मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

मोल निचरा पद्धत
मोल निचरा पद्धत

जमिनीत चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास अशा जमिनीच्या निचऱ्यासाठी भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा प्रणाली खूप खर्चिक (हेक्‍टरी ७५ ते ८० हजार  रुपये खर्च) ठरते. अशा जमिनीत उघडे चर काढून पाण्याचा निचरा करणेही शक्‍य होत नाही. अशावेळेस मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जातात, याला मोल निचरा पद्धत असे म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात. 

कार्यपद्धती : 

  • मोल पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो. त्यामुळे जमिनीखालून एक पोकळ फट तयार होते, त्याला मोल म्हणतात. 
  • मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी. त्यामुळे मोल वाळण्यास अवधी मिळून ते टणक बनतात. 
  • पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. तसेच जमिनीमध्ये मुरलेले अतिरिक्त पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होते. असे साठलेले अतिरिक्त पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर वाहून जाते. 
  • या पद्धतीत साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्‍टरला जोडून वापरले जाते. प्रत्येकी ४ मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो. त्यामुळे क्षारपड - पाणथळ जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही, त्यांना ही पद्धत उपयुक्त ठरते. 
  • मोल निचरा पद्धतीचे फायदे :

  • मोल निचरा पद्धतीसाठी साधारणतः हेक्‍टरी ३ हजार ते ४ हजार रुपये इतका खर्च येतो.
  • मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास ३ ते ५ वर्षे टिकू शकते.
  • निचरा पद्धतीसंदर्भात शिफारशी : ​

  • भारी काळ्या क्षारयुक्त - चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार जिप्सम या भूसुधारकाचा (आवश्‍यकतेनुसार ५० टक्के) तसेच हिरवळीचे पीक धैंचा यांचा एकात्मिक वापर फायदेशीर आढळून आला आहे.
  • कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. त्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी. 
  • मोल निचरा पद्धत वापरण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता

  • जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावे.
  • जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी ०.२ टक्के असावा. साधारणतः १ ते १.५ टक्के उतार असलेली जमीन मोल निचरापद्धतीसाठी उत्कृष्ट असते.
  • मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असायला हवे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवरून चालवले जाते. त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. तसेच ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्‍टर जमिनीमध्ये रूतू शकतो. यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे, त्या खोलीवरील मातीतील ओलावा साधारणतः २० ते २५ टक्के असावा.
  • मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी.
  • दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे ४ मीटर अंतर ठेवावे.
  • मोलची खोली ४० ते ७५ सें.मी. ठेवावी.
  • मोलची लांबी सामान्यतः २० ते १०० मीटर ठेवावी.
  • मोल निचरा करण्यासाठी साधारणतः ७५ किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपावरचा ट्रॅक्‍टर वापरावा.
  • मोल करत असताना ट्रॅक्‍टरचा वेग सामान्यतः १ कि.मी. प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा.
  • संपर्क : एस. डी. राठोड, ९८५०२३६१०३

    (कृषी संशोधन केंद्र, डिग्रज, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com