नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक कार्यक्षम

नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक कार्यक्षम
नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक कार्यक्षम

पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला कार्बनडाय ऑक्साईडचा विचार मनामध्ये येतो. कदाचित त्याही पुढे जात भराभर आकाशामध्ये धूर सोडणाऱ्या विविध उद्योगांच्या चिमण्या आपल्याला अस्वस्थ करतात. मात्र, आपण शेतामध्ये वापरत असलेला पिकाच्या गरजेपेक्षा अधिक, अनावश्यक युरिया आपल्याला अस्वस्थ करत नाही. या लेखामध्ये नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूची माहिती घेऊ. शेतीक्षेत्र व पशुपालनाशी संबंधित घटकांमध्ये मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे दोन हरितगृह वायू महत्त्वाचे आहेत. एकूण हरितगृह वायूचा विचार केला असता त्यात कार्बनडाय ऑक्साईड या वायूचे प्रमाण अधिक (८२ टक्के) असून, त्या तुलनेमध्ये मिथेन (१० टक्के) आणि नायट्रस ऑक्साईड (६ टक्के) हे कमी आहेत. नायट्रस ऑक्साईड काय आहे?

  • नायट्रस ऑक्साईड या वायूला सामान्यपणे हसवणारा वायू असेही म्हणतात. आपल्या विज्ञानाच्या शिक्षकांनी शिकवताना किंवा शालेय प्रयोगशाळेमध्ये याची प्रत्यक्ष प्रचिती दिलेली असते. एकेकाळी दुखणाऱ्या दाताच्या वेदना कमी करण्यासाठीही दंतवैद्यकांनी याचा वापर केल्याचे सांगितले जाते. मात्र, या हसवणाऱ्या वायूचे वातावरणात वाढणारे प्रमाण पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याला नक्कीच रडवत आहे.
  • नायट्रस ऑक्साईड हा वायू अन्य हरितगृह वायूप्रमाणे किरणे शोषून, वातावरणातील उष्णता पकडून ठेवतो. पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये नायट्रोजन हा सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येताच त्याचे रुपांतर नायट्रस ऑक्साईडमध्ये होते. पृथ्वीवरील सजीवांचे सूर्यकिरणातील अतिनिल किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यापासून रोखणाऱ्या ओझोनच्या थराला हा वायू नुकसान पोचवतो. सुमारे ४० टक्के नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन हे मानवी कार्यपद्धतीमुळे होते. त्यातही प्रामुख्याने कृषी क्षेत्रातून होते. अमेरिकेत हे प्रमाण सुमारे ७५ टक्के आहे.
  • वातावरण बदलाचे चलन हे जर कार्बनडाय ऑक्साईड मानल्यास पशुपालन आणि अन्य प्रक्रियेतून बाहेर पडणारा एक टन मिथेन हा वातावरणामध्ये उत्सर्जित होत असलेल्या सुमारे ३४ टन कार्बनडाय ऑक्साईडच्या बरोबरीचा होतो आणि एक टन नायट्रस ऑक्साईड हा २९८ टन कार्बनडाय ऑक्साईड इतका हानिकारक ठरू शकतो. थोडक्यात नायट्रस ऑक्साईड हा कार्बनडाय ऑक्साईडच्या ३०० पट अधिक धोकादायक आहे.
  • नायट्रस ऑक्साईडचा वातावरणातील आयुष्यकाळ ११४ वर्षे इतका आहे. तसेच वातारणातील नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेने वातावरणातील ओझोनचे प्रमाणही कमी होते. म्हणजेच नायट्रस ऑक्साईड हा ओझोन नष्ट करणारा वायूही आहे.
  • शेती आणि पशुपालनातून होणारे उत्सर्जन ः हरितक्रांतीच्या दरम्यान नव्या जातींसोबत नत्रयुक्त खतांचा वापर जगभरामध्ये वाढत गेला. एकट्या अमेरिकेमध्ये पिकांचे क्षेत्र तुलनेने स्थिर असतानाही खतांचा वापर गेल्या ६० वर्षामध्ये २०० टक्क्याने वाढला आहे. व्यावसायिक पशुपालनांचे प्रमाण वाढल्यामुळे शेणखतांचे मोठमोठे डोंगर उभे राहत आहेत. त्यांचा वापर शेतामध्ये पसरून केला जात आहे. २०१३ च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, औद्योगीकरण पूर्व काळापासून मानवी कार्यपद्धतीमुळे नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण २० टक्क्याने वाढले आहे. यामध्ये काही बदल न केल्यास २०५० सालापर्यंत हे उत्सर्जन दुप्पट होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारतातही १९६० नंतर शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. पिकासाठी नत्राचे प्रमाण सर्वाधिक लागत असल्याने खतांमध्ये प्राधान्याने युरिया किंवा नत्रयुक्त