आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट शेतमाल विक्रीचा आदर्श

पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शाश्वत कृषी विकास इंडिया या शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करीत शेतमाल विक्री व्यवस्था उभारण्याचा आदर्श तयार केला आहे.
आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट शेतमाल विक्रीचा आदर्श
आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट शेतमाल विक्रीचा आदर्श

पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शाश्वत कृषी विकास इंडिया या शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करीत शेतमाल विक्री व्यवस्था उभारण्याचा आदर्श तयार केला आहे. शहर व उपनगरांत आठवडी बाजार व निवासी सोसायट्यांमधून थेट ग्राहकांना विक्री साधत दर आठवड्याला सुमारे २० ते ३० टन विक्रीचे उद्दिष्ट ठेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना संकटामुळे वाहतूक, मजूर बळ, दर, खरेदी आदींच्या अनुषंगाने शेतमाल विक्रीमध्ये अनेक समस्या तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांनी थेट ग्राहक विक्रीचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शाश्वत कृषी विकास इंडिया या शेतकरी उत्पादक कंपनीने देखील याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विक्री व्यवस्थेचे स्वरूप आरोग्य सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करीत पुणे शहर व विविध उपनगरांमधून आठवडी बाजार व मोठ्या निवासी सोसायट्यांमध्ये थेट विक्री असे स्वरूप या कंपनीने ठेवले आहे. कंपनीचे संचालक विजय ठुबे म्हणाले की आमच्या कंपनीच्या शिरूर भागातील शेतकऱ्यांसह मंचर, नारायणगाव, सासवड तसेच काही प्रमाणात श्रीगोंदा (जि. नगर) भागातील शेतकऱ्यांचा माल आम्ही संकलित करीत आहोत. यात कांदा, बटाटा, मिरची, ढोबळी मिरची., दोडका, भोपळा, भेंडी, अन्य पालेभाज्या, तसेच फळांमध्ये कलिंगड, खरबूज, लिंबू, द्राक्षे, पपई आदी फळांचा समावेश आहे. आठवडी बाजार व निवासी सोसायट्या पुणे उपनगरांतील सहा ठिकाणी भरणारे आठवडी बाजार व परिसरातील असलेल्या निवासी सोसायट्यांवर शाश्वत कंपनीने आपला फोकस ठेवला आहे. वारजे भागातील आदित्य गार्डन, विश्रांतवाडी येथील उत्तम टाऊनशीप, आळंदी रस्त्यावरील डिफेन्स कॉलनी अशा काही निवासी सोसायट्यांची नावे सांगता येतील. शिवाजीनगर, धानोरी, विश्रांतवाडी, बावधन, पाषाण, सूस रोड, वारजे-माळवाडी असे विक्री व्यवस्थेचे कार्यक्षेत्र आहे. कल्याणीनगर, वडगाव शेरी येथेही विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन १) कोरोनाच्या संकटात आरोग्य स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी कमीतकमी फिजीकल संपर्क यावा या दृष्टीने शाश्वत कंपनीने सर्वतोपरी दक्षता घेतली आहे. २) निवासी सोसायट्यांमध्ये मालाची डिलीव्हरी करताना किंवा आठवडी बाजारांतही निश्चित केलेल्या ठरावीक सुरक्षित अंतरावर पांढऱ्या रंगाचे चौकोनी पट्टे आखले आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेऊन माल खरेदी-विक्री करणे सोपे झाले आहे. ३) माल विक्री करताना शेतकरी कंपनीचे संबंधित सदस्य तोंडाभोवती मास्क लावतात. हॅंडग्लोव्हज घालतात. गॉगल घालतात. ४) निवासी सोसायट्यांमध्ये मालाचा पुरवठा करताना ग्राहकांशी संपर्क येऊ दिला जात नाही. ग्राहक आपापल्या पिशव्या सोसायटीच्या जागी ठरावीक मार्किंग केलेल्या ठिकाणी ठेवतात. डिलीव्हरी करणारी व्यक्ती सुरक्षिततेचे पोषाख घातलेली असते. ती प्रत्येक ग्राहकाच्या पिशवीत माल टाकत जाते. ५) मालाच्या डिलीव्हरीनंतर ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले जाते. प्रत्यक्ष पेमेंट करतेवेळी देखील फिजीकल संपर्क टाळण्यासाठी ऑनलाइन पध्दतीच्या पेमेंटवर भर दिला जातो. टोकन पद्धती प्रत्येक सोसायटीच्या ग्राहकांना टोकन दिलेले असते. या टोकनद्वारे ग्राहक आपली ऑर्डर लिहून देतो. मालाच्या पिशव्या ठेवताना एकाच वेळी सर्व ग्राहकांना न बोलावता ठरावीक संख्येने त्यांना माल घेण्यासाठी येण्याचे सांगितले जाते. म्हणजेच प्रत्येकाला ठरावीक वेळ दिल्याने एकाच वेळी गर्दी होत नाही. आश्वासक विक्री  ठुबे म्हणाले की माल वाहतुकीसाठी आमचे दहा टेंपो आहेत. आठवडी बाजार व निवासी सोसायट्या मिळून आठवडाभरात २० ते ३० टन शेतमाल विक्रीचे उद्दिष्ट ठेऊन तसे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाजीपाला, फळे या अत्यावश्यक बाबी घेण्यासाठी घराबाहेर न पडता आपल्या दारीच हा माल कसा उपलब्ध होईल यासाठी ते पर्याय शोधत आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांना देखील वाहतूक, त्याचे परवाने, बाजार समितीतील समस्या, अपुरे मनुष्यबळ, मालाचे दर या सर्व समस्या भेदून आपल्या मालाची विक्री करायची आहे. आम्ही शेतकरी व ग्राहक असा दुवा या निमित्ताने सांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक हजार ग्राहकांपर्यंत आम्ही या निमित्ताने पोचत आहोत, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. देशी दुधाची विक्री ठुबे यांची टाकळी हाजी येथे शेती आहे. त्यांच्याकडे सुमारे ३०० देशी गायी आहेत. दिवसाला सुमारे ६०० ते ७०० लीटर दुधाचे संकलन होते. पुणे शहरात ठुबे यांनी आपले साडे तीनशे ते चारशेपर्यंत ग्राहक तयार केले आहेत. त्यांना दररोज दुधाचा रतीब दिला जातो. प्रति लीटर ८० रुपये असा त्याचा दर आहे. सध्या कोरोना संकटाच्या काळात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने दुधाच्या वितरणात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क- विजय ठुबे, ९९२२९६९९३९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com