अतितीव्र वातावरणात जगणाऱ्या आठ नव्या सूत्रकृमी प्रजाती शोधल्या

अतितीव्र वातावरणात जगणाऱ्या आठ नव्या सूत्रकृमी प्रजाती शोधल्या
अतितीव्र वातावरणात जगणाऱ्या आठ नव्या सूत्रकृमी प्रजाती शोधल्या

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी (कॅल्टेक) येथील संशोधकांनी मोनो तलावाच्या अत्यंत तीव्र वातावरणामध्ये जगणाऱ्या सूक्ष्मकृमींच्या आठ नव्या प्रजाती शोधल्या आहेत. या नव्या गटाला तात्पुरते ऑनेमा स्पे. असे नाव दिले आहे. या प्रजातींचे वैशिष्ट्य म्हणजे ती माणसांसाठी मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या आर्सेनिकच्या ५०० पट अधिक प्रमाणामध्येही तग धरू शकते. ही जात आपल्या पिल्लाला शरीराच्या आत कांगारूप्रमाणे वाढवते. या जातींमध्ये तीन लैंगिकताही दिसल्या आहेत. कॅलिफोर्नियातील पूर्व सिएरा भागातील मोनो लेक हा तलाव समुद्राच्या पाण्याच्या तीनपट अधिक खारट आहे. त्याचा सामू १० आहे. या अभ्यासापूर्वी जिवाणू आणि शेवाळ वगळता ब्राईन श्रिंप (कोळंबीचा प्रकार) आणि डायव्हिंग फ्लाइज (सूर मारणाऱ्या पाणनिवळीप्रमाणे माश्या) या केवळ दोन प्रजाती या भागात आढळल्या होत्या. या संशोधनामध्ये संशोधकांच्या गटाला सूक्ष्मकृमी गटातील आठ नव्या प्रजाती या तलावाच्या परिसरात जगत असल्याचे आढळले आहे. हे संशोधन जर्नल करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित केले आहे. स्टेर्नबर्ग प्रयोगशाळेमध्ये सूत्रकृमीसंदर्भात सातत्याने अभ्यास केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने सायनोऱ्हायब्डिटीस इलेगन्स (Caenorhabditis elegans) याचा समावेश आहे. ही प्रजात केवळ ३०० न्युरॉनच्या (चेतापेशीं) साह्याने अत्यंत गुंतागुंतीच्या क्रिया करते. त्यात झोपणे, शिकणे, वास घेणे, हालचाल करणे यांचा समावेश आहे. चेतापेशींच्या विविध प्रारूपांचा अभ्यास करण्यासाठी ही प्रजाती अत्यंत साधी आणि सोपी मानली जाते. त्यामुळे प्रयोगशाळेतील प्रारुप जीव म्हणून त्याचा वापर केला जातो. ही जात प्रयोगशाळेमध्ये सामान्य तापमान आणि दाबामध्ये सहजतेने जगू शकते. संशोधनाचे महत्त्व ः पृथ्वीवर सूत्रकृमींचे प्रमाण प्रचंड असून, ते तीव्र वातावरणामध्येही राहू शकतील, असे गृहितक स्टेर्नबर्ग प्रयोगशाळेतील पदवीचे विद्यार्थी पेई-यीन शिह आणि जेम्स सिहो ली यांनी मांडले होते. (या वर्षी २०१९ मध्ये या दोघांनाही पीएच.डी. मिळाली आहे.) त्यानुसार त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये आठ नव्या जाती आढळून आल्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व जाती आर्सेनिंकचे प्रमाण अधिक असलेल्या तलावाच्या परिसरात आढळल्या आहेत. या वातावरणामध्ये अन्य प्रजाती जगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना तीव्र वातावरणात जगणाऱ्या (एक्स्ट्रेमोफिलिस) असेही म्हटले जाते. या नव्या ऑनेमा प्रजातीची तुलना त्याच गणातील प्रजातींशी करण्यात आली. त्यामध्ये या ज्ञात प्रजातीमध्येही आर्सेनिक घटकांविषयी उच्च प्रतिरोधकता आढळली आहे. अर्थात, या प्रजाती उच्च आर्सेनिक पातळीमध्ये जगू शकत नाहीत. अभ्यासामध्ये ऑनेमा प्रजाती या प्रयोगशाळेतील सामान्य वातावरणामध्येही चांगल्या प्रकारे तग धरू शकत असल्याचे दिसून आले. अशा फारच कमी एक्स्ट्रेमोफिलिस प्रजातींचा अभ्यास प्रयोगशाळेमध्ये करण्यात आला आहे. केवळ १००० पेशी असलेले सूक्ष्म जीव तीव्र वातावरणामध्ये कसे जगतात, या अभ्यासातून ताणाच्या स्थितीमध्ये जगण्याविषयीच्या अनेक बाबी आपल्याला उलगडू शकतात, अशी माहिती शिह यांनी दिली. फायदा ः जगभरामध्ये आर्सेनिक प्रदूषित पाण्याची समस्या ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. अशा स्थितीमध्ये आर्सेनिकयुक्त वातावरणामध्ये ऑनेमा प्रजाती कोणत्या जनुकांच्या साह्याने तग धरू शकतात, याचा अभ्यास पुढील टप्प्यात करण्याचे नियोजन संशोधकांनी केले आहे. त्यामुळे आर्सेनिकच्या विषबाधेचा पेशीं आणि शरीरावर नेमका कसा परिणाम होतो हे जाणता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com