दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम द्राक्षांत ओळख 

दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम द्राक्षांत ओळख 
दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम द्राक्षांत ओळख 

सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर भीवघाटापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. दुष्काळी अशी ओळख असलेल्या या गावाने प्रतिकूल परिस्थितीतही पीक व पाणी व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे केली. म्हणूनच गेल्या वीस वर्षांपासून अधिक काळ हे गाव द्राक्षनिर्यातीत आघाडीवर आहे. त्यातून वर्षाकाठी सरासरी १७ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळविण्याची क्षमता गावाने तयार केली आहे. नोकरीच्या मागे न लागता गावातील उच्चशिक्षित तरुणवर्गही द्राक्षाशेतीत रमला आहे.  सांगली जिल्ह्यातील तासगाव हे द्राक्षाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात एकेकाळी द्राक्षशेती रुजण्यामध्ये या तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. टेबल ग्रेप्सबरोबरच बेदाणाही या भागातून तयार होऊ लागला. आजही बेदाणा म्हटले, की तासगावचा हेच समीकरण रूढ आहे. तासगावसह नजीकच्या खानापूर तालुक्यातही द्राक्षशेती होऊ लागली. काळानुसार हे शेतकरी द्राक्षनिर्यातीकडे वळले. त्यांनी निर्यातीतही चांगली बाजी मारली. खानापूर तालुक्यातील पळशी हे त्यापैकी ठळकपणे ओळखले जाणारे गाव आहे.  द्राक्षनिर्यातीत पुढाकार  पळशी हे सुमारे २० वर्षांहून अधिक काळापासून द्राक्षाची निर्यात करणारे गाव म्हणून ओळखले जाते.  गावाला पाणीपुरवठ्याची योजना नाही. गावच्या दुसऱ्या भागात टेंभू योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे शाश्‍वत पाणी मिळाल्याने भागातील शेती सुधारली आहे. परंतु अद्यापही हे गाव कोणत्या उपसा सिंचन योजनेत समाविष्ट झालेले नाही. पाण्याबाबत अशी प्रतिकूल स्थिती असतानाही वेळप्रसंगी टॅंकरने पाणी आणून येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा टिकवल्या. त्या निर्यातक्षमही बनविल्या. यात बागायतदारांचे कष्ट वाखाणण्याजोगे आहेत.  गावची द्राक्षशेतीतील पार्श्‍वभूमी  मुळात कमी पाणी यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांशिवाय पर्याय नव्हता. कमी पाण्यात कोणते पीक येईल याचा अभ्यास इथले शेतकरी करीत होतेच. सन १९८५-८६ च्या दरम्यान कै. दिनकर शिवाजी जाधव व एकनाथ इंगळे यांनी गावात द्राक्षलागवडीचा श्रीगणेशा केला. त्या वेळी स्थानिक बाजारपेठेत विक्री व्हायची. पण प्रतिकूल परिस्थितीत बाग लावली याचे गावाला कौतुक होते. हळूहळू बाकीचे शेतकरी द्राक्षशेतीची माहिती आणि अभ्यास करू लागले. मग १९९१-९२ च्या काळात शशिकांत पाटील, अरविंद पाटील, प्रकाश जाधव यांनीही द्राक्षलागवड केली. शिवाय निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले.  त्यात यशही आले. हे यश गावासाठी प्रेरणा देणारे होते. त्यातूनच गावात द्राक्षाची लागवड वाढू लागली. मग गावातील प्रत्येक जण आपली द्राक्षे सातासमुद्रापार पाठवायची हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लागवड करू लागला. आजमितीस गावातून ८० ते ९० टक्के द्राक्षनिर्यात होत असावी. सावळज (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदार जगन्नाथ पाटील यांच्या प्रोत्साहनातून पळशीकरांना अजून चालना मिळाली.  पाण्याचे दुर्भिक्ष, पण बागा टिकून  येथील अनेक बागायतदार वेळोवेळी टॅंकरने पाणी आणून ते शेततळ्यात सोडतात. तेथून ठिबकने पाणी देऊन बागा जगवितात. निसर्गाचा कोप झाला तरी हताश होत नाहीत. तर पुन्हा नव्या जिद्दीने पुढील हंगामाची सुरुवात करण्यासाठी सरसवतात.  वाडवडिलांकडून शेतीचे बाळकडू  गावातील अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. वास्तविक पाहता पोलिस आणि सैन्यभरती सोडली तर या गावातील तरुण नोकरीच्या मागे शक्यतो लागला नसावा.आपल्या वाडवडिलांची द्राक्षशेतीची परंपरा तो पुढे नेतोय. निर्यातक्षम द्राक्षाचं बाळकडू किंवा तंत्रज्ञान त्याला आपल्या घरातच उपलब्ध होत आहे.  पळशी गाव दृष्टिक्षेपात 

