agriculture stories in Marathi Nanasaheb sirsath success story Of Goat farming | Agrowon

शेळीपालन, मळणीयंत्र व्यवसायातून बसवली कुटुंबाची घडी

सुदर्शन सुतार
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील नानासाहेब सिरसट यांनी देशी खिलार गाईचे संगोपन, शेळीपालन आणि त्याला मळणीयंत्राच्या व्यवसायाची जोड आपल्या शेतीला देत आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी बसवली आहे.

पडसाळी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील नानासाहेब सिरसट यांनी देशी खिलार गाईचे संगोपन, शेळीपालन आणि त्याला मळणीयंत्राच्या व्यवसायाची जोड आपल्या शेतीला देत आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी बसवली आहे. सेंद्रिय घटकांचा शेतीमध्ये वापर वाढवत उत्पादनही वाढवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांचे हे प्रयत्न परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

सोलापूर-बार्शी महामार्गावर वडाळ्यापासून आत आठ किलोमीटरवर पडसाळी हे गाव आहे. पाण्याचा स्रोत जेमतेम असला तरी गावातील धडपड्या शेतकऱ्यांमुळे कांदा, भाजीपाला पिकात गावाने नाव कमावले आहे. गेल्या काही वर्षात पडसाळीने सिमला मिरची लागवडीत आघाडी घेतली असून, १०० एकराहून अधिक क्षेत्रावर सिमला मिरची लागवड आहे. या गावातील नानासाहेब सिरसट यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असले तरी शेती आधुनिक पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. आई, पत्नी आणि दोन भाऊ-भावजयांसह एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित २२ एकर शेती आहे. दरवर्षी तेही मिरचीचे उत्पादन घेतात. यंदाही त्यांच्याकडे तीन एकर क्षेत्रावर सिमला मिरची आहे. त्याशिवाय एक एकर टोमॅटो, चार एकर कांदा, दोन एकर मका आणि आता उर्वरित क्षेत्र रब्बीतील ज्वारी, गव्हासाठी ठेवले आहे. सतत धडपड आणि एकत्र कुटुंबाच्या ताकदीमुळे एकेकाळी माळरान, हलकी असलेली शेतजमीन आज मात्र हिरवाईने नटली आहे.

ट्रॅक्टरमुळे मिळाली जीवनाला कलाटणी

१९९५ च्या सुमारास परिस्थितीमुळे नानासाहेबांना सातवीतूनच शिक्षण सोडावे लागले. शेळ्या राखणे, अन्य शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करणे अशी त्यांच्या आयुष्याची सुरवात झाली. २०१० मध्ये गावातील काशिनाथ नागाळे यांच्याकडून उसने पैसे घेत नवा ट्रॅक्टर खरेदी केला. याच ट्रॅक्टरने त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यावर्षी अवघ्या सहा महिन्यात त्यांनी ट्रॅक्टर व तीन पाळ्यांमध्ये तीन ड्रायव्हरच्या साह्याने ८६० एकर शेती नांगरण-कुळवणीची कामे केली. त्यातून सुमारे साडेसहा लाखाची कमाई झाली. एकूण धडपडीला मिळालेल्या यशाने त्यांचा हुरुप वाढला.

सेंद्रिय घटकांसाठी खास घेतल्या खिलार गाई

गेल्या काही वर्षापासून नानासाहेब हे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची यासारख्या फळभाज्यांचे उत्पादन घेतात. या पिकांतील रासायनिक खतांचा वाढता खर्च लक्षात घेऊन सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी त्यांनी खास चार देशी खिलार गाई घेतल्या. एकावेळेला किमान पावणेचार ते चार लिटर दूध आणि शेण, गोमूत्र उपलब्ध होते. या शेण गोमूत्रापासून जीवामृत, गांडूळखत, कंपोस्ट खत आणि स्लरी तयार करून पिकांसाठी वापरली जाते. गांडुळखतासाठी त्यांनी स्वतंत्रपणे सिमेंटचा हौद तयार केला आहे. आता पिकांना केवळ ५० टक्केच रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर करतात. पिकाची गरज उर्वरित ५० टक्के ही सेंद्रिय घटकांनी पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

लहानपणीच्या ओढीने नेले शेळीपालनाकडे

ट्रॅक्टरच्या व्यवसायाने नानासाहेबांना चांगलीच उभारी दिली. भांडवल तयार होत गेले तशी शेतीतील गुंतवणूकही वाढवत नेली. शेतात पुढे कांदा, भाजीपाला पिके होऊ लागली. मात्र, लहानपणापासून त्यांना ओढ असलेल्या शेळीपालनाचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच २०१५ मध्ये केवळ दोन शेळ्यांपासून त्यांनी या व्यवसायाची सुरवात केली. आज त्यांच्याकडे सहा बिटल क्रॅास, पाच उस्मानाबादी आणि ६० गावरान शेळ्या आहेत.

