नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
टेक्नोवन
साध्या डोळ्यांनी न पाहता येणारे रंगही नव्या तंत्राने टिपता येणार
नव्या तंत्रामुळे आजवर मानवी डोळ्यांसाठी अज्ञात असलेल्या निसर्गातील विविध रासायनिक किंवा जैविक मूलद्रव्यांचा, संयुगांचा वेध घेणे शक्य होणार आहे.
तेल अविव विद्यापीठाने विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरातून मानवी डोळ्यांनाही पाहता न येणारे रंग साध्या कॅमेराद्वारेही पकडणे शक्य होणार आहे. या नव्या तंत्रामुळे आजवर मानवी डोळ्यांसाठी अज्ञात असलेल्या निसर्गातील विविध रासायनिक किंवा जैविक मूलद्रव्यांचा, संयुगांचा वेध घेणे शक्य होणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे वातावरणातील विविध वायू उदा. हायड्रोजन, कार्बन, सोडिअम अशा किंवा मूलद्रव्यांचे विशिष्ट रंगही कॅमेरामध्ये पकडता येतील. हे तंत्रज्ञान केवळ फोटोग्राफीच नव्हे तर अवकाश, सुरक्षा, वैद्यकीय अशा विविध शाखांमध्ये उपयुक्त ठरणार आहे.
तेल अविव विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. मायकेल म्रेजेन, योने इरलिच, डॉ. असाफ लेवानोन आणि प्रो. हॅम सुचोवस्की यांच्या संशोधनातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या संशोधनाची माहिती ऑक्टोबर महिन्याच्या लेसर अॅण्ड फोटोनिक्स रिव्ह्यूवज मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. मायकेल म्रेजेन यांनी सांगितले, की मानवी डोळे केवळ ४०० ते ७०० नॅनोमीटर तरंगलांबीचे फोटोन्स कण पाहू शकतात. रंगाच्या भाषेत बोलताना निळा ते लाल रंगांदरम्यानचे रंग पाहता येतात. मात्र एकूण विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचा विचार केला असता, हा अत्यंत अल्प भाग आहे. त्या व्यतिरिक्त रेडिओ लहरी, मायक्रोवेव्ह, क्ष किरण आणि अन्य अनेक बाबी आपल्या नजरेआड राहतात. ४०० नॅनोमीटर पेक्षा कमी असलेल्या किरणांना अतिनील किरणे (अल्ट्रा व्हायोलेट) आणि ७०० नॅनोमीटरपेक्षा अधिक तरंगलांबी असलेल्या किरणांना अवरक्त किरणे (इन्फ्रारेड ) म्हणतात. त्यामध्ये जवळ ते अधिक दूर यानुसार तीन प्रकार पडतात.
सध्या असलेल्या अडचणी
- एकूण स्पेक्ट्रमवर असलेल्या मूलद्रव्यांचा व त्यांच्या गुणधर्माचा वेध घेण्यामध्ये आजवर अडचणी होत्या. आता नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांची छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे.
- उदा. कर्करोगाच्या पेशींमध्ये असलेल्या मुलद्रव्यांच्या तीव्रतेनुसार त्यांचा रंग बदललेला दिसणार आहे.
- सध्याच्या अवरक्त किरणांचा वेध घेणारे तंत्रज्ञान अत्यंत महागडे आहे. त्यातही रंगाचा अचूक वेध घेतेच असे नाही.
- विशेषतः वैद्यकीय बाबींमध्ये किंवा प्रयोगामध्ये घेतलेल्या प्रतिमा दृश्य रंगामध्ये परावर्तित करण्यासाठी एकतर अत्यंत व्यावसायिक आणि महागड्या कॅमेरांचा वापर करावा लागतो. त्यातही अनेक वेळा नेमक्या पेशी केवळ रंगाद्वारे ओळखणे अडचणीचे व अवघड ठरते. उदा. कर्करोगाच्या पेशी.
नेहमीच्या कॅमेऱ्यावर चढवता येणारे तंत्र
या अडचणीवर मात करणारे स्वस्त आणि कार्यक्षम असे तंत्रज्ञान तेल अविव विद्यापीठामध्ये विकसित करण्यात आले. नेहमीच्या कॅमेरावर नवे तंत्र सहजतेने बसवता येते. त्याद्वारे संपूर्ण अवरक्त स्पेक्ट्रममधील प्रकाश कण (फोटॉन्स) दृश्य पातळीवरील कणांमध्ये रुपांतरित केले जातात. त्यामुळे त्या तरंगलांबी साध्या डोळ्यांनी पाहता येतात किंवा कॅमेऱ्याने टिपता येतात. या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी नोंदणी करण्यात आली आहे.
उपयोग
- विविध वैद्यकीय प्रतिमांकनामध्ये याचा अंतर्भाव करता येईल.
- या तंत्रामुळे अगदी शेतामध्येही वनस्पतीद्वारे अथवा किडींद्वारे उत्सर्जित होणाऱ्या विविध संयुगांचा वेध घेता येईल.
- तसेच शेती परिसरामध्ये प्रदूषणाचे प्रमाणही जाणून घेता येईल.
- एखाद्या स्फोटकाच्या स्फोटानंतर किंवा किरणोत्सारी मूलद्रव्याचे पसरलेले कणही पाहता येतील. यामुळे आरोग्यासाठी असलेला धोका त्वरित लक्षात येऊ शकेल.
- उपग्रहामध्ये या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केल्यास दूरवरूनही विविध संयुगांचा माग घेता येईल.
- सर्व वस्तूंमधून उत्सर्जित होणारे उष्णता ही अवरक्त कणांच्या स्वरूपामध्ये असते. ती अगदी रात्रीच्या वेळीही आपल्या पाहता येईल. त्याचे फोटो घेता येतील.