रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये व्यवस्थापन

रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये व्यवस्थापन
रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये व्यवस्थापन

महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९ टक्के) व लोह (२३ टक्के) या सुक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. जमिनीत माती परीक्षणानुसार जस्त ०.६ पीपीएमपेक्षा कमी असल्यास तसेच लोह ४.५ पीपीएमपेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी. ही कमतरता विशेषतः जास्त विम्ल प्रकारचा सामू (८.५ पेक्षा जास्त), जास्त क्षारता (०.५ डेसी सायमनपेक्षा जास्त), चुनखडीयुक्त (१० टक्के पेक्षा जास्त) व कमी सेंद्रिय कर्ब (०.४० टक्क्यापेक्षा कमी) असलेल्या जमिनींमध्ये दिसून येते. यामुळे विविध पिकांवर कमतरतेची लक्षणे दिसून येतात, परिणामी उत्पादन व पिकांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात. सुक्ष्मअन्नद्रव्ये ही पिकाला अत्यंत कमी प्रमाणात गरजेची असली तरी पिकांच्या एकूण वाढीमध्ये व उत्पादनामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाची आहेत. ही अन्नद्रव्ये पिकांमधील अनेक मूलभूत प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. उदा. वनस्पतीत उत्प्रेरक, संप्रेरकनिर्मितीचे कार्य, हरितद्रव्यनिर्मिती, फूल व फळधारणेस मदत आणि प्रथिने तयार करणे इ. सुक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे पिकास पुरवलेल्या इतर मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी होते. रब्बी हंगामातील काही प्रमुख पिके, त्यांमधील सुक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व उपाययोजनांची माहिती घेऊ. १. गहू जस्त कमतरतेची लक्षणे ः

  • पिकाची एकंदर वाढ खुंटते. तीव्र कमतरतेमध्ये पाने पांढरी होऊन मरतात. 
  • गव्हाच्या रोपांमध्ये जस्ताच्या कमतरतेचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे वनस्पतींची उंची आणि पानांचा आकार लक्षणीयरित्या कमी होणे. 
  • ही लक्षणे मध्यमवयीन पानांवर पांढऱ्या-तपकिरी जळल्यासारख्या डागांच्या स्वरूपात दिसून येतात. पानांचा मधला भाग झिजलेला असल्याप्रमाणे दिसतो.
  • लोह कमतरतेची लक्षणे ः

  • लोहाच्या कमतरतेमुळे लहान पानांवर विशिष्ट पिवळे हिरवे पट्टे दिसून येतात.  
  • लोहाच्या कमतरतेमुळे संपूर्ण पाते पिवळे होते.
  • केवडा किंवा हरीत रोग जुन्या पानांवरदेखील पसरतो.
  • २. ज्वारी व मका जस्त कमतरतेची लक्षणे ः

  • रोपाचा रंग फिकट हिरवा दिसू लागतो.
  • पानाच्या खालच्या अर्ध्या भागात फिकट पिवळ्या रंगाचे उभे पट्टे दिसू लागतात. कालांतराने ते फिकट तपकिरी किंवा राखाडी होऊन पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो.
  • लोह कमतरतेची लक्षणे ः शिरांच्या मधल्या भागात केवडा होऊन पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो. पानाच्या संपूर्ण पात्यावर शिरा अगदी ठळक दिसू लागतात. ३. हरभरा जस्त कमतरतेची लक्षणे ः

  • झिंकची कमतरता असलेली रोपे खुंटलेली दिसतात. अशा रोपांवर शाखा कमी असतात.
  • पिकाच्या परिपक्वता कालावधीत वाढ होते.
  • लहान पाने प्रथम फिकट गुलाबी व हिरवी होतात, नंतर लालसर तपकिरी होतात.
  • पानांच्या कडांवर आणि देठाच्या खालच्या भागात विकृती दिसून येते.
  • गंभीर कमतरतेत, पान गडद कांस्य रंगाचे होऊन पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होतो.
  • सर्वप्रथम नवीन पानांवर कमतरतेची लक्षणे दिसतात. नवीन पाने कालांतराने गडद पिवळी होऊन शेवटी पांढरी पडतात, तर जुनी पाने गडद हिरव्या रंगाचीच राहतात.
  • नवीन पानांमध्ये जळाल्यासारखे डाग जवळ जवळ पानाचा अर्धा भाग व्यापून टाकतात.
  • पुढील टप्प्यात जळल्याचे डाग संपूर्ण पानावर पसरतात. पाने एकतर मरतात, नाहीतर गळून पडतात.
  • ४. कांदा जस्त कमतरतेची लक्षणे ः

  •  कांदा जस्ताच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील असतो. ही कमतरता सहज लक्षात येते.
  • पाने कमजोर होऊन शिरांमधील हरितरोग स्पष्ट दिसू लागतो.
  • पानांची पाते वेणीसारखी दिसू लागतात.
  • रोपांची कोवळी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होऊन जुन्या पानांवर शेंड्याकडून मर सुरू होतो.
  • पानांच्या जमिनीकडील भागावरील पेशी हरित रोग किंवा केवडा होऊन मृत पावतात.
  • नवीन पानांमध्ये संपूर्ण पिवळेपणा दिसू लागतो.
  • लोहाच्या कमतरतेचे  सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सर्वात लहान पानांच्या मधील भागावर केवडा रूपात, एक संपूर्ण हरितरोग विकसित होते आणि पाने मृत पावतात.
  • लोहाची गतिशीलता कमी असल्याने नवीन पानांवर  लोहाची कमतरता दिसून येते.
  • जस्ताच्या कमतरतेवर उपाययोजना १. गहू –

  • पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट ८ किलो प्रतिएकरी शिफारशीत खत मात्रेसोबत किंवा शेणखतासोबत द्यावे.
  • उभ्या पिकात कमतरता दिसून येताच साधारणपणे ३५ दिवसांनी चिलेटेड जस्त (Zn-EDTA) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  • २. ज्वारी व कांदा –

  • पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट ८ किलो प्रतिएकरी शिफारशीत खत मात्रेसोबत किंवा ३० दिवसांनी ८ किलो झिंक सल्फेट अधिक ४० किलो ताजे शेण अधिक २०० लिटर पाणी याप्रमाणे घटक असलेली शेणकाला स्लरी एक आठवडा मुरवून पाण्यासोबत द्यावी.
  • उभ्या पिकात कमतरता दिसून येताच साधारणपणे ३० दिवसांनी चिलेटेड जस्त (Zn-EDTA) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  • ३. मका –

  • पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट १० किलो प्रतिएकरी शिफारशीत खत मात्रेसोबत किंवा ४० किलो शेणखतामध्ये आठवडाभर मुरवून द्यावी.
  • उभ्या पिकात कमतरता दिसून येताच साधारणपणे ३५ दिवसांनी चिलेटेड जस्त (Zn-EDTA) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  • लोहाच्या कमतरतेवर उपाययोजना (वरील सर्व पिकांसाठी)

  • पेरणीच्या वेळी फेरस सल्फेट १० किलो प्रतिएकरी शिफारस खत मात्रेसोबत किंवा ४० किलो शेणखत आठवडाभर मुरवून द्यावे.
  • उभ्या पिकात कमतरता दिसून येताच साधारणपणे ३५ दिवसांनी चिलेटेड लोह (Fe-EDTA) १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  • माती परिक्षणामध्ये सुक्ष्मअन्नद्रव्ये कमतरतेची नोंद असल्यास वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२ (शुभम दुरगुडे हे जी. बी. पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर, उत्तराखंड येथे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी असून, डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदविज्ञान विभागात कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com