प्रकल्प, शाळा, महाविद्यालये, इतर आस्थापने यांनी त्यांच्या परिसरात केलं तर एकूणच सांडपाणी नैसर्गिक स्रोतांमधे मिसळणं बंद होईल आणि जलस्रोत चांगले राहतील. 
मात्र, हे करताना योग्य आणि अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला आणि मार्गदर्शन दूरगामी यशासाठी अनिवार्य आहे. काय काम करायचं, कुठे करायचं, किती प्रमाणात करायचं इत्यादी तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञाचा सल्ला आणि मत हे अत्यावश्यक आहे. 

संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये,९९६७०५४४६० 
( सकाळी ९.३०ते १०.३० , संध्याकाळी ७.३० ते ८.३०) 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...