खताचा वापर अधिक होतो. त्यात माती तपासून पिकांच्या आवश्यकतेपेक्षाही स्वतःच्या समाधानासाठीही खतांचा अतिरिक्त वापर केला जातो. जागतिक पातळीवर पिकांच्या वाढीसाठी वापरल्या गेलेल्या नत्रयुक्त खतांच्या एक टक्के इतके उत्सर्जन वातावरणामध्ये होते असे मानले तरी त्याचा पर्यावरणावरील परिणाम मोठा आहे. केवळ पर्यावरणावरील परिणामांचा विचार बाजूला ठेवला तरी शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतींची कार्यक्षमता या दृष्टीनेही अधिक विचार होण्याची गरज आहे. प्रत्येक किलो नायट्रस ऑक्साईड उत्सर्जनामागे डाय नायट्रोजन (N२) सारखे अन्य नायट्रोजन वायू मोठ्या प्रमाणात (२ ते ७० किलो) बाहेर पडतात. अर्थात यातील अनेक वायू हा उदासीन (म्हणजेच पर्यावरणावर कोणताही परिणाम न करणारे) आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून विकत घेतलेल्या खते पिकाला मिळण्याऐवजी हवेत मिसळून वाया जातात. ही काळजीची खरी बाब असली पाहिजे. सध्या अनुदानावर उपलब्ध होत असल्याने नत्रयुक्त खते शेतकऱ्यांना स्वस्त वाटतात. भविष्यात अनुदान कमी झाल्यास त्याची खरी किंमत आपल्याला जाणवू लागेल. मात्र, नायट्रस ऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी केवळ शेतीला दोषी ठरवून चालणार नाही. त्याचे उत्सर्जन हे अनेक प्रकारे होत असते. त्यामध्ये विविध इंधनाचे कोणत्या प्रकारे ज्वलन होते, हेही महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाण नायट्रिक अॅसिड (खतासाठी वापर) किंवा अॅडीपीक अॅसिड (नायलॉन आणि अन्य सिंथेटिक पदार्थांच्या निर्मितीसाठी) यांच्या उत्पादनामध्येही नायट्रस ऑक्साईड हा उपपदार्थ तयार होतो. ग्रामीण धोरण आणि हवामान बदल संचालक बेन लिलीस्टोन यांनी सांगितले, की पशुपालनामध्ये उभे राहत असलेले शेणखतांचे मोठे ढीग किंवा खड्डे यातील वरील थरांतून मिथेनचे उत्सर्जन होते, तर खालील थरांतील शेणांचा ऑक्सिजनशी संपर्क होत नाही. त्याध्ये नायट्रस ऑक्साईडच्या निर्मितीला सुरुवात होते. कदाचित हे खत पुढे शेतामध्ये वापरले जाते. त्यातून उत्सर्जनाचे प्रमाण वाढते. नैसर्गिक स्रोतातून होणारे उत्सर्जन २०१३ च्या उन्हाळ्यामध्ये हार्वर्ड आणि नोवा यांच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये आर्क्टिक प्रदेशातील पर्माफ्रॉस्ट म्हणजेच गोठलेल्या जमिनीतून होणारे उत्सर्जन हे पूर्वानुमानापेक्षा १२ पटीने अधिक असल्याचे निष्कर्ष काढला आहे. संशोधक जॉर्डन विल्करसन यांनाही प्रथम विश्वास बसला नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा सर्व गणिते पुन्हा तपासून पाहिली. खत वापर अधिक कार्यक्षम करण्यासाठी... वापरल्या जात असलेल्या प्रति टन नायट्रोजन खतांमागे केवळ २५ किलो इतके नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन धरले तरी दरवर्षी सुमारे २५ दशलक्ष डॉलर इतके अर्थव्यवस्थेचे नुकसान होते. म्हणजेच केवळ पर्यावरणाचे नव्हे, तर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वातावरण बदलाशी लढायचे असले, तर आपली शेती अधिक कार्यक्षम आणि शाश्वत करण्याशिवाय पर्याय नाही.

  • नत्रयुक्त खतांचा वापर माती परीक्षणानुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात केला पाहिजे.
  • पिकाच्या वाढीच्या योग्य अवस्थेमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर करावा. एकापेक्षा अधिक वेळा विभागून केल्यास अधिक फायदेशीर राहते.
  • खताचे रुपांतर नायट्रस ऑक्साईडमध्ये होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ती त्वरीत मातीआड केली पाहिजे. उदा. उसामध्ये वापरली जाणारी पहारीने खत देण्याची पद्धत.
  • खताचा वापर व त्यावरील खर्चात बचत करण्यासाठी पिकांच्या फेरपालटामध्ये शेंगावर्गीय किंवा कडधान्य पिकांचा वापर करावा.
  • अधिक पावसाच्या प्रदेशात खते पाण्यासोबत वाहून जाणे टाळण्यासाठी गोळी किंवा पॅलेट स्वरूपात गाडून वापरणे. उदा. भात शेतीमध्ये युरिया डीएपी पॅलेट चार रोपांदरम्यान खोचणे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com