खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण 

खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण 
खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण 

खरीप हंगामात कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.  सद्यःस्थितीत कांदा लागवड सुरू झालेली आहे. काही शेतकऱ्यांची कांदा रोपे रोपवाटिकेत असून लागवडीसाठी तयार होत आलेली आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जिल्हे वगळता चांगला पाऊस झालेला आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच खरीप कांदा लागवड झालेल्या क्षेत्रावर करपा रोगाचा तर रोपवाटिकेत मर प्रादुर्भाव दिसून येत आहे.  कांद्यावरील मर ः  १. रोपवाटिकेतील मर ः  कांदा पिकाच्या रोपवाटिकेतील रोपांवर मर रोग हा फ्युजारियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.  खरीप हंगामातील हवामान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.  रोपवाटिकेत या रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून ती कोलमडलेली दिसतात.  जमिनीतील बुरशीमुळे लागवडीनंतरही प्रादुर्भाव होऊन मर किंवा सड होते.  उपाय ः  १. रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलावी.  २. कांद्याच्या रोपवाटिकेसाठी जमीन उत्तम निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची असावी.  ३. रोपे तयार करतांना गादी वापऱ्यावरच करावीत.  ४. बियाणे निरोगी, स्वच्छ व खात्रीचे असावे.  ५. रोपवाटिकेत पेरणी करण्यापूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोड्रर्मा ५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.  ६. बियाणे पेरणीपूर्वी ३ x १ मी. आकाराच्या गादी वाफ्यावर काॅपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम प्रति वाफा या प्रमाणात मिसळावे. तसेच पेरणीनंतर १५ दिवसांनी पुन्हा ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळीच्या मधोमध ड्रेंचिग करावे. त्यानंतर वाफ्याला त्वरीत पोहोच पाणी द्यावे.  ७. लागवडीकरिता जमीन उत्तम निचरा होणारी व मध्यम प्रतीची असावी.   

२. करपा ः कांदा पिकावर जांभळा करपा, काळा करपा व तपकिरी करपा अशा तीन प्रकारच्या करपा रोगांचा प्रादुर्भाव होतो.  जांभळा करपा ः  खरीप हंगामात अल्टरनेरिया पोरी या बुरशीमुळे कांदा पिकावर जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण जास्त वाढते. या रोगामुळे कांद्याच्या पातीवर सुरवातीस लहान, खोलगट, पांढुरके चट्टे पडतात. या चट्ट्याचा मध्यभाग जांभळट लालसर होतो आणि कडा पिवळसर दिसतात. चट्टे पडण्याची सुरवात प्रथम शेंड्याकडून होऊन ते पातीच्या खालच्या भागाकडे पसरतात. चट्ट्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून जळू लागतात व सर्व पात जळाल्यासारखी दिसते. सुरवातीच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पात जळून जाते. पिकांची वाढ चांगली होत नाही. तसेच कांदा चांगला न पोसल्यामुळे चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते. जर या रोगाचा प्रार्दुभाव कांदा पोसण्याच्या वेळेस झाला तर रोग हा कांद्यापर्यत पसरतो आणि कांदा सडतो.  काळा करपा ः  या रोगाचा प्रादुर्भाव खरीप हंगामात कोलीटोट्रीकम नावाच्या बुरशीमुळे होतो.  या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरवातीला पानावर आणि मानेवर गोलाकार काळे डाग पडतात.  तसेच पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचे प्रमाण वाढून पाने करपतात.  पाण्याचा निचरा न झालेल्या ठिकाणी या रोगामुळे कांद्याच्या माना लांबलेल्या दिसतात.  तपकिरी करपा ः  या रोगाचा प्रादुर्भाव रब्बी हंगामामध्ये स्टेम्फीलियम नावाच्या बुरशीमुळे होतो.  पानावर सुरवातीला पिवळसर ते तपकिरी चट्टे पडतात.  या रोगामध्ये चट्टे वाढण्याचे प्रमाण बुंध्याकडून शेंड्यापर्यंत वाढत जाऊन तपकिरी पडून सुकतात.  यात शेंडे जळाल्यासारखे दिसतात आणि पातीही सुकल्यासारखी दिसतात.  करपा रोगावरील उपाययोजना ः  १. उन्हाळ्यात नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी आणि पिकांची फेरपालट करावी.  २. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेंडाझीम २ ग्रॅम अधिक कॅप्टन २ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रकिया करावी.  ३. कांद्याच्या रोपवाटिकेत रोपांची उगवण झाल्यानंतर १५ दिवसातून मॅकोझेब २५ ग्रॅम अधिक डायमेथोएट १५ मिलि अधिक स्टीकर १० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.  ४. कांद्याच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी ही रोपे मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझीम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.  ५. कांद्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसताच १० ते१५ दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात मिसळून करावी.  ६. या काळातच फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३०% ईसी) १५ मिलि किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन (५% ईसी) ६ मिली अधिक स्टीकर १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी.  संपर्क ः  डॉ. राकेश सोनवणे, ९४०३७३४९७१  (कांदा द्राक्ष संशोधन केद्र, पिंपळगाव बसवंत, नाशिक) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com