सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण 

सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण 
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण 

सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार प्राधान्याने करतानाच पिकाच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. पिकांचे सेंद्रिय पद्धतीने पोषण व्यवस्थापनाविषयी जाणून घेऊ.  सेंद्रिय पद्धतीमध्ये सलग एक पीक घेण्याऐवजी मिश्रशेतीला प्राधान्य द्यावे. यामुळे ही पिके एकमेकांसाठी पूरक ठरू शकतात. साधारणपणे तूर, सोयाबीन, उडीद, मूग ही सरळ वाणाचे बियाणे घरीच तयार करावे. असे बी अनेकजण पेरणी यंत्र व सरता लावून पेरणी करतात. मिश्रपिकाचे ओळीत अंतर कमी असल्याने ही पिके टोकण पद्धतीने घेणे शक्‍य नाही. तूर सरत्याने पेरल्यास गरजेपेक्षा खूपच दाट पेरली जाते. नंतर विरळणी करणे शक्‍य होत नाही. वाढीच्या स्थितीमध्ये होत गेलेल्या दाटीमुळे झाडे आकाराने बारीक राहतात. परिणामी उत्पादन कमी मिळते. या पद्धतीत पुढील बदल उपयुक्त ठरतील. 

  • एकूण पेर क्षेत्राचे दोन भाग करावेत. मुख्य पिकाचे क्षेत्र व मिश्रपिकाचे क्षेत्र गरजेप्रमाणे वेगवेगळे करावे. जवळ अंतरावरील मिश्रपिकाची जमीन फक्त नांगरावी. पूर्वमशागत करावी. बाकी क्षेत्रातील पूर्वमशागत बंद करून शून्य मशागत पद्धतीने घ्यावे. 
  • कापूस अगर तूर ही लांब अंतरावरील पिके आज ९० ते १५० सें.मी.च्या ओळीत घेतली जातात. त्यातील अंतर वाढवून १८० ते २४० सें.मी. करावे. दोन ओळींतील अंतर वाढल्याने ही पिके टोकण पद्धतीने पेरणी करणे आणखी सोपे जाईल. 
  • जुन्या पिकाच्या ओळीच्या खुणा पाहून अगर तितक्‍या अंतरावर काकर मारून पेरणी करावी. मिश्रपिकाचे क्षेत्र पूर्वमशागत करून पेरणी यंत्राने पेरावे. १०० टक्के रानाची पूर्वमशागत करीत बसण्यापेक्षा हे मर्यादित क्षेत्र मशागतीखाली ठेवल्याने पैसा, वेळ व कष्ट वाचतील. पुढे आंतरपीक म्हणून १०० टक्के क्षेत्रात ही पिके घेतल्यास संपूर्ण क्षेत्राची डवरणी, निंदणी करावी लागते. त्यात बचत होते. 
  • लांब अंतरावरील पिकाच्या क्षेत्रात पिकाच्या ओळी जवळील जागा साफ ठेवून पिकाच्या वाढीला वाव करून द्यावा, यासाठी गरजेइतकीच डवरणी, निंदणी, करणी व दोन ओळींमधील शिल्लक जागेत तणे वाढवावीत. 
  • कोरडवाहू क्षेत्रात संपूर्ण जमीन मिश्रपिकाखाली ठेवण्याच्या नादात आपले जमीन व पाणी व्यवस्थापन चुकत आहे. याखेरीज उपलब्ध मनुष्यबळ यंत्रणेवरही ताण वाढत असल्यामुळे वेळच्या वेळी कामे होत नाहीत. यासोबतच उत्पादन पातळी स्थिर राखण्यासाठी आपली दोन उद्दिष्ट्ये असली पाहिजेत. 
  • १) कमी खर्च व कष्टामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढविणे.  २) दोन पावसाच्या सत्रात खंड पडल्यास पीक जगवण्याइतके हिरवे राहील इतपत संरक्षित पाणीसाठा कोणताही बाह्य खर्चाशिवाय जमिनीतच करणे. संरक्षित पाणी साठवण्यासाठी शेततळे योजना, प्लॅस्टिक कागद अंथरणे, पाणी देण्याची यंत्रणा यासाठी सरकारी पातळीवर अनुदान दिले जाते. मात्र, त्यासाठी शेताची योग्य भौगोलिक रचना नसल्यामुळे एकूण कोरडवाहू क्षेत्राच्या तुलनेत फार थोडे शेतकरीच या तंत्राचा लाभ घेऊ शकतात.   पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर ज्यांना शक्‍य आहे त्यांनी संपूर्ण पिकात जमिनीवर रोटाव्हेटर चालवून पिकाचा चुरा करून टाकावा. पीक समूळ उपटून काढू नये. ज्यांना पिकाचा वरील भाग जळण म्हणून वापरावयाचा आहे अगर विकावयाचा आहे, त्यांनी किमान बुडखा व मूळ जमिनीतच कसे राहील याचा विचार करावा. याचे कारण म्हणजे हा बुडखा आणि जमिनीखालील पसरलेले मुळांचे जाळे कोणताच धक्का न लागता जमिनीत तसेच राहिले तर त्यांच्या कुजण्यातून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत जमिनीला मिळते. पुढे विना नांगरणीची शेतीच चालू ठेवली तरच या तंत्राचे फायदे मिळतील.   पिकांची योग्य वाढ व संपूर्ण पोषण होण्यासाठी खालील घटकांचा समावेश असावा. या घटकांमध्ये शक्यतो घरीच तयार केलेल्या व शेतामध्ये उपलब्ध बाबींचा प्राधान्याने विचार करावा. बाजारातून काहीही विकत आणणे शक्यतो टाळावे.  पिकाच्या सरळ/सुधारित/संमिश्र वाणांची पेरणी :  संकरीत वाणांच्या तुलनेमध्ये सरळ, सुधारित किंवा संमिश्र वाणांना पोषणासाठी माफक अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सेंद्रिय शेतीमध्ये अशा संकरीत पिकांची भूक व गरज भागवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्याऐवजी सरळ वाण थोड्या पोषणाने चांगले वाढतात. 

    मिश्रपीक/आंतरपिकांची पेरणी :  वनस्पतींना साहचर्य आवडते. एकच पीक न लावता मध्ये २ ते ३ वेगवेगळी पिके लावावीत. यातून मिश्र पिकांचे उत्पादनासोबत मुख्य पीकही कीड रोगांपासून मुक्त राहते. उदा. टोमॅटोच्या ४ – ५ ओळीनंतर झेंडूची रोपे लावावीत. तसेच काही रोपे कांद्याचीपण लावावीत. संपूर्ण प्लॉटभोवती झेंडू लावावा. कोबी व फ्लॉवरमध्ये पाचवी ओळ मोहरीची लावावी. फ्लॉवर, कोबीवरील काळी अळी मोहरीच्या पानांवर राहिल्यास मुख्य पीक सुरक्षित राहील. द्राक्ष पिकांमध्ये कांदा लसूण लावला तर भुरीचा प्रादुर्भाव कमी राहतो. कापूस पिकामध्ये चवळी व अंबाडी लावण्याची पद्धत चांगलीच रुजत आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com