मुक्त आणि बंदिस्तचा समन्वय

सुरवातीला त्यांच्याकडे शेळ्यांसाठी खास अशी व्यवस्था नव्हती. मात्र, शेळ्यांची संख्या वाढत गेली तसे त्याच्या व्यवस्थापनाकडे जातीने लक्ष देऊ लागले. शेळ्यांसाठी स्वतंत्र शेड उभारले. शिवाय जाळीचे कुंपण करून बंदिस्त शेडही तयार केला. त्यांना सकाळी एका वेळेला मका आणि शेंगपेंड दिली जाते. सकाळी दहा वाजता स्वतःच्या शेतात
शेळ्यांना मोकळे चरायला सोडले जाते. सायंकाळी सहा वाजता पुन्हा शेडमध्ये आणले जाते. मुक्तसंचार आणि बंदिस्त शेळीपालनातील तत्त्वाचा त्यांनी योग्य प्रकारे समन्वय साधला आहे.

उत्पन्नाला झाली सुरवात

शेळ्या आणि बोकडांची नुकतीच विक्री सुरू केली आहे. दर सहा महिन्याला ८ ते १० बोकडांची विक्री होते. वजनापेक्षा नगावर त्यांची विक्री होते. बोकडाला किमान ९ ते १० हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळते. गावातील आणि परिसरातील लोक थेट शेतावरून खरेदी करतात.

स्वयंचलित मळणीयंत्रातूनही उत्पन्नाला हातभार

  • नानासाहेबांनी २०१५ मध्ये शेळीपालन सुरु केले. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी शेतीला पूरक म्हणून मळणी यंत्र घेतले. गेल्या चार वर्षात त्यांनी दोन यंत्रे बदलली. महिन्यापूर्वी त्यांनी हरियानाहून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे स्वयंचलित मळणीयंत्र आणले आहे. ज्यामध्ये फक्त धान्य टाकायचे, सारा वेचण्यासाठी स्वतंत्र माणूस लागत नाही. शिवाय हाताळणीही अगदी सोपी व सुरक्षित आहे. कमी वेळेत, कमी श्रमात सर्व कामे या यंत्रावर होतात. या यंत्राची जबाबदारी लहान बंधू अमोल शिरसट यांच्याकडे असते.
  • मळणीयंत्रावर ज्वारी, गहू, बाजरी, मका, तूर, सोयाबीन अशी सर्वप्रकारची धान्ये भरडली जातात. त्यातही या भागात सर्वाधिक सोयाबीन, तूर, ज्वारी ही पिके होतात.
  • सोयाबीनला ५० किलोच्या पिशवीला १५० रुपये, तुरीला ५० किलोच्या पिशवीला ३०० रुपये असा भरडण्याचा दर आकारला जातो. प्रत्येक धान्यानुसार भरडण्याचे दर वेगळे आहेत.
  • ज्वारी आणि मक्याला भरडण्याचे रोख भाडे न घेता, त्याबदल्यात पूर्वापार पद्धतीप्रमाणे धान्य घेतले जाते. ज्वारीच्या ५० किलोच्या पिशवीला दोन शेर ज्वारी घेतात. ही ज्वारी व मका शेळीच्या खाद्यासाठी उपयुक्त ठरते. पूर्वापार पद्धत त्यांच्याही सोईची ठरते.

शेतीतूनही चांगले उत्पन्न

शेतात दरवर्षी सिरसट यांच्याकडे कांदा, सिमला मिरची लागवड असते. शेतीतील सर्व कामांची जबाबदारी थोरले बंधू राजेंद्र यांच्याकडे असते. यावर्षी प्रथमच त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. गेल्यावर्षी कांद्याचे एकरी ११ टन उत्पादन मिळाले होते. त्यातून त्यांना आठ लाख रुपये उत्पन्न मिळाले. सिमला मिरचीचे एकरी ४० टनापर्यंत उत्पादन मिळते. गत वर्षी सिमला मिरचीने १३ लाख रुपये उत्पन्न मिळवून दिले. पूरक उद्योगातून येणाऱ्या भांडवलाचा शेतीलाही आधार मिळत असल्याचे नानासाहेब सांगतात.

खिलारमधील लक्षवेधी कपिला

नानासाहेबांकडे असलेल्या चार खिलार गाईपैकी एक काळ्या रंगाची गाय आहे. खिलारमध्ये पांढऱ्या रंगाच्या गाईंचे प्रमाण अधिक असते. काळ्या रंगाची खिलार गाय तशी दुर्मिळ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये खिलार देशी गाय आणि त्यातही काळ्या रंगाच्या गाईला कपिला गाय म्हटले जाते. देशी खिलार गाईचे दूध, तूप अधिक पौष्टिक मानले जाते. त्यातही काळ्या रंगाच्या गाईचे अधिक वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. या गाईच्या चिकामध्ये काही वनस्पती मिसळून तयार केलेली पावडर ही घरगुती वापरासाठी ठेवली जाते. हिच्या तुपालाही चांगली मागणी असल्याचे नानासाहेब सांगतात.

संपर्क - नानासाहेब सिरसट, ९८५८९३५०५०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...