agriculture stories in Marathi, onion seed production technique | Agrowon

तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे असावेत. रंग आकर्षक, एकसारखा असावा. बीजोत्पादनासाठी कांदा लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावी. बीजोत्पादनामध्ये ठिबक सिंचनाचा वापर फयदेशीर ठरतो.

बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे असावेत. रंग आकर्षक, एकसारखा असावा. बीजोत्पादनासाठी कांदा लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावी. बीजोत्पादनामध्ये ठिबक सिंचनाचा वापर फयदेशीर ठरतो.

कांदा बीजोत्पादन शास्त्रीय पद्धतीने केले नाही, तर चांगल्या प्रतीचे बियाणे तयार होत नाहीत. हे लक्षात घेऊन कांदा बीजोत्पादन करताना लागवड ते पीक व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीनेच करावे. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा डार्क रेड, भीमा रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाइट रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता आणि भीमा सफेद या कांद्याच्या जाती विकसित केल्या आहेत. बीजोत्पादनासाठी उत्तम प्रतीच्या कांद्यांची निवड करणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा शेतकरी चांगल्या कांद्यांची बाजारात विक्री करतात आणि खराब कांदे बीजोत्पादनासाठी वापरतात. त्यामुळे नवीन पिढीमध्ये अनेक वैगुण्ये वाढीला लागतात.
बीजोत्पादनाच्या दृष्टीने कांदा हे पीक तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. परागीकरणाच्या वेळी तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास मधमाश्यांचा वावर कमी होतो. परिणामी, बीजोत्पादन कमी होते. तापमानाव्यतिरिक्त बीजोत्पादनासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशदेखील आवश्यक असतो. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान, यामुळे फलधारणा चांगली होते. ढगाळ हवामान किंवा पावसामुळे रोगांचे प्रमाण वाढते.

जमीन ः

 • पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीत चांगले उत्पादन येत नाही.
 • हलक्या किंवा मुरमाड जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये. अशा जमिनीत फुलांचे दांडे कमी निघतात. बी कमी प्रमाणात तयार होते.

मातृकांद्यांची निवड आणि लागवड ः

 • लागवडीसाठी मातृकांद्याची निवड काळजीपूर्वक करावी. कारण, तयार होणाऱ्या बीजाची शुद्धता आणि गुणवत्ता प्रत्येक पिढीतील कांदानिवडीवर अवलंबून असते.
 • लागवडीसाठी चपटे किंवा जाड मानेचे कांदे वापरू नयेत. कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे तसेच रंग आकर्षक आणि एकसारखा असावा.
 • लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावी.
 • लागवडीसाठी मध्यम आकाराचे कांदे निवडल्यास हेक्टरी २५ ते ३० क्विंटल कांदे बियाण्यांची आवश्‍यकता असते. कांद्याचे वजन ७० ते ८० ग्रॅम, तर व्यास ४.५ ते ६ सें. मी. इतका असावा.
 • प्रत्येक कांद्याचा वरचा एकतृतीयांश भाग कापून काढावा. शक्यतो एका डोळ्याचे कांदे निवडावेत.
 • कांदे निवडण्यापूर्वी ते चांगले सुकलेले असावेत. सालपट निघालेले, काजळी आलेले, कोंब आलेले किंवा सडलेले कांदे बीजोत्पादनासाठी वापरू नयेत.
 • १०० लिटर पाण्यामध्ये २०० मि. लि. कार्बोसल्फान आणि २०० ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून बनविलेल्या द्रावणात कापलेले कांदे अर्धा तास बुडवून नंतर लावावेत.
 • लागवडीसाठी ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या एका बाजूवर ३० सें.मी. अंतरावर प्रक्रिया केलेले कांदे लावावेत. कांदे मातीमध्ये पूर्ण झाकले जातील, याची काळजी घ्यावी.
 • ठिबक सिंचनावरील लागवडीसाठी ५० सें. मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन सरींच्या तळाशी २० सें. मी. अंतरावर कांदे ठेवावेत. एक सर मोकळी सोडावी. कांदे ठेवलेल्या सरीचा माथा सपाट करावा. त्यामुळे सरींच्या तळाशी ठेवलेले कांदे मातीने चांगले झाकून जातात; शिवाय ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरविण्यासाठी सपाट जागा तयार होते. एका जोड ओळीसाठी एक ठिबक सिंचनाची नळी वापरता येते.

खत व्यवस्थापन ः

 • लागवडीच्या २० दिवसाआधी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरवून नांगरट करावी.
 • हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश आणि ५० किलो गंधक या रासायनिक खतांची शिफारस करण्यात आली आहे. कांदा लागवडीच्या आधी स्फुरद, पालाश आणि गंधक यांच्या पूर्ण आणि नत्राच्या निम्म्या मात्रा द्याव्यात. खत जमिनीत चांगले मिसळावे.
 • उरलेले ५० किलो नत्र दोन भागांत विभागून द्यावे. कंद लागवडीनंतर ३० दिवसांनी पहिला, तर ५० दिवसांनी दुसरा भाग द्यावा.
 • कांदा पिकास लोह, तांबे, जस्त, मँगेनीज, बोरॉन आदी सूक्ष्म द्रव्यांचीदेखील आवश्‍यकता असते. सूक्ष्म द्रव्यांची कमतरता आढळल्यास सल्फेटच्या रूपात १ ग्रॅम पावडर प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीवेळी त्यामध्ये चिकटद्रव्ये ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळावे.
 • सूक्ष्म द्रव्यांची फवारणी लागवडीनंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान करावी. दांड्यावर फुले उमलल्यानंतर फवारणी करू नये.

पाणी नियोजन ः

 • लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. पहिल्या पाण्यानंतर लगेच कोंब फुटून निघतात. उघडे पडलेले कांदे मातीने झाकून घ्यावेत आणि दुसरे पाणी द्यावे.
 • मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास ८ ते १० दिवसांच्या अंतराने हलके पाणी द्यावे.
 • कांदापिकाची मुळे १५ ते २० सें. मी. खोल जातात. त्यामुळे तेवढाच भाग ओला राहील, इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले तर कंद सडतात.
 • हलक्या जमिनीत पाणी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे. पाणी कमी पडल्यास बी वजनाने हलके राहते आणि त्याची उगवण क्षमता कमी होते.
 • ठिबक सिंचनावर बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. एक मीटर अंतरावर ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवून, नळीच्या दोन्ही बाजूंनी कांदा लागवड करून पाणी देता येते. ठिबक सिंचनामुळे पाणी देणे सुलभ होते, तसेच पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत होऊन तणांचे प्रमाण कमी राहते.

संपर्क ःडॉ. शैलेंद्र गाडगे ः ९९२२४९०४८३
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)
....


इतर कृषी सल्ला
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
..हे आहेत सुपीकता, उत्पादकतेवर परिणाम...पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
कृषी सल्लावाल  फुलोरा अवस्था वाल पिकावरील शेंगा...
तुरीवरील शेंगमाशीचे नियंत्रणतूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे....
भविष्यासाठी नद्या जपण्याची गरजप्रत्यक्ष जीवनामध्ये हवामानाचे विविध बदल जाणवून...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील सह्याद्री पर्वतरांगांवर हवेचा दाब १०१४...
एल निनो म्हणजे नेमके काय ?हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
असे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रणलांबलेल्या पावसामुळे आंबा पिकातील पालवीचा कालावधी...
असे करा वाढीच्या अवस्थेनुसार गहू...गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य पाणी...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...