काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा घेतला शोध

काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा घेतला शोध
काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा घेतला शोध

फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी ऑस्ट्रिया येथील ग्रेझ तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी खास जैविक पद्धती विकसित केल्या आहेत. या पर्यावरणपूरक पद्धती असून, त्यामुळे फळे व भाज्यांवरील नैसर्गिक जिवाणूंच्या समुदायाला कोणताही धोका पोचत नाही. मात्र, कुजीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बुरशींना रोखणे शक्य होते. पिकांची काढणी झाल्यानंतर त्यांची साठवणूक काही काळापर्यंत करणे आवश्यक असते. यामुळे ते उत्पादन दूरवरच्या बाजारपेठेपर्यंत पाठविणे, ग्राहकांपर्यंत पोचणे आणि त्यानंतरही काही साठविणे शक्य होते. मात्र, पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान हा काढणीपश्चात साखळीतील सर्वात कमकुवत दुवा आहे. या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार, जागतिक फळे आणि भाज्यांच्या उत्पादनातील सुमारे अर्धा भाग (४५ टक्के) उत्पादन हे ग्राहकापर्यंत पोचण्यापूर्वी खराब होते. या नुकसानीमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि अयोग्य साठवण स्थितीचा मुख्य वाटा असतो. यात प्रामुख्याने ताज्या भाज्या व फळांची कुज होणे, श्वसन आणि बाष्पीभवनामुळे त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन नुकसान होणे यांचा समावेश होतो. यापासून बचावासाठी सध्या प्रामुख्याने विविध रसायनांचा वापर होतो. त्याऐवजी जैविक पद्धतीचा शोध ग्रेझ तंत्रज्ञान विद्यापीठातील पर्यावरणीय जैव तंत्रज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रियन औद्योगिक जैव तंत्रज्ञान केंद्राच्या साह्याने घेतला आहे. त्यांनी सफरचंद आणि शर्कराकंद यांची साठवण सुधारण्यासाठी विविध पद्धतींच्या चाचण्या घेतल्या आहेत. सफरचंदाचा साठवण कालावधी वाढला

  • अनेक फळांच्या काढणीनंतर बुरशींमुळे होणारी कुज किंवा खराब होणे टाळण्यासाठी उष्णजल जलप्रक्रिया अत्यंत उपयोगी ठरू शकते. ही शाश्वत पद्धत असून, त्यात उष्ण पाण्याच्या भांड्यामध्ये सफरचंद बुडवले जातात. या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या ताणाने सफरचंदामध्ये नैसर्गिक संरक्षण प्रणाली कार्यान्वित होते. त्यामुळे साठवणीमध्ये सफरचंद खराब होत नाहीत.
  • प्रयोगशाळेमध्ये संशोधिका गॅब्रीयले बेर्ग यांच्यासह त्यांचे पीएच.डी.चे विद्यार्थी बिरगीट वॅस्सेलमॅन आणि पीटर कुस्स्तातश्चर या तंत्राच्या चाचण्या घेतल्या. त्यांनी उष्णजल प्रक्रियेसोबत खास तयार केलेल्या जैविक नियंत्रण घटकांचा वापर केला. त्याविषयी माहिती देताना बिरगीट वॅस्सेलमॅन यांनी सांगितले, की आम्ही सेंद्रिय उत्पादित सफरचंदांना दोन प्रकारच्या बुरशीद्वारे प्रादुर्भावित केले. त्यानंतर त्यावर उष्णजल आणि खास विकसित जैविक नियंत्रण घटकांची प्रक्रिया केली. या प्रक्रियेमुळे काढणीपश्चात वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांना नष्ट करणे किंवा प्रादुर्भावाचा व्यास सुमारे ६० टक्क्यांनी कमी करणे शक्य झाले.
  • तुलनेसाठी नियंत्रित पद्धतीमध्ये सफरचंदांना नुसत्या उष्णजल प्रक्रिया करण्यात आली. या नुसत्या उष्णजल प्रक्रियेच्या तुलनेमध्ये एकत्रित प्रक्रियेमुळे साठवणीतील कुजीपासून २० टक्के अधिक चांगले निष्कर्ष मिळाले.
  • जैविक घटकांची निर्मिती ही सफरचंदामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या समुदायापासून केली आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनामध्ये त्यांचा वापर करणे शक्य आहे. हे संशोधन जर्नल फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • पिकांच्या काढणीपश्चात साठवणीसाठी अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्याय शोधण्यात आले आहेत. त्याचा वापर व्यावसायिकरीत्या उत्पादित फळांसाठी करता येईल.
  • नैसर्गिक सूक्ष्मजीवांना धोका नाही...

  • संशोधिका गॅब्रियले बेर्ग आणि त्यांच्या गटाने उष्णजल प्रक्रियेचे सफरचंदावरील सूक्ष्मजीवांच्या समुदायावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला आहे. ऑस्ट्रियन सेंद्रिय फळ उत्पादक कंपनीच्या सहकार्याने केलेल्या या संशोधनामध्ये उष्णजल प्रक्रियेमुळे नैसर्गिक सूक्ष्मजीवांचे समुदायांवर फारसा परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच सफरचंदाच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेमुळे संरक्षणाची प्रणाली सुरू होते. त्यातून फळे खराब करणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोखले जाते. या संशोधनातून वनस्पती आणि त्यांचे सहजीवी सूक्ष्मजीव यांतील जवळचे संबंध पुनश्च अधोरेखित झाले.
  • सामान्यपणे आपण खात असलेल्या सफरचंदावर सुमारे १०० दशलक्ष जिवाणू असतात. मात्र, सेंद्रिय सफरचंदावरील जीवाणू हे नेहमीच्या प्रकारापेक्षा वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. साठवलेल्या व कुजण्यास सुरुवात झालेल्या सफरचंदावर मूलभूतदृष्ट्या वेगळेच सूक्ष्मजीव असतात. त्यात ९९ टक्के बुरशी आणि केवळ एक टक्का जीवाणू असल्याचे बेर्ग यांनी स्पष्ट केले.
  • जैविक संरक्षण शर्कराकंदासाठीही फायदेशीर साठवणीतील नुकसानीमुळे सफरचंदाप्रमाणेच शर्कराकंदाचेही मोठे नुकसान होते. त्यासाठी संशोधकांनी पर्यावरणपूरक पद्धतीचा शोध घेतला. ऑस्ट्रियन औद्योगिक जैव तंत्रज्ञान केंद्रातील संशोधक पीटर कुस्स्तातश्चर यांनी एक खास जैव नियंत्रक घटक विकसित केला आहे. त्याच्याही चाचण्या घेण्यात आल्या. त्याविषयी माहिती देताना कुस्स्तातश्चर म्हणाले की, शर्कराकंदावरील प्रक्रियेमुळे त्यातील शर्करेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले. त्यातही कुजीसाठी संवेदनशील असलेल्या प्रक्षेत्रातून काढलेल्या शर्कराकंदावर त्वरेने प्रक्रिया केल्यास भविष्यात नुकसान टाळता येते. अशा कुजीमुळे होणारे शर्करेचे केवळ जर्मनीतील नुकसान प्रति दिन पाच लाख युरोपेक्षाही अधिक आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com