  • श्रेत्र (हेक्टर) 
  • गावाचे भौगोलिक क्षेत्र- १६६२ 
  • लागवडी खालील क्षेत्र- ९४१ 
  • फळबाग- १३६ 
  • द्राक्षे- ११० 
  • नवी लागवड- १० 
  • शेततळी- ७० हून अधिक 
  • गावात हवामान केंद्र. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे वेळोवेळी चर्चासत्रांचं आयोजन. 
  • अडी-अडचणींमध्ये एकमेकांना मदतीसाठी सर्व जण पुढे. 
  • या ठिकाणी होते द्राक्ष निर्यात 
  • इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅंड, रशिया, दुबई, हॉलंड. चीन ही नवी आश्‍वासक बाजारपेठ मिळाली आहे. 
  • द्राक्षातून मिळणारे वार्षिक परकीय चलन- सुमारे १८ कोटी 
  • निर्यातीचे वाण- तास ए गणेश, थॉमसन, क्लोन टू, माणिक चमन 
  • एकरी उत्पादन- १० ते १२ टन 
  • एकरी खर्च - किमान साडेतीन लाख रुपये 
  • मण्यांचा आकार १६ मिमीपासून ते २० मिमीपर्यंत 
  • द्राक्षातील ब्रिक्स- १६ ते १७ 
  • मिळणारा सरासरी दर ४० ते ८५ रु. प्रति किलो 
  • माझे शिक्षण बीएडीएडपर्यंत झाले आहे. नोकरीच्या मागे न लागता पूर्णवेळ शेती करु लागलो आहे. द्राक्ष निर्यातीमुळे आर्थिक सुबत्ता मिळण्यास मदत झाली असून राहणीमानात बदल झाला आहे.  अमित गुरव  संपर्क ः ९०११८९६७६७  निर्यातक्षम द्राक्षासाठी पोषक वातावरण असल्याने रसाळ आणि गोड द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बागायतदारांनी द्राक्षनिर्यात अविरतपणे सुरू ठेवली आहे. गुणवत्तेमध्येही आम्ही आघाडीवर आहोत.  पंकज पिसे  संपर्क ः ९१६८४००५७५  आमचं गाव दुष्काळी आहे. तरीही द्राक्षनिर्यातीत आम्ही नाव कमावलं आहे. आमच्या भागाला अजूनही पाणी नाही. गावाला शाश्‍वत पाणी मिळावी अशी मागणी आहे. येत्या कालावधीत टेंभूचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे देण्याचे आश्‍वासन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल.  - काका पाटील  संपर्क ः ९०४९२७३९००  गेल्या वर्षीपासून चीन ही निर्यातीसाठी नवी बाजारपेठ उपलब्ध होऊ पाहते आहे.  द्राक्षांचा दर्जा चांगला ठेवल्यानेच आमच्या गावच्या द्राक्षांना मागणी आहे ही आमच्यासाठी  अभिमानाची गोष्ट आहे.  - सुशीलकुमार पाटील  संचालक, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, सांगली विभाग.  संपर्क ः ९१५८०२५९६९ 

    चर्चासत्रांद्वारे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होते. कृषी विभागाने शेततळी, ठिबक सिंचन यांचा लाभ गावातील शेतकऱ्यांना दिला आहे. याचबरोबर निर्यातीसाठी नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येते. वैभव तांबे  उपविभागीय कृषी अधिकारी, विटा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com