आरोग्य, शिक्षणाचा ‘मनस्पंदन’ने घेतला वसा 

आरोग्य, शिक्षणाचा ‘मनस्पंदन’ने घेतला वसा 
आरोग्य, शिक्षणाचा ‘मनस्पंदन’ने घेतला वसा 

कोल्हापूर शहरातील मनस्पंदन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गेल्या चार वर्षांपासून मानसिक आरोग्य आणि शालेय शिक्षणासंबंधी काम करीत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील पुरुष, महिला तसेच शालेय मुला-मुलींच्या विविध समस्या समजावून घेत त्यांना समुपदेशन केले जाते. याचबरोबरीने संस्था ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, तसेच महिलांच्या विकासासाठीदेखील विविध उपक्रम राबवीत आहे.  सध्या हरवत चाललेला संवाद, ताण-तणावांमुळे कुटुंबातील सदस्य तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्याचे प्रश्न तयार होत आहेत. अशा ताण-तणावांतील व्यक्तींचा विश्‍वास संपादन करून त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कोल्हापूर शहरातील मनस्पंदन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था करत आहे. विविध उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी संकलित करून, प्रसंगी स्वतःची रक्कम खर्ची करून संस्थेचे सदस्य हे काम करीत आहेत. विवेकानंद महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक नंदुकमार रानभरे यांनी एम.एस.डब्लू. झालेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मनस्पंदन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. संस्थेच्या कार्यात अमृता जोशी-साळोखे, वीरसेन साळोखे, सुरेखा जाधव, संपदा थोरात आदी सदस्यांची चांगली साथ मिळाली आहे. मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, त्याचा त्रास इतरांना कसा होऊ शकतो हे पुरेपूर अनुभवलेल्या सदस्यांनी संस्थेची स्थापना केली.  संस्थेच्या सदस्यांकडून वैयक्तिक, कौटुंबिक आणि शालेय स्तरावर समुपदेशन केले जाते. वैयक्तिक समुपदेशनामध्ये संबंधित व्यक्तीच्या अनाकलनीय वागण्याचा अभ्यास करून मार्गदर्शन केले जाते. कौटुंबिक समुपदेशनामध्ये सर्व कुटुंबाच्या सदस्यांकडून माहिती घेतली जाते. यामध्ये विशेष करून कुटुंबातील वाद मिटविण्याकडे कल असतो. शालेय समुपदेशनामध्ये शारीरिक बदल, प्रेम प्रकरणातून येणारे नैराश्‍य आदीसह मानसिक ताणावर समुपदेशन केले जाते.  ग्रामीण भागातील उपक्रम ः  संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानाचे सर्वेक्षण केले जाते. आतापर्यंत संस्थेने शाहूवाडी तालुक्‍यातील एनवाडी, पाटीलवाडी, वारूळ या गावांतील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या जीवनशैलीतील त्रुटी मांडल्या. विविध संस्थांच्या सहकार्याने महिला आरोग्य, गावातील शौचालय स्थिती, स्तनदा माता, किशोरवयीन मुलांसाठी संस्थेतर्फे ग्रामीण भागात उपक्रम राबविले जातात. परिसरातील उद्योगसमूहाच्या सीएसआर फंडातून संस्थेने ग्रामीण भागात शैक्षणिक साहित्य, सायकल, तसेच सॅनिटरी नॅपकीन वाटप असे कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. यास नागरिकांचे चांगले सहकार्य मिळते. पुण्यातील फोर सीज कॉन्सिलिंग, स्क्रीझोफेनिया अवेअरनेस, कोल्हापुरातील वुई केअर, सोशल फाउंडेशन, ऊर्जा फाउंडेशन, साद फाउंडेशन, पुरुष हक्क संरक्षण समिती आदी संस्थांबरोबर समन्वय साधून संस्था विविध उपक्रम राबविते.  गट चर्चेला प्राधान्य ः 

