हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रण

हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रण
हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रण

सध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आता हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. तसेच हळदीचे गड्डे तयार होण्यास ही योग्य वेळ आहे. मात्र तापमान फारच कमी झाले, तर हळद पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर अनिष्ट परिणाम होतो. किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाययोजना त्वरित करणे गरजेचे आहे. 

खोडकिडा

  •   पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो. दोन्ही पंखांवर काळ्या रंगाचे ठिपके असतात. खोडकिडीची 
  •     प्रौढ मादी पतंग हळदीच्या कोवळ्या पानांवर अंडी घालते. 
  •   अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर प्रथमत: पानांच्या कडेचे हरितद्रव्य फस्त करते. अळी लालसर रंगाची असून, अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते, खोडाला छिद्र करून आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. खोडावर पडलेले छिद्र हे खोडामध्ये अळी जिवंत असल्याचे लक्षण होय. 
  •   खोडकिडा ग्रस्त हळद पिकाचे मध्यभागी पान पिवळे पडलेले दिसते कालांतराने खोड वाळायला सुरवात होते. हळद पिकाच्या सुयोग्य वाढीच्या काळात या किडीचा उपद्रव दिसून येतो.
  • नियंत्रण :

  •     खोडकिडा ग्रस्त प्रादुर्भावित झाडे उपटून, गोळा करून तात्काळ नष्ट करावीत.
  •     निंबोळी तेल ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  •     प्रकाश सापळ्याचा वापर करावा (प्रति एकर १ सापळा). सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा.  यामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षित होतात. त्यांना नष्ट करावे.
  •     लागवडीनंतर ४० आणि ९० दिवसांच्या अंतराने महानीम (मिलिया डुबिया) किंवा घाणेरी (लॅण्टेना कॅमेरा) वनस्पतीच्या पानांचे २.० टन प्रति एकर याप्रमाणे सेंद्रिय आच्छादन केले असता खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  •     किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे जुलै ते ऑक्टोबरदरम्यान महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.
  •     निसर्गतः आढळणाऱ्या अनेक मित्र कीटकांद्वारे खोडकिडीच्या अळींचे नियंत्रण होत असते, अशावेळी मित्रकीटकांचे शेतातील अस्तित्व पाहूनच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. 
  • कंदमाशी

  • ही  हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. 
  •   माशी डासासारखी, पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.
  •   कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. ही अवस्था ५ ते ७ दिवसांची असते. 
  •   अंड्यातून लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडतात. उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरतात. पुढे अळी पिवळसर होते. तिला पाय नसतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशी, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होतो. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात. 
  •   लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. 
  •   या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑक्टोबरपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.
  •     क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जुलै ते ऑक्टोबरदरम्यान महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.
  •     उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. शिफारशीत केलेल्या वेळेवर हळदीची भरणी करावी.
  •     हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.
  •     लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे, बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. (बियाणे आंतरप्रवाही कीटकनाशक : क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम (५० टक्के पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवावेत. बीजप्रक्रिया करताना बेणे किमान १५ ते १५ मिनिटे द्रावणात बुडून राहतील याची दक्षता घ्यावी. १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यासाठी पुरते.)
  •     हळदीनंतर परत हळद किंवा आले यांसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.
  •     हेक्टरी ६ पसरट भांडी (माती अथवा प्लॅस्टिकची) वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशा आकर्षित होतात. त्यात पडून मरू लागतात. सदरची उपाययोजना अत्यंत प्रभावी, कमी खर्चीक व सहजरीत्या करण्यासारखी आहे. तसेच कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरतात. सेंद्रिय हळद उत्पादनामध्येही महत्त्वाची आहे. 
  • सूत्रकृमी

  • सूत्रकृमी (निमॅटोड) हा हळद पिकाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. कीड अतिशय सूक्ष्म असून डोळ्यांना दिसत नाही. ही कीड हळदीच्या मुळांवर गाठी तयार करते. जमिनीत पिकांच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषून घेते, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, फुटव्यांचे प्रमाण कमी होते. प्रथम पिकाचा शेंडा मलूल होऊन नंतर रोप पिवळे पडून झाड मरते. कालांतराने ही कीड हळदीच्या कंदामध्ये प्रवेश करून कंद सडवण्याचे काम करते. सडलेले कंद तपकिरी रंगाचे दिसतात. सूत्रकृमीमुळे झालेल्या कंदावरील जखमांतून रोगकारक बुरशी कंदात प्रवेश करते, त्यामुळे हळद पीक कंदकूज रोगाला बळी पडते.
  • नियंत्रण 
  •     सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस पावडर २ किलो प्रति एकरी २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी अथवा 
  •     भरणी करताना निंबोळी पेंड ८ क्विंटल प्रति एकरी या प्रमाणात वापर करावा.
  •     हळद पिकांत झेंडू सूत्रकृमींसाठी सापळा पीक म्हणून लावावे.    लागवडीसाठी सूत्रकृमी मुक्त, निरोगी बियाणे वापरावे.
  •     लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरटी करून कमीत कमी ३० दिवसांपर्यंत सूर्यप्रकाशाच्या साह्याने मातीचे  निर्जंतुकीकरण करावे. यामुळे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  •     पुढील वर्षी लागवडीचे नियोजन असलेल्या शेतातील मातीचे सूत्रकृमी परीक्षण करून घ्यावे.
  • हुमणी

  • या किडीची अळी नुकसानकारक असून मुळांवर आणि नवीन वाढ होत असलेल्या कंदावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी भुंगेरे रोज एक याप्रमाणे अंडी घालतात. त्यातून १५ ते २० दिवसांत अळी बाहेर पडते. अळी पांढऱ्या रंगाची असून, तिचा आकार इंग्रजी C अक्षरासारखा असतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीला काही दिवस सेंद्रिय पदार्थावर (शेणखतावर) उपजीविका करतात. सेंद्रिय पदार्थांचा अंश संपल्यानंतर अळ्या हळद पिकाची मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडतात. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते, रोपे वाळू लागतात. हुमणी किडीची जास्त तीव्रता असलेल्या ठिकाणी हळद पिकाचे खोड उपटून पाहिल्यास ते सहज उपटून येतात. हळद पिकाचे पूर्णतः नुकसान होते. 
  • नियंत्रण : किडीच्या नियंत्रणासाठी एकत्रित मोहीम राबवावी. एकत्रित मोहिमेद्वारे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास नियंत्रण सुलभ होते. 
  •     संध्याकाळच्या वेळेला या किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. लागवडीपूर्वी शेणखत टाकताना हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा.
  •     शेणखत वापरताना चांगले कुजलेले वापरावे. अर्धवट कुजलेले शेणखत वापरू नये. जैविक नियंत्रणासाठी मेटारायझीम अॅनासोप्ली ही परोपजीवी बुरशी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.
  •     हळद लागवडीनंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफॉस ४ मि.लि. प्रति लीटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.  
  •  ः ०२३३-२४३७२७४,   डॉ. मनोज माळी (प्रभारी अधिकारी), ९४०३७ ७३६१४     ः डॉ. रवींद्र जाधव (सेवा निवृत्त, कीटकशास्त्रज्ञ), ९७६४२ ३४६३४  (हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) टीप : हळद पिकावर विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत. केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत किंवा नोंदणी केलेल्या कीडनाशकाचाच वापर करावा.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com