कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

कांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या, पावडर बनविता येतात. कांद्यापासून प्युरी, ज्युस, तेल, कांद्याचे लोणचे इ. प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात. या पदार्थाना बाजारात चांगली मागणी आहे. शेतकरी, गट किंवा गाव पातळीवर छोटेमोठे प्रक्रिया उद्योग उभारल्यास सर्वांचा फायदा होऊ शकतो.
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

कांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या, पावडर बनविता येतात. कांद्यापासून प्युरी, ज्युस, तेल, कांद्याचे लोणचे इ. प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात. या पदार्थाना बाजारात चांगली मागणी आहे. शेतकरी, गट किंवा गाव पातळीवर छोटेमोठे प्रक्रिया उद्योग उभारल्यास सर्वांचा फायदा होऊ शकतो. कांदा हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे भाजीपाला पीक असून, देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होते. त्यातही नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होते. त्यापाठोपाठ जळगाव, धुळे, नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. विविध हंगामामध्ये उत्पादीत होणारा कांदा वर्षभर बाजारपेठेत येत असतो. त्यातही दरामध्ये प्रचंड चढउतार होत राहतात. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. कांदा नैसर्गिक पद्धतीने आठ ते दहा महिने टिकत असला तरी कांदा साठवणुकीची सोय बहुतांश शेतकऱ्यांकडे नसते. साठवणूकीमध्ये कांदा सडण्याचे प्रमाणही मोठे आहे. कांदा वाळवणीच्या माध्यमातून साठवण शक्य असून, बाजारमूल्यही तुलनेने स्थिर राहू शकते. शेतकरी, गट किंवा गाव पातळीवर छोटेमोठे प्रक्रिया उद्योग उभारल्यास सर्वांचा फायदा होऊ शकतो. या प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे पुढील प्रमाणे ः साल काढण्याचे यंत्र  कांदा, बटाटा, आले या पदार्थाची साल काढण्यासाठी हे यंत्र उपयोगी आहे. यंत्रामध्ये वरच्या बाजूने हॉपरमध्ये कांदा टाकला जातो. हॉपर मधून कांदा रोटरी ड्रायच्या साह्याने फिरला जातो. ड्राय वरती घर्षण होऊन वरील साल निघते. त्यानंतर कांदा स्क्रिनिंगच्या साह्याने कंटेनरमध्ये पाठविला जातो. निघालेली साल आउटलेट मधून वेगळ्या बादलमीमध्ये जमा होते. या रोटरी ड्रायची फिरण्याची क्षमता ८०० फेरे प्रती मिनीट असते. पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले हे यंत्र अर्धस्वयंचलित आहे. यंत्रांची क्षमता प्रती तास ७० किलो कांदे सोलण्याची असते. यंत्रासाठी २८० व्होल्ट  ऊर्जा लागते. त्यासाठी १ एचपी विद्यूत मोटार बसवलेली असते. यंत्राचे वजन हे ४० किलो असून, किंमत क्षमतेनुसार २० हजारापासून पुढे आहेत. कांद्याच्या चकत्या करण्याचे यंत्र  कांद्याच्या ताज्या चकत्यांचा वापर विविध भाज्यांसह पदार्थामध्ये केला जातो. त्याच प्रमाणे त्या वाळवून चकत्या किंवा भुकटी करूनही स्वादासाठी वापरल्या जातात.या यंत्रांमध्ये वेगवेगळे डाईस असून, चकत्यांची जाडी कमीजास्त करता येते. चकत्यांची जाडी ०.३ सेमी पासून पुढे ठेवता येते. जितक्या पातळ चकत्या असतील, तितक्या त्या लवकर वाळतात. यंत्रामध्ये कांदा टाकल्यानंतर कटरच्या साह्याने ३ ते ६ मि.मी. आकाराच्या चकत्या तयार होतात. त्या पुढे डाईजच्या साह्याने पाठवल्या जातात. हे यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असून, अंतर्गत भाग फूड ग्रेड स्टिलचा बनलेला असतो. या अर्धस्वयंचलित यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागते. त्याला ०.५ एचपी ची विद्युत मोटार जोडलेली असते. यंत्र थ्री फेजवर चालते. यंत्राची क्षमता प्रती तास १०० किलो असून, यंत्रांची किंमत १३ हजार रुपयापासून सुरु होते. यंत्र चालवण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी असते. यंत्रामध्ये कांदा  टाकण्याआधी अगोदर कांद्यची मुळे कापून घ्यावी लागतात. पेस्ट बनवणारे यंत्र (प्युरी मेकिंग मशीन)  सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये घरगुती भाज्यांसाठीही कांदा पेस्टची मागणी वाढत आहे. या यंत्रांमध्ये कांदे टाकल्यानंतर स्लायसर कटरने बारीक केले जातात. पुढे रोटरी ब्लेडच्या साह्याने कांद्याची बारीक पेस्ट तयार केली जाते. चाळणीतून चाळली जाऊन खालील भांड्यामध्ये जमा होते. ब्लेडचा आकार बदलून आपल्याला पाहिजे तशी मऊ, जाडसर पेस्ट मिळवता येते. हे यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असून, यंत्राचा काही भाग उदा. कटर, रोटरी ब्लेड इ. फूड ग्रेड स्टीलचे बनवले जातात. या स्वयंचलित यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागते. क्षमता प्रती तास सुमारे १०० ते १२० किलो आहे. यंत्रांची उंची ३ फूट असून, एकूण २ बाय ३ फूट जागा पुरेशी असते. यंत्रांचे वजन ४० ते ५० किलो असून, किंमत २१ हजार रुपयांपासून पुढे आहेत. वाळवणी यंत्र (ड्रायर)  कांद्याच्या चकत्या, तुकडे वाळवण्यासाठी या यंत्राचा वापर करतात. कांद्याच्या ३ ते ८ मिमी जाडीच्या बारीक चकत्या तयार करतात. त्या मिठाच्या द्रावणात २ तास भिजत ठेवतात. त्यानंतर वाळवणी यंत्रामध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला ठेवतात. सुमारे १०-१२ तासामध्ये चकत्या वाळतात. तयार झालेल्या कांद्याच्या चकत्या किंवा पावडर हवाबंद डब्यात किंवा प्लॉस्टिक पिशव्यांमध्ये पॅक कराव्यात. कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग हवाबंद पदार्थामध्ये, सॉस, सूप, पेस्ट यासारख्या पदार्थामध्ये केला जातो. कांदा चकत्या व पावडरला निर्यातीसाठीही चांगली मागणी आहे. कांदा पावडर बनवणारे यंत्र (ग्राइंडर)  वाळलेल्या कांद्याच्या चकत्यांपासून ग्राईंडरद्वारे भुकटी बनवली जाते.  ग्राइंडर मशीन हे मिश्र धातूचे बनलेले असून ग्राइंडरची क्षमता १० ते २५० किलो प्रति तास आहे. या यंत्रासोबत १० किलोची पावडर साठवण टाकी खालील बाजूला जोडलेली असते. हे यंत्र बहुउपयोगी असून यामद्धे आपण सर्व प्रकारचे मसाले, बाजरी, गहू इत्यादी बारीक करू शकतो. हे यंत्र अर्धस्वयंचलित असून यंत्राला २४० व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्र सिंगल फेजवर चालते. या यंत्राला ०.५ एचपी ची विद्यूत मोटार जोडली आहे. यंत्रांची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपासून सुरु होते. उद्योग उभारणीसाठी

