भात लागवडीतील कष्ट कमी करणे शक्य

कोकणातील शेतीसाठी गादीवाफे तंत्र उपयक्त ठरेल.
कोकणातील शेतीसाठी गादीवाफे तंत्र उपयक्त ठरेल.

भात लागवडीमध्ये राब जाळणे, रोपे तयार करणे, चिखलणी व पुनर्लागवड ही सारी अधिक मनुष्यबळ लागणारी व कष्टदायक कामे आहेत. ती कमी करून जमिनीची सुपीकता जपणे शून्य मशागत आणि तण व्यवस्थापन तंत्राने शक्य होणार आहे. भात हे जगभरातील सर्वाधिक लोकसंख्येचे प्रमुख धान्य पीक आहे. मात्र, राब जाळणे, रोपे तयार करणे, चिखलणी व पुनर्लागवड ही सारी अधिक मनुष्यबळ लागणारी कामे आहेत. सध्याच्या मजुरांच्या कमतरतेमुळे उत्पादन व उत्पन्‍नाचे अर्थशास्त्र जुळत नाही. आमच्याकडे देशावर पेरभात शेतीची प्रथा आहे. उसानंतर भात हे प्रमुख फेरपालटाचे पीक आहे. माझे पुढे प्रश्‍न असा होता की, भाताच्या उत्क्रांतीत कोकणात लागवड पद्धत तर देशावर पेरभात अशी पद्धत का विकसित झाली असावी, याचा मुळापर्यंत विचार केल्यानंतर राब भाजणे, रोपे तयार करणे, चिखलणी, पुनर्लागवड ही पद्धत पूर्वजांनी तण व्यवस्थापनासाठी विकसित केल्याचे जाणवले. पूर्वी तणाच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने माणसांवर अवलंबून राहावे लागत होते. अशा वेळी राब भाजण्यामुळे रोपात तणांचे प्रमाण नगण्य राहते, तर चिखलणीत उगवलेली सर्व तणे चिखलात गाडून वर ५ ते ७ सेंमी पाणी उभे राहून भाताचे रोप लावल्याने तणांचे नियंत्रण शक्य होते. आपल्या पूर्वजांची ही कल्पकता कौतुकास्पद आहे. भात पीक जरी उभ्या पाण्यात व्यवस्थित वाढत असले तरी पहिले २५ ते ३० दिवस (रोपावस्था) त्याला इतर पिकाप्रमाणे वापसा असणे गरजेचे आहे. इतर सर्व पिकांना भुसभुशीत जमीन चालते. भाताला जमीन कठीण असेल तितकी चांगली. आता तण नियंत्रणासाठी तणनाशकांची पर्याय उपलब्ध झाला आहे. सर्व गोष्टी लक्षात घेत भात तंत्रज्ञानात सुधारणा करणे गरजेचे आहे. देशावरील ऊस अगर इतर पिकानंतरची पेरभात पद्धत व कोकणातील रोप लागवड अशा दोन्ही पद्धतीत सुधारणा करावयाच्या आहेत. देशावरील पेरभात शेती ः ऊस किंवा अन्य कोणतेही पीक सरी वरंब्यावर घ्यावे. त्याच्या निर्मितीसाठी एकदाच मशागत करावी. पुढे सऱ्या कोणतीही हलवाहलवी न करता वापरता येतात. उसाचे खोडवे तुटल्यानंतर पाचटाचे व्यवस्थापन करावे. मशागत न करत भात पेरणीच्या हंगामात सरीला पाणी द्यावे. सरीच्या दोन्ही बाजूला टोकण पद्धतीने भात पेरणी करून परत पाणी द्यावे. भात उगवणीला पाच दिवस लागतात. तत्पूर्वी उसाच्या हिरव्या पानावर ग्लायफोसेट, तर जमिनीवर ऑक्झीफ्लूराफेन हे तणनाशक फवारावे. एक महिन्यानंतर परत तणे येतील, त्या वेळी (पेरणीनंतर २५ ते ३० दिवस) पीक व तण उगवणीनंतर मारण्याच्या तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तणनाशकाला दाद न देणाऱ्या काही तणांसाठी फक्त हाताने भांगलणी करावी. बाकी सर्व व्यवस्थापन नेहमीप्रमाणे. पेरणीसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. त्या खर्चात बचत करण्यासाठी आता सरीत योग्य मापात बी विसकटून गरजेइतके दात ठेवून कोळपणी केल्याप्रमाणे वरच्यावर मातीत बी मिसळावे. सरीला पाणी द्यावे. कमीत कमी मनुष्य बळात पेरणी होते. फक्त पहिल्या २० ते २५ दिवसांत प्रमाणापेक्षा जास्त पाऊस लागल्यास त्याचा भाताला त्रास होऊ शकतो. तण नाशकाने नियंत्रणामुळे पीक ओळीत पेरण्याची गरज आता संपुष्टात येते. (कोळपणी नाही.) कोकणातील लागवड पद्धत ः कोकणातील लागवड पद्धतीमध्ये नवीन सुधारणा करण्याची गरज आहे. राब भाजणे, रोपे तयार करणे, चिखलणी, लागवड पूर्ण बंद करता येईल. एकदाच मशागत करून सरीच्या तळात १५० सेंमी व वरील बाजूस १२० सेंमी अंतराचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. असे वाफे तयार करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. गादी वाफे ही रचना कोकणातील जास्त पावसाच्या परिस्थितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. खाचरात पाणी न साठवता वाफ्यातील नालीत अतिरिक्त पाणी उतरून ते बाहेर वाहून जाण्यासाठी योग्य मार्ग तयार कारावेत. कोकणातील जमिनीत पोयटा कमी व बारीक वाळूचे प्रमाण जास्त असल्याने माती लगेच बसते. अशा गादी वाफ्यावर भात लागवडीचे सगुणा भात तंत्र (एस.