agriculture stories in Marathi nutrient management after fruit pruning | Agrowon

द्राक्ष फळछाटणीनंतरचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

डॉ. अजयकुमार उपाध्याय, युक्ती वर्मा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

द्राक्ष पाने रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असून, या पानांवर कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असेल. ​

द्राक्ष वेलीची उत्पादकता ही प्रामुख्याने छाटणीच्या हंगामापासून केलेल्या अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. जून-जुलैमधील सुरू झालेल्या काडीच्या परिपक्वतेपासून ते फळछाटणीपर्यंत (सप्टेंबर- ऑक्टोंबर) द्राक्ष विभागामध्ये पाऊस असतो. वेलींवर पानांची संख्या अन्नद्रव्य साठवणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. याकरिता पाने सशक्त व निरोगी असणे गरजेचे आहे. ही पाने रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असून, या पानांवर कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असेल. 

छाटणीपूर्ण  नियोजन

 सिंचन यंत्रणाची देखभाल माती व पाणी तपासणी करून घेणे. 
 बहुतांश ठिकाणी द्राक्षबागेत चुनखडीचे पाच टक्क्यांपेक्षा जास्त असून, जमिनीचा सामू ८ पेक्षा जास्त असल्याची समस्या दिसून येते. या परिस्थितीवर मात करण्याकरिता फळछाटणीपूर्वी एकरी ५० किलो सल्फर शेणखतामध्ये मिसळून द्यावे. चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास ही प्रक्रिया दोन ते तीन वर्षे करावी. 
 जर जमिनीमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असल्यास जिप्समचा वापर करावा. मात्र, अनेकवेळा सोडियमयुक्त जमिनीमध्ये चुनखडीचेही प्रमाण जास्त असते, अशा जमिनीमध्ये फक्त सल्फरचा वापर योग्य राहील.  
 ज्या बागेत जमिनीत चुनखडी व पाण्यात क्षारसुद्धा आहेत, अशा समस्येवर मात करण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवणे गरजेचे असेल. यासाठी हिरवळीची खते, कंपोस्ट खत, शेणखत, सल्फ्युरिक आम्ल, मोलॅसिस या पैकी योग्य घटकांचा वापर करावा. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यासोबत सोडिअमचा निचरा होऊन जाईल. 
 जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर फायदेशीर ठरले. खरड छाटणीपूर्वी १२ ते १५ दिवस आधी एकरी १० टन या प्रमाणात शेणखत/कंपोस्ट खत/हिरवळीच्या खतांचा वापर करावा.   
देठ तपासणीचे अहवाल प्रामुख्याने सोडियम आणि क्लोरीनसारख्या समस्येमुळे देठ तपासणीच्या अहवालात वेलीत अन्नद्रव्याची उपलब्ध परिस्थिती कळेल. त्यानंतर निर्णय घेता येईल. छाटणीच्या टप्प्यामध्ये अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. प्रत्येक बागेतील माती, पाणी आणि गतवर्षीच्या देठाच्या अहवालाप्रमाणे त्यात बदल होऊ शकतात. 

वाढीची अवस्था अपेक्षित 
कालावधी (छाटणीनंतर 
दिवस)
उपाययोजनेचा महिना
 
अन्नद्रव्यांचे प्रमाण (किलो प्रति एकर)
  नत्र स्फुरद पालाश
फुटीची वाढ १ ते ४० ऑक्टोबर-नोव्हेंबर ३२ -- --
फुलोरा ते मणी सेटिंग  ४१-५५ नोव्हेंबर ते डिसेंबर -- ११ --
मणी विकास ५६-७० डिसेंबर- जानेवारी -- ११ --
पाणी उतरणे ते मणी विकास ७१-१०५ डिसेंबर ते जानेवारी ३२ -- ३२
मण्यात गोडी येणे ते फळकाढणी १०६- काढणी जानेवारी ते मार्च -- -- ३२
विश्रांतीचा कालावधी २० दिवस मार्च ते एप्रिल १०.५ १८ १०.५
टीप ः  
१) खताचा वापर मातीच्या तपासणी अहवालानुसारच करावा. जर जमिनीमध्ये एखादे अन्नद्रव्य कमी असेल, तर त्याचा वापर शिफारशीपेक्षा १.२५ पटीने करावा. जर जास्त असल्यास शिफारशीच्या ७५ टक्के आणि खूप जास्त असल्यास शिफारशीच्या ५० टक्के अन्नद्रव्याचा वापर करावा. 
२) सर्व शिफारशी विद्राव्य खताच्या असून ठिबकद्वारे विभागून द्याव्यात.
३) वरील शिफारशी या केवळ मार्गदर्शनासाठी असून, आपल्या शेतातील मातीचा प्रकार, खोली, संरचना, माती व पाण्याच्या समस्येप्रमाणे त्यात बदल होऊ शकतात. 

खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...

 चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअमची कमतरता ही सामान्यपणे दिसत नाही. जर बागेतील जमिनीचा सामू अधिक व सोडिअम जास्त असल्यास कॅल्शिअमयुक्त खताची आवश्यकता नसते. जर काही कारणामुळे जमिनीमध्ये अनन्नद्रव्यांचे असंतुलन झाले असल्यास मण्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येईल. तेव्हा पानांवर दोन ते तीन फवारण्या किंवा मणी सेटिंगपासून ६ ते ८ मि.मी. आकाराचे असेपर्यंत ०.३ ते ०.५ टक्के (कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम नायट्रेट) द्रावणात घड बुडवावेत. असे केल्यास समस्या दूर होऊ शकते. 
 छाटणीनंतर वेलीची वाढ होत असलेल्या अवस्थेत ४५ व्या दिवशी देठ तपासणी करून घ्यावी. यामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास हेक्टरी १०० किलो मॅग्नेशिअम सल्फेट चार वेळा विभागून द्यावे.   
 सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा देठ तपासणीनंतर पानांवरील फवारणीच्या माध्यमातून करावा. सरासरी सल्फेट फॉर्ममधील झिंक, मॅग्नेशिअम आणि फेरस हे घटक ०.२ ते ०.४ टक्के या प्रमाणात छाटणीच्या हंगामात तीन ते चार फवारण्या पुरेशा होतात. 
 बोरॉनचा वापर मात्र देठाच्या तपासणी अहवालानंतरच करावा. 
 नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अमोनिअम सल्फेट किंवा युरियाचा वापर विभागून ठिबकद्वारे करावा. यामुळे उपलब्ध अन्नद्रव्ये मुळांपर्यंत जाऊन वेलीस नत्राची उपलब्धता सहजरित्या होते. यामुळे नत्राचा होणारा ऱ्हास (हवेत किंवा निचऱ्याद्वारे होणारा) रोखता येतो.
 चुनखडीचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये वेलीस मॅग्नेशिअम आणि पालाश उचलून घेण्यात अडचणी येतात. विशेषतः ज्या बागेमध्ये वेलींवर घडांची संख्या अधिक ठेवली आहे, अशा बागेत घडाचा सुकवा (बंच स्टेम नेक्रॉसिस) ची समस्या उद्भवते. अशा बागेत विद्राव्य स्वरुपातील पालाश (उदा. सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशिअम नायट्रेट इ. खते) मातीतून जमिनीत विभागून द्यावीत. सोबतच खरड छाटणी ते फळछाटणी या कालावधीत ३ ते ४ फवारणीद्वारे त्यांची पूर्तता करता येईल. 
 चुन्याचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये लोहाची कमतरताही दिसून येते. लोहाची पूर्तता केल्यानंतर अल्प कालावधीतच त्याचे रूपांतर अविद्राव्य स्वरूपात होते. त्यामुळे वेलीला लोह उपलब्ध न झाल्याने आयर्न क्लोरोसिसची समस्या उद्भवते. अशावेळी मातीतून अनेकवेळा विभागून खत देण्यासोबतच फेरस सल्फेट २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या पानांवर कराव्यात.  चिलेटेट फेरस इडीडीएचए ( Fe-EDDHA) मुळे लोहाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होते. चिलेट( आवरण) मुळे लोहाची कार्बोनेट घटकांबरोबर प्रक्रिया होत नाही.    
 अशीच स्थिती झिंकबाबतही असते. झिंकमुळे झिंक हायड्रोक्साईड आणि झिंक कार्बोनेट असा साका तयार होऊन वेलीला उपलब्धता होत नाही. म्हणून झिंक सल्फेट या स्वस्त खताचा वापर अनेकवेळा विभागून करावा. (छाटणीच्या हंगामात एकरी १५ ते २० किलो पुरेसे होईल.) सोबत, झिंक सल्फेट १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. चिलेटेड झिंक हे झिंक सल्फेटच्या तुलनेमध्ये पिकांना अधिक काळ उपलब्ध होते. 
 द्राक्ष काढणीनंतर वेलीस अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी खते देणे आवश्यक असते. यामुळे पाने हिरवीगार राहून वेलीवर टिकून राहतात. प्रकाश संश्लेषणातून वेलीमध्ये कर्बोदकांची व अन्य अन्नद्रव्यांची साठवण होण्यास मदत होते. ही अन्नद्रव्ये पुढील हंगामासाठी उपयुक्त ठरतात. या काळात एकूण वर्षाच्या खताच्या १० टक्के खते द्यावीत.

 : डॉ. अजयकुमार उपाध्याय, २०-२६९५६०४०, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे, महाराष्ट्र)


इतर फळबाग
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नारळावरील चक्राकार पांढरी माशीरुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे...
द्राक्ष फळछाटणीनंतरचे अन्नद्रव्य...द्राक्ष वेलीची उत्पादकता ही प्रामुख्याने...
सीताफळावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण...पिठ्या ढेकूण (मिलीबग)ही कीड झाडाच्या सालीच्या...
केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे...यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुका केळी...
द्राक्ष फळछाटणीनंतरची कार्यवाहीसध्याच्या परिस्थितीत पावसाळी वातावरण संपत आल्याचे...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
फळछाटणीपूर्वी करावयाच्या उपाययोजनासध्या द्राक्षबागेत पावसाची उघडीप अनुभवास येत आहे...
फळबाग सल्ला (कोकण विभाग) आंबा  वाढीची अवस्था  पावसाची...
फळातील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापनलिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे...
केळी बाग व्यवस्थापनसध्या केळी बागेतील मृगबाग मुख्य वाढीच्या तर...
लिंबूवर्गीय फळपिकावरील कोळीचे व्यवस्थापनकोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी...
केळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​सद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा...
काडीची परिपक्वता, पानगळ या समस्यांकडे...गेल्या चार दिवसापासून लागवडीखाली विभागामध्ये...
रब्बी ज्वारी पेरणीची पूर्वतयारीपेरणीपूर्वी बियाण्यास गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३...
किटकांमुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजनाफळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ....
बुरशी, अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या...वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये...