सुधारित भेंडी लागवड फायद्याची

भेंडीचे आखूड, लांब, सडपातळ, जाड व वेगवेगळ्या रंगाचे शेकडो प्रकार आहेत. त्यातील लाल भेंडी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भेंडी लागवडीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.
सुधारित भेंडी लागवड फायद्याची
सुधारित भेंडी लागवड फायद्याची

भें डीचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे. भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध असून, सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये अग्रेसर आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल हे उत्पादनामध्ये अग्रेसर राज्ये आहेत. भेंडी मध्ये आरोग्यासाठी दृष्टीने अत्यंत आवश्यक विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते.शिवाय काही देशात भेंडीच्या झाडाचे मूळ आणि फांद्या साखर तसेच गूळ बनवण्यासाठी स्पष्टीकरण म्हणून वापर केला जातो. भेंडीच्या भाजलेल्या बिया कॉफीसाठी पर्याय म्हणून वापरल्या जातात. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते. भेंडीचा वापर कागद निर्मिती उद्योगामध्येही केला जातो. हवामान  

  •   भेंडी पिकाला उष्ण, दमट हवामान चांगले मानवते. २२-३५ अंश सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते. 
  •   भेंडीला जास्त थंडी सहन होत नसून २० अंशापेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते.
  •   जास्त तापमान आणि कमी आर्द्रता काळात पिकाची वाढ थांबते. 
  •   ४२ अंशापेक्षा अधिक तापमानात फूल गळ वाढून उत्पादन कमी होते. 
  •   थंडी कमी असल्यास वर्ष भर कधीही भेंडी ची लागवड करता येते.
  •   दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जमीन    भेंडीचे पीक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. हंगाम 

  •   भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. 
  •   उन्हाळी हंगाम -जानेवारीच्या दुसरा ते तिसरा आठवडा ते मार्च.
  •   खरीप हंगाम-जून ते ऑगस्ट .
  •   कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. सतत पुरवठा करण्यासाठी भेंडी १५-२० दिवसाचे अंतर ठेवून टप्प्यात लागवड करावी.
  • लागवड 

  •   मशागतीमध्ये एकदा चांगली नांगरणी करावी. त्यानंतर २-३ कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. -हेक्टरी २५ टन सेंद्रिय खत टाकून घ्यावं. 
  •  सरी आणि वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी. चांगल्या वाढीसाठी व अधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा.
  •   खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर ७५-६० सेंमी ठेवावे. आणि उन्‍हाळ्यात ४५ सेंमी ठेवावे. दोन झाडांतील अंतर ३०-४५ सेंमी राहील, अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघून अंतर कमी जास्त करावे. 
  •   प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास भेंडी पिकाची वाढ व उत्पादनामध्ये वाढ होते. जमिनीमध्ये ओलावा टिकवून राहतो. 
  •   आच्छादनामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या, उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.
  • सुधारित जाती    परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली.

    बियाणे प्रमाण     उन्‍हाळ्यात हेक्टरी १० किलो, खरीप हंगामात ८ किलो आणि बियाणे पुरेसे होते. लागवडीचे अंतर, बियाणे उगवणक्षमता आणि हंगामानुसार बियाणे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. खत व्यवस्थापन  

  •   २५-३० टन चांगले कुजलेले शेणखत. 
  •   नत्र, स्फुरद,पालाश १००: ५०: ५० किलो प्रति हेक्टरी द्यावा. 
  •   नत्र वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावा. 
  •   फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
  • पाणी व्यवस्थापन    भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असते. ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत २.४ लिटर पाणी प्रति ४ झाड या प्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. त्यानंतर ७.६ लिटर पाणी प्रति ४ झाड याप्रमाणे गरज असते. एक दिवस आड ठिबकद्वारे पाणी द्यावे. आंतरमशागत    गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. सरी वरंबा पद्धत मध्ये पिकाला मातीची भर देऊन घ्यावी. रोग व किडी :

  • रोग : भुरी,केवडा, पानांवरील ठिपके, यलो व्हेन मोझॅक, मर रोग इ.
  • कीडी : फळे पोखरणारी अळी, खोडकीड, मावा, तुडतुडे, लाल कोळी इ. 
  • एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन 

  •   जमिनीची खोल नांगरणी करावी.
  •   पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापनाकरिता निळे तसेच पिवळ्या रंगाचे १० सापळे प्रती हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये लावावे.
  •   रोग-कीडग्रस्त झाडे शेतातून उपटून नष्ट करावीत.
  •   किडींच्या व्यवस्थापन करिता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  •   प्रत्येक १० ओळीनंतर एक ओळ झेंडू फुलांची लावावी.   किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर शिफारशीत मात्रेतच करावा. 
  • काढणी 

  •   लागवडीपासून फूल लागायला ३५-४० दिवसांनी सुरुवात होते. त्यानंतर ५५-६५ दिवसांनी तोडणी सुरू होते. साधारण २-३ इंच लांब भेंडीची तोडणी करावी. एकदिवसाआड काळजीपूर्वक तोडणी करावी. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी.
  •   फळांची आकारानुसार वर्गवारी करून, त्यामधील रोगट व कुरूप फळे काढून टाकावी.
  •    भेंडीचे हेक्टरी उत्पादन १२-१५ टन मिळते.
  • लाल भेंडी 

  •   भेंडीचे आखूड, लांब, सडपातळ, जाड व वेगवेगळ्या रंगाचे शेकडो प्रकार आहेत. त्यातील लाल भेंडी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परदेशामध्ये लाल भेंडीची लागवड पूर्वीपासून असली तरी आपल्याकडे अद्याप फारसा प्रसार झालेला नाही. अलीकडे पंचतारांकित हॉटेल, मॉल, शहरी भागात याची मागणी वाढत आहे.
  •   हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाल भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट, लोह, कॅल्शिअमचे प्रमाण अधिक. स्वादिष्ट चव.
  •   अधिक वजन असल्याने उत्पादन जास्त. 
  •   भाजी चिकट होत नाही, खाण्यासाठी रुचकर. 
  •   हिरव्या भेंडी च्या तुलनेत अधिक दर मिळतो.
  •   सुधारित वाण : भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी येथून २०१९ ला काशी लालिमा ही जात प्रसारित झाली आहे. लाल रंगाचे फळ. हेक्टरी १४-१५ टन उत्पादन. विषाणूजन्य रोगांना सहनशील.
  • गणेश सहाणे,  ९६८९०४७१०० (लेखक गणेश सहाणे हे खासगी कंपनीमध्ये रोप पैदासकार असून, रूपाली देशमुख या कृषी महाविद्यालय आळणी, उस्मानाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com