कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
टेक्नोवन
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध सापळ्यांची निर्मिती
बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो आणि दुर्गापूर (राजस्थान) येथील अखिल भारतीय मृदा संधिपाद किडीवरील प्रकल्प यांनी एकत्रितरीत्या हुमणीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळा विकसित केला आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो आणि दुर्गापूर (राजस्थान) येथील अखिल भारतीय मृदा संधिपाद किडीवरील प्रकल्प यांनी एकत्रितरीत्या हुमणीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळा विकसित केला आहे. हुमणी (शा. नाव - Holotrichia consanguinea) किडीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी सावकाश उत्सर्जित होणाऱ्या गंधाची निर्मिती केली आहे. सावकाश उत्सर्जनासाठी त्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या प्रक्षेत्र चाचण्या दुर्गापूर, जयपूर, मौलासार (नागौर) येथील कृषी विज्ञान केंद्र, जोधपूर येथे घेण्यात आल्या.
भुईमूग (शा. नाव -Arachis hypogaea L.) हे महत्त्वाचे तेलबिया आणि पूरक अन्नखाद्य पीक आहे. या पिकांमध्ये लागवडीपासून साठवणीपर्यंत १०० पेक्षा अधिक किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे दरवर्षी एकूण नुकसानीच्या सुमारे १५ टक्के इतके म्हणजे १.६ दशलक्ष टन, आणि २५,१६५ दशलक्ष रुपयांचे नुकसान होते. त्यातही मातीतून येणाऱ्या किडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मातीतील किडींमध्ये हुमणी अळी ही मुळांवर उपजीविका करते. या किडीचे भुंगे मे- जून महिन्यामध्ये बाहेर पडतात. हे भुंगे ही रोपवाटिका, भाज्या, लॉन आणि अन्य अनेक हंगामी पिकांचे मोठे नुकसान करतात. त्यातील होलोट्रिकिया कॉनसॅनग्युनिया ही भुईमुगावर प्रादुर्भाव करणारी प्रजात असून, तिच्यामुळे पिकाचे २० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. पांढऱ्या रंगाची ही अळी इंग्रजी सी अक्षराप्रमाणे आकार धारण करते. ही अळी प्राधान्याने हलक्या जमिनीत, तंतुमय मुळे असलेल्या पिके आणि अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीमध्ये आढळते. जमीन जर पाणथळ, घट्ट, खडकाळ आणि वनस्पतीरहित असेल, तर फारशी आढळत नाही.
...असे आहे संशोधन
हुमणीचे भुंगेरे मिलनासाठी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट गंध उत्सर्जित करतात. त्यातील मिथॉक्सि बेन्झीन हा गंध संशोधकांनी ओळखला आहे. हे गंध निसर्गामध्ये संप्लवनशील असून, तो लगेच उडून जातो. हे टाळण्यासाठी मिथॉक्सि बेन्झीनचे नॅनोजेल फॉरम्युलेशन तयार केले आहे. त्यामुळे तो अत्यंत सावकाशपणे उत्सर्जित होत राहतो. त्याच्या चाचण्या राजस्थानमधील हुमणी प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागामध्ये घेण्यात आल्या.
या जेलपासून त्यांनी गंधगोळ्या (सेप्टा) तयार केल्या आहेत. या गंधगोळ्या सुमारे महिनाभर उत्तमपणे कार्य करतात.
या सापळ्यामध्ये प्रति दिन हुमणीचे भुंगेरे अडकतात. त्याची सरासरी प्रति दिन १७.५ इतकी भरते. सध्या प्रायोगिक पातळीवर या गंधगोळ्यांची किंमत प्रति नमुना १० रुपये अशी ठेवण्यात आली आहे. ते बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो आणि राजस्थान येथील संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.
(स्रोत : ICAR- National Bureau of Agricultural Insect Resources, Bengaluru)
- 1 of 22
- ››