agriculture stories in marathi new way to cultivate cotton crop | Page 2 ||| Agrowon

कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा

कुशावर्त पाटील
मंगळवार, 23 जून 2020

कपाशीमध्ये बियाणांची उपलब्धता, त्यासाठी होणारा वाढता खर्च, गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव, बीटी बियाणांच्या आगमनानंतर वाढलेला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, या दोन्ही प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी वाढलेला खर्च अशा समस्या आहेत.

दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे वर्ष अनेक दृष्टीने वेगळे आहे. कोविड १९ च्या महामारीमुळे जीवनाचे चक्र संपूर्णपणे ठप्प झाले. जागतिक पातळीवरील राजकारणांमध्येही तीव्र बदल होत गेले. कपाशी पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांच्या मनात  संभ्रम असल्याचे बोलण्यातून दिसून येते. या पुढील चार समस्या प्रामुख्याने शेतकऱ्यांना जाणवत आहेत. 

    गत वर्षी (२०१९) पावसाने उशिरा जोर धरल्याने कपाशीचा पीक कालावधीही लांबला. खानदेश, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कपाशी विक्रीमध्ये अडचणी आल्या. आधीचाच कापूस विकण्याची शाश्वतता नसताना या वर्षी लागवड करायची का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
    भारताचा कापूस हा मुख्यत्वे चीनसारख्या देशात दरवर्षी निर्यात केला जातो. या वर्षी कोरोना संकट आणि सध्या सुरू असलेल्या सीमेवरील तणावामुळे ही चीनला होणारी निर्यात धोक्यात येऊ शकते. 
    फेब्रुवारीपर्यंत खाजगी व्यापारांनी मालाची खरेदी केली असली तरी पुढे निर्यातच बंद झाल्याने त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. लॉकडाऊन आणि अन्य साऱ्या परिस्थितीचा विचार करता त्यांनी कापूस खरेदी करण्यामध्ये हात आखडता घेतला होता. 
    सरकारी सीसीआयसारखी यंत्रणा बुचकळ्यात सापडल्यासारखी वागताना दिसते. यामुळे कापसाची खरेदी ही अगदी कासवाच्या गतीने चालत आहे. 
या चार समस्यांशिवाय अन्य पारंपरिक व गेल्या चार पाच वर्षापासून जाणवणाऱ्या समस्या तशाच आहे. उदा. बियाणांची उपलब्धता, त्यासाठी होणारा वाढता खर्च, गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव, बीटी बियाणांच्या आगमनानंतर वाढलेला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, या दोन्ही प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी वाढलेला खर्च अशा समस्या आहेत. त्यातच नव्याने येऊ घातलेल्या एचटीबीटीसारख्या बियाणांचा बेकायदा सुळसुळाट त्याला आकर्षित करतो आहे. अर्थात, अशा बेकायदा व अनधिकृत बियाणाच्या आकर्षणाला बळी पडून चालणार नाही, हे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. बीटी बियाणांचा तुटवडा होणार नाही, यासाठी मागील दोन वर्षापासून केंद्रीय कापूस संशोधन संस्था व अन्य कृषी विद्यापीठांद्वारे प्रयत्न सुरू केले आहेत. 

कापूस पिकासाठी उपाययोजना

कापसाच्या कोणत्या जाती लावाव्यात?

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा ऑगस्ट महिन्यानंतर जाणवू शकतो. यामुळे लवकर परिपक्व होणाऱ्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. कारण लवकर येणाऱ्या वाणांना फुले व बोंडे लवकर येतात. बोंडअळीचे प्रमाण वाढण्याआधी ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत कापूस वेचणी करता येते. धाग्यांची प्रतही टिकते. बोंडअळीसाठी लागणाऱ्या फवारणीचा खर्चही टाळता येतो. सीआयसीआरने अशा प्रकारचे कमी कालावधीचे वाण विकसित केले आहे. 
उदा. अंजली ( एलआरके ५१६) हा कमी कालावधीचा वाण विकसित केला आहे.
    कोरडवाहू क्षेत्रासाठी विकसित केलेले बीटी वाण -पीकेव्ही ०८१ बीटी, जीजेऐचव्ही ३७४ बीटी, रजत व सुरज बीटी हे आहेत तसेच बीजी २ मध्ये पीकेव्ही संकर हेही वाण उपलब्ध आहे.
अगदी खाजगी बियाणे घेतानाही लवकर परिपक्व होणारे वाण शेतकऱ्यांनी निवडावे. 

जैविक बीजप्रक्रिया 
जैविक बीजप्रक्रियेमुळे जिवाणूंच्या संवर्धनासोबत, बीज उगवणीची प्रक्रिया जोमदार होते, शिवाय मातीतील पिकास हानिकारक असलेल्या सूक्ष्मजिवांना काही प्रमाणात अटकाव होतो. कपाशीसाठी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी ही जैविक खते २५ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया नक्की करावी. प्रथम १०० ते २०० ग्रॅम गूळ पाण्यात विरघळवून द्रावण तयार करून घ्यावी. त्यात १ किलो जिवाणू संवर्धकाचे पाकीट टाकावे. त्याची प्रक्रिया बियाणांवर हळूवारपणे करावी. सावलीत वाळवल्यावर त्वरित त्याची पेरणी करावी.

एक बीज लागवड 
जमिनीच्या प्रकारानुसार ३x१फूट,  ३x१.५ फूट,  ४x१ फूट या प्रमाणात अंतर ठेवून एका जागी एकच बी टोकावे. यामुळे पिकांमध्ये हवा व पाणी खेळते राहते. अन्य रोपांशी स्पर्धा कमी होते. अन्नद्रव्ये पूर्णपणे पिकास उपलब्ध होऊ शकतात. पिकाची सशक्त वाढ झाल्याने रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते. याच बरोबर एकेरी टोकणीमुळे बियाणे कमी लागते. त्याचा खर्च कमी होतो. पिकांचे अंतर योग्य ठेवल्याने आंतरमशागतीची कामे सुलभ होतात. उत्पादनात वाढही होते. 

आंतरपीक 
आंतरपिकांमध्ये प्रामुख्याने डाळवर्गीय पिकांची निवड करावी. उदा. मूग, उडीद, तूर, चवळी इ. यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. मुख्य पिकाची आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरांत वाढतात. त्यांची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असते. तसेच उंची वेगवेगळी असल्यामुळे सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होत नाही. या पिकांमुळे तणांचा व  कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान एका पिकाचे तरी उत्पन्न हाती लागते. 
    कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाकरिता आंतरपीक/मिश्र पिकाची मदत होते. 
    आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांच्या विविध  गरजा  उदा. नगदी,  तृणधान्य,  कडधान्य, गळीतधान्य,  जनावरांसाठी चारा, जळणाकरिता इंधन इ. भागविल्या जाऊ शकतात.

सापळा पीक व रेफुजी लावणे
आता सरकारच्या निर्देशानुसार बियाणांच्या पाकिटामध्ये रेफुजी नॉन बीटी बियाणे मिसळलेले  असते. जर नसल्यास शेतकरी अतिरिक्त १२० ग्रॅम रेफुजी बियाणे विकत घेऊन बांधावर किंवा बाजूने पेरावे. अन्य सापळा पिके लावताना झेंडू, मका अशा पिकांची निवड करावी.