आर.टी) नेरळ, (ता. कर्जत, जि. रायगड) येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी तयार केले आहे. वाफ्यावर भात टोकण करण्यासाठी खुणा करण्याचेही यंत्र आहे. दोन माणसांच्या साह्याने केलेल्या खुणांवर मागे दो नमहिला बीट टोकू शकतात. एक एकर पेरणीसाठी ६ पुरुष व ६ महिला पुरेशा आहेत. यात चार सुत्री तंत्राप्रमाणे वाफ्यावर युरिया ब्रिक्रेटचा फक्त एकदाच वापर केला जातो. भात निसवण्यापूर्वी ८ ते १० दिवस एकरी २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅशचा हप्ता दिल्यास भाताचे दाणे चांगले भरतात. असा अनुभव आहे. याच गादीवाफ्यावर पुढे कायम स्वरूपी हिवाळी, उन्हाळी पिके उदा. धान्य, कडधान्य, भाजीपाला इ. कोणतीही हलवाहलव न करता घेता येतात. गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्याकडे हे तंत्र यशस्वीपणे काम करते. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत ठरते. बाहेरून अन्य सेंद्रिय खताची गरज भासत नाही. जमिनीची धूप (चिखलणी) रोखली जाते. वर्षानुवर्षे सुपीकता वाढत जाऊन पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के जास्त उत्पादन मिळते. मिथेन उत्सर्जनही कमी होत असल्याने पर्यावरणपूरक पद्धत ठरते. सर्व संसाधनांचा कमीत कमी वापर करून पीक उत्पादनाची संवर्धित शेती पद्धती. आता महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विदर्भासह १५ जिल्ह्यांत व राज्याबाहेरील २ ते ३ हजार शेतकरी या पद्धतीचा वापर करतात. आता कष्टदायक भात शेतीऐवजी भात शेतीचा आनंद उपभोगत आहेत. यात येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे, प्रत्येक महिन्याला बैठक व शेतकऱ्यांचे उत्पादनाची नोंद असे अत्यंत काटेकोरपणे काम केले जाते. देशी कापूस जातींची सघन लागवड तंत्र बोंड अळी नियंत्रणासाठी कीडनाशकांची फवारणी सातत्याने करावी लागत असल्याने भारतीय शेतकरी कंटाळले होते. बीटी कपाशीच्या आगमनापूर्वी भारतामध्ये शेतकरी कापूस पेरणे बंद करू लागले होते. बीटी जातींच्या आगमनानंतर चित्र पालटले. कापसाला चांगले दिवस आले. कित्येक लाख गाठी कापूस भारतातून निर्यात होऊ लागला. १० ते १५ वर्षांनंतर आज अमेरिकन बोंड अळीचे प्रमाण अद्यापही कमी असले तरी गुलाबी बोंड अळी व रस शोषक किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना बेजार केले. यावर उपाययोजना सुरू आहेत. मध्यंतरी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी दीपक जोशी भेटले. त्यांनी वेगळे वास्तव पुढे आणले. नुकतेच परभणी येथील कृषी विद्यापीठामध्ये देशी कापूस जाती संबंधित अधिवेशन पार पडले. त्यातून विद्यापीठात सुरू असलेल्या देशी कपाशी जातींवर संशोधनाची माहिती पुढे आली. पूर्वी भारतीय जाती धाग्याच्या लांबीत कमी पडत असत. त्यात भरपूर सुधारणा करून बोंडाचे आकारमान व धाग्याची लांबी यात परदेशी वाणाची बरोबरी करणारे सरळ वाण विद्यापीठाने तयार केले आहेत. या वाणावरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी थोड्याशा फवारण्या पुरेशा ठरतात. या जाती रस शोषक किडींसाठी बऱ्यापैकी प्रतिकारक असल्याने फवारणी खर्चात बचत होते. आज सरासरी कापसाचे उत्पादन ५ ते ६ क्विंटल आहे. या नव्या देशी जातींच्या रोपांची संख्या अधिक ठेवल्यास बीटी जातींइतकेच उत्पादन देऊ शकत असल्याचे सांगण्यात आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे बियाणे घरचे वापरता येणे शक्य असल्याने रोपांची संख्या अधिक ठेवण्यासाठी अधिक खर्च करावा लागत नाही. या सुधारीत देशी वाणांच्या धाग्याच्या लांबीची नोंद जागतिक पातळीवरील संस्थेने घेतल्याची माहिती प्राप्त झाली. या विषयात उल्लेखनीय काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख शेतकरी व शेतापर्यंत पोचणे आवश्यक आहे. यात नव्या जातींमध्ये शून्य मशागत व तण व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करण्यासंदर्भात अधिक अभ्यास झाल्यास खर्चामध्ये अधिक बचत साध्य होईल. समाप्त ः

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com