गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रण

गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रण
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रण

गहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. खोडकीड, तुडतुडे, मावा या किडींबरोबर वाळवीमुळेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. १) खोडकिडा : या किडीचा पतंग तपकिरी किंवा गवती रंगाचा असून, अळी गुलाबी रंगाची असते. अळी अंगाने मऊ असून, डोके काळे असते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे काडीचा मधला भाग सुकून जातो. अळी खोडात शिरून आतील भागावर उपजीविका करते, त्यामुळे रोपे सुकून जातात. त्यांना ओंब्या येत नाहीत. पीक फुलोऱ्यात असताना प्रादुर्भाव झाल्यास ओंब्यामध्ये दाणे भरत नाहीत. ओंब्या पोचट व पांढऱ्या राहतात. नियंत्रण : जमिनीची खोल नांगरट दोन ते तीन कुळवणी करून काडी, कचरा, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे. जमिनीच्या उताराला आडव्या सरी पाडून पेरणीसाठी तयारी करावी. खोडकिडीचा अधिक प्रादुर्भाव होत असलेल्या भागामध्ये उभ्या पिकातील कीडग्रस्त झाडे आठवड्याच्या अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नष्ट करावीत. तसेच, पिकाची कापणी झाल्यावर उपद्रवग्रस्त क्षेत्रातील धसकटे गोळा करून जाळावीत. रासायनिक नियंत्रण, फवारणी प्रतिलिटर पाणी सायपरमेथ्रिन (१० ई. सी.) १.१ मि. ली. २) तुडतुडे तुडतुडे हे कीटक हिरवट राखाडी रंगाचे, पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुडे व त्याची पिले पानातून रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळू लागतात. पिकांची वाढ खुंटते. ३) मावा गव्हावर पिवळसर रंगाचा आणि निळसर हिरव्या रंगाचा अशा दोन प्रकारचे मावा आढळतात. या किडीचे प्रौढ आणि पिले पानातून व कोवळ्या शेंड्यातून रस शोषतात. तसेच, त्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या गोड व चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते. त्याचाही फटका पीक उत्पादनाला बसतो. तुडतुडे व मावा किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) ३ मिली किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस (२५ ई. सी.) ३ मिली. ४) वाळवी किंवा उधई : या किडीचा प्रादुर्भाव पीकवाढीच्या अवस्थेत दिसून येतो. ही कीड गव्हाच्या रोपाची मुळे खात असल्यामुळे रोपे वाळतात. संपूर्ण झाड मरते. नियंत्रण : वाळवीच्या बंदोबस्तासाठी बांधावरील वाळवीची वारुळे खणून काढावीत. त्यातील राणीचा नाश करावा. वारुळे नष्ट करून जमीन सपाट केल्यावर मध्यभागी सुमारे ३० सेंमी खोलीचे एक छिंद्र करावे. त्यात क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण वारुळात ओतावे. डॉ. भय्यासाहेब गायकवाड ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव ता. गेवराई जि. बीड.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com