कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
टेक्नोवन
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी पर्यावरणपूरक पद्धत
बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने कोबीवर्गीय पिकांचे चौकोनी ठिपक्यांचा पतंग आणि मावा यांसारख्या महत्त्वाच्या किडीपासून रक्षण करण्यासाठी निंबोळी भुकटी आधारित शाश्वत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती तयार केली.
बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने कोबीवर्गीय पिकांचे चौकोनी ठिपक्यांचा पतंग आणि मावा यांसारख्या महत्त्वाच्या किडीपासून रक्षण करण्यासाठी निंबोळी भुकटी आधारित शाश्वत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती तयार केली. या पद्धतीमुळे फवारण्यांची संख्या २० पासून ८ पर्यंत कमी होऊन खर्चात सुमारे ४३ हजार रुपयांची बचत झाली.
कोबीवर्गीय पिकांमध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंग (शा. नाव -(Plutella xylostella), मावा (शा. नावे ः Brevicornae brassicae आणि Myzus persicae), खोडकीड (शा. नाव - Hellula undalis) आणि पाने खाणारी अळी (शा. नाव -Spodoptera litura) या किडी प्रामुख्याने आढळतात. या किडीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने या पिकांचे किडीपासून रक्षण करण्यासाठी शाश्वत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती तयार केली आहे. त्यामध्ये मोहरीचे सापळा पीक घेणे, निंबोळी अर्क, साबणाचे पाणी व जैविक नियंत्रण घटकांची फवारणी करणे इ. बाबींचा समावेश आहे. या तंत्रामध्ये अधिक सफाई आणण्यासाठी निंबोळी बियांची भुकटीपासून गोळ्या तयार केल्या. त्याला ‘निम सीड पेलेट पावडर फॉर्म्युलेशन’ (NSPPF) असे नाव दिले आहे. ही पद्धत सोपी, स्वस्त आणि तरीही कोबी पिकांतील चारही महत्त्वाच्या किडींच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत कार्यक्षम ठरली आहे. या गोळ्यांचा योग्य प्रकारे वापर केल्याने अन्य कोणतेही कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज प्रक्षेत्रावर घेतलेल्या चाचण्यांमध्ये जाणवली नाही. त्यानंतर बंगळूर नजीकच्या मदप्पनहल्ली गाव (येलाहान्का होबली) येथे शेतकऱ्यांच्या फुलकोबीच्या शेतांमध्येही चाचण्या घेण्यात आल्या.
हरीश यांच्या शेतातील चाचण्या ः
१) साधारणतः २५ दिवस वयाची व संकरित धवल जातींची फुलकोबीची रोपे शेतात ४५ सेंमी बाय ३० सेंमी अंतरावर लावण्यात आली. एक एकर क्षेत्रामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश (१२०:८०:८०) प्रमाणात दिले. पिकासाठी ठिबक सिंचन यंत्रणा बसवली.
२) पहिली निमगोळ्यांची फवारणी पुनर्लागवडीनंतर १५ दिवसांनी केली. (प्रमाण ६ किलो प्रति एकर, एकरी २०० लिटर पाण्यातून.)
३) त्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने सलग हीच फवारणी केली.
४) या प्रायोगिक क्षेत्राशेजारीच अन्य क्षेत्रामध्ये नियंत्रित क्षेत्रामध्ये पारंपरिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यात रासायनिक कीटकनाशकांचाही समावेश होता. येथील शेतकरी जी रसायने वापरतात, त्यांचीच फवारणी ३ ते ४ दिवसांच्या अंतराने घेण्यात आली.
निमगोळ्यांचे द्रावण बनवणे व त्याचा वापर ः
१) निमगोळ्या (NSPPF) या फवारणीआधी रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या जातात. एकरी साधारण ६ किलो गोळ्या आवश्यक असून, त्यापासून दोनशे लिटर द्रावण तयार केले जाते. हे द्रावण फवारणीआधी पातळ फडक्याने किंवा गाळणीने व्यवस्थित गाळून घेतले जाते. त्यात स्टिकर अर्धा मि.लि. प्रति लिटर मिसळून पिकावर फवारणी केली जाते.
२) दर सात ते आठ दिवसाच्या अंतराने सुमारे सत्तर दिवसांपर्यंत या फवारण्या घेण्यात आल्या.
३) मावा आणि चौकोनी ठिपक्याचा पतंग यांच्या नियंत्रणासाठी सरासरी ७ ते ८ फवारण्या आवश्यक असतात.
४) पुनर्लागवडीनंतर ७० दिवसांनंतर काढणीला सुरुवात झाली.
५) दरम्यानच्या काळामधील प्रत्येक टप्प्यावर संस्थेच्या शास्त्रज्ञांमार्फत लक्ष ठेवून सर्वेक्षण करण्यात आले. दोन्ही क्षेत्रांतील कीटकांचे प्रमाण व नियंत्रणासह प्रत्येक बाबी नोंदवल्या आल्या.
तंत्रज्ञानाचे परिणाम ः
- या नव्या तंत्रामुळे सामान्यपणे कोबीवर्गीय पिकामध्ये होणाऱ्या २० फवारण्यांपासून सात ते आठ फवारण्यांपर्यंत कमी झाली.
- या पर्यावरणपुरक फवारणीमुळे रसायनाचा वापर बंद झाला. फवारणीसाठी आवश्यक मजुर व द्यावी लागणारी मजुरी कमी झाली.
- NSPPF प्रक्रिया केलेल्या पिकामध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंगाचा प्रादुर्भाव ०.४ नग प्रति रोप झाला होता. तर रसायनांचा वापर केलेल्या पिकामध्ये त्याचे प्रमाण ०.३ नग प्रति रोप झाल्याचे दिसले.
- सामान्यपणे शेतकरी या चार महत्त्वाच्या किडीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांच्या मिश्रणांची फवारणी दर तीन ते चार दिवसांच्या अंतराने करत राहतात. पिकाच्या कालावधीमध्ये १८ ते २० फवारण्या होतात. अर्धा एकर कोबीवर्गीय पिकामध्ये त्यासाठी सुमारे ३५ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो.
- निमगोळ्यांच्या (NSPPF) फक्त ७ ते ८ फवारण्या झाल्या. त्यासाठी पूर्ण पीक कालावधीमध्ये केवळ ९ हजार रुपये खर्च झाला.
- उत्पादित पिकाचा दर्जाही चांगला राहिला. अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) म्हणून शेतकऱ्याने त्याचे वेगळी विक्री केली. गड्ड्याचे वजन सरासरी १.२० किलो इतके भरले. तुलनेमध्ये रासायनिक पद्धतीने नियोजन केलेल्या क्षेत्रामध्ये गड्ड्याचे वजन सरासरी ०.९ किलो इतके भरले.
- नव्या तंत्रामुळे शेतकऱ्याला अर्धा एकर फुलकोबी पिकातून ९८ हजार रुपये इतका नफा झाला. तर रासायनिक पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतातून केवळ ५५ हजार रुपये नफा मिळाला.
- NSPPF तंत्राचे नफा आणि खर्च यांचे गुणोत्तर हे ४.५८ होते. तर तुलनेमध्ये रासायनिक पद्धतीचे गुणोत्तर हे २.१० इतके होते.
- कीटकनाशक व फवारणीच्या खर्चातील बचत ४३ हजार रुपये इतकी होती.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्पादन कीटकनाशक मुक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने मिळवण्यात यश आले.
(स्रोत ः भारतीय फळबाग संशोधन संस्था, बंगळूर)