  • कांदा उत्पादक परिसरामध्ये व्यक्तिगत किंवा गटाद्वारे सुमारे ३ ते ४ लाखांमध्ये कांदा प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य आहे.
  • प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी १५ बाय  २० फूट जागेची आवश्यकता असते.
  • जागेची निवड करताना वीज, पाणी आणि चांगला रस्ता यांची उपलब्धता असावी.
  • प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी एफएसएसएआय (FSSAI) व उद्योग आधार ही परवानगी प्रमाणपत्र (लायसन्स) असणे बंधनकारक असते.
  • प्रक्रिया उद्योगाप्रमाणे पॅकिंगसाठी एक दोन यंत्रे आवश्यक असतात. पॅकींगचे मटेरियल योग्य त्या दर्जाचे वापरावे.
  • कांदा प्रक्रिया करण्याच्या आधी व नंतर यंत्रे पाण्याने स्वच्छ करून घ्यावीत.
  • कांदा प्रक्रिया उत्पादनासाठी बाजारपेठ ः

  • प्रक्रिया केलेले कांद्याचे पदार्थ मसाले तयार करणाऱ्या कंपन्या, मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळ व धाबे यांच्याकडे मागणी असते.
  • अलिकडे वेफर्स तयार करणाऱ्या कंपंन्यांमध्येही स्वादासाठी कांदा पावडर मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
  • कांदा पेस्ट ही १० मिली आकाराच्या छोट्या पॅकेटमध्ये पॅकींग केल्यास घरगुती वापरासाठीही जाऊ शकते. त्याच प्रमाणे मागणीनुसार विविध खाद्य व्यावसायिक, केटरर यांना पुरवता येते.
  • कांद्याच्या गोड व तिखट लोणच्यांना बाजारात मागणी असते. ही लोणची मॉल व बाजारामध्ये विक्रीस देऊ शकतो.
  • सचिन शेळके, ८८८८९९२५२२ सचिन मस्के, ९०४९९६७२५७ (पीएच.डी. विद्यार्थी, अन्नविज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सॅम हिंगिनबॉटम कृषी, प्राद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com