उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप'

उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप'
उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप'

आपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले जाते. मात्र, शेळीच्या दुधामधील औषधी गुणधर्माचा फारसा वापर होताना दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक हेगाणा या कृषी पदवीधराने उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून साबण तयार केला आहे. त्याचे पेटंटही घेतले असून, शिवार सोप या नावाने विक्री सुरू केली आहे. यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील कुटुंबातील महिलांना रोजगाराचे शाश्वत साधनही उपलब्ध झाले आहे. बाजारामध्ये गुलाब, केसर, चंदन अशा विविध घटकांचा समावेश असलेले विविध प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. मात्र, आता उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा साबणही बाजारपेठेत दाखल झाला असून, त्यातून उस्मानाबाद जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना रोजगाराचे शाश्वत साधन उपलब्ध झाले आहे. या कुटुंबांना आर्थिक, मानसिक पाठबळाबरोबरीने शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत मिळून देण्यासाठी शिवार संसद संस्थेने उस्मानाबादी शेळीपालन आणि शेळी दुधापासून साबण निर्मितीला सुरुवात केली. यास शहरी बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळतोय. या संकल्पनेमागे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील युवा कृषी पदवीधर विनायक हेगाणा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, शेती तसेच पूरक उद्योगांबाबत मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती पोचविणे तसेच विविध संस्थांकडून मदत मिळवून देण्यासाठी विनायक हेगाणा याने चार वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवार संसद ही युवा चळवळ सुरू केली. या माध्यमातून शेतकरी मित्र केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या बरोबरीने शेती पूरक उद्योग, आरोग्य, शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाते. यातूनच उस्मानाबादी शेळीपालन आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली. याबाबत विनायक हेगाणा म्हणाले की, शिवार संसद संस्थेच्या कामासाठी मुद्दाम दुष्काळी पट्ट्यातील उस्मानाबाद जिल्ह्याची निवड केली. आमची संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शाश्वत रोजगार, शेतीला पूरक उद्योगाची जोड आणि मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी उपक्रम राबविते. ग्रामीण भागात काम करताना असे लक्षात आले की, आजही उस्मानाबादी शेळीपालन पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. या शेळीला राज्य, परराज्यात चांगली मागणी आहे. परंतु हा व्यवसाय करडे आणि बोकड विकण्यापुरताच मर्यादीत आहे. शेळीच्या दुधाकडे मात्र दुर्लक्ष होते. आम्ही शेळी दुधाचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन दूध विक्री करण्यापेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन वर्षे शेळी दुधापासून साबण निर्मितीचे प्रयोग केल्यानंतर त्यात यश आले. साबण निर्मितीसाठी विविध विषयांतील तज्ज्ञ, डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. या आरोग्यदायी साबणाला ‘शिवार सोप’ असे नाव दिले आहे. त्याचा सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उस्मानाबादी शेळी दुधापासून साबण निर्मितीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पहिलाच प्रयत्न आहे. ‘उस्मानाबादी गोट मिल्क सोप' असे पेटंटदेखील आम्ही घेतले आहे. आमच्या उपक्रमाला रोटरी क्लब, दक्षिण पुणेचे अध्यक्ष अभिजित जोग, बायर फाउंडेशन, एबीएल फाउंडेशन, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, अभिनेते भारत गणेशपुरे याचबरोबरीने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे, केदार जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. आमचा ‘शिवार सोप' आता सिनेसृष्टी, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंपर्यंत पोचला आहे. ‘शिवार सोप'ची निर्मिती ः उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून साबण निर्मितीबाबत विनायक हेगाणा म्हणाला की, आम्ही पहिल्यापासून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणे हाच उद्देश ठेवला आहे. साबण निर्मितीसाठी उस्मानाबाद तालुक्यामध्ये शिवार महिला बचत गटाची स्थापना केली. यामध्ये १२५ महिला सदस्या आहेत. यातील बहुतांश महिलांकडे उस्मानाबादी शेळ्या आहेत. आम्ही २५० उस्मानाबादी शेळीपालकांसोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडून किफायतशीर दराने दररोज ५० लिटर शेळीचे दूध साबण निर्मितासाठी खरेदी करतो. पूर्णपणे घरगुती स्तरावर साबण निर्मिती केली जाते. यासाठी बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. येत्या काळात या कुटुंबांना जातिवंत उस्मानाबादी शेळ्यांचे वाटप करत आहोत. यामुळे दूध उत्पादन वाढेल, त्याचबरोबरीने करडे आणि बोकडांच्या विक्रीतूनही उत्पन्नाचा स्त्रोत तयार होईल. फायदेशीर ‘शिवार सोप' ः १) उस्मानाबादी शेळीपालनासोबतच दूध उत्पादन आणि प्रक्रियेला चालना. २) साबणामध्ये वनौषधी आणि आरोग्यदायी तेलाचा वापर. कोणत्याही रासायनिक घटकांचे मिश्रण नाही. ३) दिवसाला एक हजार साबण निर्मितीची क्षमता. आकर्षक पॅकिंगमध्ये विक्री. ४) दुधाची साय आणि दालचिनी, कॅलेंड्युला फूल, बांबू कोळसा आणि मृत समुद्रातील गाळ मिश्रण असे तीन प्रकार उपलब्ध. ५) शेळी दुधातील सेलिनियम घटक त्वचा रोगांवर गुणकारी. दुधातील आरोग्यदायी घटकामुळे त्वचा सुरकुतणे कमी होते, मृत त्वचा लवकर निघते. दुधातील जीवनसत्व अ उपलब्धतेमुळे त्वचा चमकदार बनते. ६) मुंबई, पुणे शहरातील विविध संस्था, प्रदर्शनातून विक्रीला सुरवात. परराज्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी. शेळी दूध प्रक्रियेला संधी... शेळीचे दूध आरोग्यदायी आहेत. यातील घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. शेळीपालकांनी केवळ करडे आणि बोकड विक्रीवर न थांबता दूध विक्री तसेच प्रक्रिया उद्योगामध्येही उतरले पाहिजे. - डॉ. नितीन मार्कंडेय, (प्राचार्य, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com