पाण्याचा समतोल वापर करणे 
बागायती कापसात सूक्ष्म जलसिंचनाचा वापर करावा. कोरडवाहू क्षेत्रात मोकाट जलसिंचनाचा वापर टाळावा. एक सारी आड पद्धतीने कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये पाणी दिल्याने पाण्याची बचत होते. अतिप्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळणे:  उदा. शिफारशीप्रमाणे रासायनिक नत्रयुक्त खतांचा विभागून वापर करावा. 
    खतांचा वापर संतुलित पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा पिकामध्ये रसशोषक किडींचे प्रमाण वाढते. जास्त रासायनिक खताच्या वापराने जमिनीची पोत खराब होत जाते. टप्प्याटप्प्याने नत्रयुक्त खते द्यावीत. सुरुवातीला २०% तर ४० ते ४५ दिवसांनी ४०% व ६० दिवसांनी उर्वरित ४० % या प्रमाणे नत्रयुक्त खते विभागून द्यावीत. स्फुरद व पालाशची मात्रा ही एकाच टप्प्यात सुरुवातीला पूर्णतः द्यावी.
    बागायतीसाठी १२०ः६०ः६० किलो प्रति हेक्टरी तर कोरडवाहूसाठी ६०ः३०ः३० किलो नत्रः स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी या प्रमाणात खते द्यावीत. 
    जैविक खतांचा वापर करावा. उदा. द्रवरूपात असलेली अॅझोटोबॅक्टर, पी. एस. बी., के. एस. बी. प्रत्येकी २ लीटर प्रती एकर या प्रमाणात ठिबकद्वारे अथवा पंपाने फवारून द्यावी. 

लागवडीनंतर पहिले ४५ दिवसापर्यंत 
रासायनिक फवारणी टाळावी 

रासायनिक कीडनाशकांच्या फवारणीमुळे पिकासोबत वाढणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजीव व मित्रकिडींचा ऱ्हास होतो. सुरवातीच्या टप्प्यात शक्यतो जैविक किंवा वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करावा. उदा. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क इ. ही शेतकऱ्यांना घरगुती बनवून अगदी कमी खर्चात बनवता येतात. खर्चात मोठी बचत होते.

सापळ्यांचा वापर करणे
कापूस लागवडीनंतर ३० दिवसांनी शेतात एकरी १५ ते २० या प्रमाणात पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. यामुळे रसशोषक किडींचे प्रमाण व आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या तुलनेत तपासता येते. गुलाबी बोंडअळीसाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. (प्रमाण ः ४ ते ५ प्रति हेक्टरी ) 

पर्यायी जैविक घटकांचा वापर करावा
कापूस पिकात अधिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. हे टाळण्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रणाचे उपाय अवलंबावेत. उदा. 
    व्हर्टिसिलियम लेकॅनी : पिढ्या ढेकूण, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे इ. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी. प्रमाण ः ५ मि.ली. किंवा ५ ग्रॅम प्रती लीटर. 
(१०८ सीएफयू प्रती ग्रॅम तीव्रता)
    बिव्हेरिया बॅसियाना : सर्व प्रकारच्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उत्तम. प्रमाण ः २ मि.ली. किंवा २ ग्रॅम प्रती लीटर (१०८ सीएफयू प्रती ग्रॅम तीव्रता)
    जैविक कीटकनाशके हे मानवांसह पर्यावरणासाठी पूर्ण सुरक्षित आहेत. त्यांचा खर्च कमी असून, पिकातील मित्रकिटकांना हानी पोचत नाही. 

मित्रकीटक  संवर्धन व वापर 
यात ट्रायकोग्रामा व क्रायसोपर्ला या मुख्य किडींच्या अंडी नष्ट करणाऱ्या मित्र किटकांचे प्रसारण करावे. ट्रायकोकार्ड हे १. ५ लाख अंडी प्रतिहेक्टरी सोडावीत तर पीक ४० दिवसांचे झाल्यानंतर क्रायसोपर्ला कार्ड १०,००० अंडी प्रति हेक्टरी हे १५ दिवसांनंतर प्रत्येकी दोन वेळा सोडावीत. 

 ः कुशावर्त पाटील, ९९७०७३३५५६
(प्रकल्प समन्वयक (कृषी), बेटर कॉटन इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट, लुपीन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फौंडेशन, धुळे.)


इतर नगदी पिके
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...