संस्थेचे सदस्य इतर ठिकाणी नोकरी करून सायंकाळच्या वेळेत संस्थेचे कामकाज पाहतात. सायंकाळी पाचनंतर समुपदेशन, तसेच इतर कामांना सुरवात केली जाते. दररोज वेगवेगळ्या विषयावर गट चर्चा होतात. यामध्ये वैवाहिक स्वास्थ्य, विवेकी पालकत्व, ताण व्यवस्थापन, नैराश्‍य आणि चिंता या विषयांवर मोफत चर्चा होते.  वैयक्तिक समुपदेशनासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. इतर घटकांना मात्र विनाशुल्क सेवा दिली जाते. सध्या संस्थेने मानसिकदृष्ट्या कणखर कसे बनावे यासाठी विविध गटांसाठी काही तासांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.  संवादातून दिलासा ः 

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. यामध्ये महाविद्यालयाबरोबरच माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी समन्वय साधला आहे. बहुतांशी वेळेला विद्यार्थांचे गट करून संवाद साधला जातो. किशोरवयीन आरोग्य, समवयस्कांचा प्रभाव, सोशल मीडियाचे व्यसन, व्यसनाधीनता, ताण व्यवस्थापन, करिअर मार्गदर्शन आदी विषयांनुरूप संवाद साधून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती तपासली जाते. यानुसार वैयक्तिक संवाद साधून विद्यार्थ्यांना बोलते केले जाते. 
  • मोबाईलच्या युगात संवाद होत नसल्याने याचा मोठा दुष्परिणाम शहरी व ग्रामीण भागातील युवा पिढीवर होत आहे. अजाणतेपणी, मोहाला बळी पडून झालेल्या चुकांमुळे हजारो युवक नैराश्‍येच्या गर्तेत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करून समस्येतून बाहेर काढण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. 
  • शालेय स्तरावर जागृती ः  संस्था कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील नऊ शाळांमध्ये काम करते. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या तीन स्तरांवर संस्थेचे स्वयंसेवक जाऊन विविध समस्यांबाबत चर्चा करतात. यामध्ये कौटुंबिक समस्या, पालक व विद्यार्थी यांच्या संबधांतील तणाव, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद वाढविण्याबाबत संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांत शालेय वयापासूनच विद्यार्थ्यावर ताण येत असल्याने याचा विपरीत परिणाम प्रगतीवर होत असतो. काहीवेळा शिक्षक त्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. पुढे गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर विद्यार्थाच्या आयुष्यात नैराश्य येण्याचा धोका असतो. यासाठी वेळापत्रकानुसार शाळांतील विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जात आहे.  संस्थेने गेल्या चार वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांना वही-पेन, कंपास पेटी, पेन्सिल आणि खाद्यपदार्थ देण्याचा उपक्रम राबविला आहे. दरवर्षी दुर्गम भागातील शाळा निवडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते.  महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग ः  समुपदेशनाच्या बरोबरीने संस्थेने ग्रामीण महिलांना शेती आणि पूरक उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यास सुरवात केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना गांडूळ खतनिर्मिती, पूरक उद्योग, तसेच शेतीमधील नवीन तंत्रज्ञान प्रसाराबाबत मार्गदर्शक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. संस्थेने काही गावांत परसबाग निर्मितीबाबत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले होते.  सोशल मीडियाचा वापर 

  • संस्था सोशल मीडियाद्वारे आपले उपक्रम लोकांपर्यंत पोचविते. या माध्यमातून अनेक जण संस्थेशी जोडले गेले आहेत. युवा पिढीच्या समस्या खूप गंभीर होत आहेत. युवक- युवती सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेशी संपर्क करतात, संस्थेत येऊन आपली समस्या मांडतात. या लोकांना समुपदेशन करताना गोपनीयता पाळली जात असल्याने अनेक जण खुल्या मनाने सदस्यांशी संवाद साधतात. मनावरील ताण हलका करतात. 
  • ज्या स्त्री-पुरुषांचे न्यायालयामध्ये दावे दाखल आहेत, त्यांना समुपदेशन करण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येते. न्यायप्रविष्ट महिला मानसिकदृष्ट्या खचलेल्या असतात. त्यांना भविष्यात उभारी देण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाने स्थापन केलेल्या रणरागिणी गटाशी समन्वय साधून अशा महिलांचे समुपदेशन केले जाते. वेगवेगळ्या मार्गाने त्या महिला कशा सक्षम होऊ शकतात याचे धडे संस्थेमार्फत देण्यात येतात. 
  • संपर्क ः अमृता जोशी- साळोखे, ९१३०८१२४३६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com