पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
कृषी सल्ला
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची कमी उत्पादकता ही प्रामुख्याने किडीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे होते. पेरणीपासून पीक निघेपर्यंत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण, अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. साठवणुकीमध्येही अनेक किडींचा प्रादुर्भाव तुरीमध्ये दिसून येतो. तीव्र स्वरूपामध्ये किडींचा प्रादुर्भाव असल्यास ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.
महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची कमी उत्पादकता ही प्रामुख्याने किडीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे होते. पेरणीपासून पीक निघेपर्यंत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण, अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. साठवणुकीमध्येही अनेक किडींचा प्रादुर्भाव तुरीमध्ये दिसून येतो. तीव्र स्वरूपामध्ये किडींचा प्रादुर्भाव असल्यास ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.
१. शेंगा पोखरणारी अळी
(इंग्रजी नाव -Pod borer, शा. नाव -Helicoverpa armigera) :
तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी किंवा घाटे अळी ही नुकसानकारक कीड आहे. ही बहुभक्षी असून, तुरीसह कापूस, टोमॅटो, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, करडई अशा सुमारे २०० पिकांवर आढळते.)
जीवनक्रम ः
अंडी, अळी, कोष व पतंग
एक मादी पतंग सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळ्या, फुले तसेच शेंगावरही घालते. ४ ते ७ दिवसांनी अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. अळी रंगाने हिरवट पिवळसर असून, अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी साधारणपणे ४ सें.मी. लांब असते. १४ ते १६ दिवसांपर्यंत पूर्ण वाढ होऊन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्ठणात कोषावस्थेत जातात. कोषातून पतंग बाहेर पडतात. अशाप्रकारे या किडीचा जीवनक्रम ४-५ आठवड्यात पूर्ण होतो.
- या अळीच्या वर्षातून ७ ते ९ पिढ्या तयार होतात.
- ढगाळ वातावरणात या किडींची संख्या वाढते व परिणामी नुकसान जास्त होते.
- अंड्यातून बाहेर निघालेली अळी अगोदर तुरीची कोवळी पाने खाते, पीक फुलोऱ्यात आल्यावर कळ्यावर उपजीविका करते. नंतर शेंगा लागल्यावर शेंगांना छिद्र पाडून शरीर बाहेर ठेवून आतील दाणे खाते. त्यामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगाना नुकसान पोचवते.
२. पिसारी पतंग
(इंग्रजी नाव -Tur plume moth, शा. नाव - Exelastis atomosa) :
- अळी सुमारे १२.५ मि.मि. लांबीची असून, सुरवातीला हिरव्या व नंतर तपकिरी रंगाची दिसते. अळी मध्यभागी फुगीर असून दोन्ही टोकाला निमुळती असते. पूर्ण शरीरावर केस असतात. अळी १० ते १६ दिवसांमध्ये पूर्ण वाढ झाल्यावर शेंगेंवर किंवा शेंगेंवरील छिद्रात कोषावस्थेत जाते. कोष हा लालसर तपकिरी रंगाचा असतो. कोषातून ४ ते ७ दिवसांत पतंग बाहेर पडतो. या किडीचा पतंग नाजूक असतो. या किडीचा जीवनक्रम १७ ते २८ दिवसांत पूर्ण होतो.
- या अळीचा प्रादुर्भाव साधारणत: पावसाळा संपल्यावर मोठ्या प्रमाणावर होतो.
- अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरवातीला कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेंचा पृष्ठभाग खरवडून खाते व नंतर बाहेर राहून आतील दाण्यावर उपजीविका करते.
३. शेंगमाशी
(इंग्रजी नाव -Pod fly, शा. नाव - Melanagromyza obtusa) :
मादी शेंगमाशी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची, लांब गोलाकार असतात. ही अंडी ३ ते ७ दिवसांत उबल्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. बारीक अळी, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो. अळी अवस्था १० ते १८ दिवसात पूर्ण होऊन शेंगेंतच कोषावस्थेत जाते. कोषावरण तपकिरी रंगाचे असून लांब गोलाकृती असतो. कोषावरणाच्या आत कोष असून, सुरवातीस हा कोष पिवळसर पांढरा असतो. पुढे तो तपकिरी रंगाचा होतो. कोषावस्था ४ ते ९ दिवसांची असून, त्यानंतर शेंगेतून माशी बाहेर पडते. अशा प्रकारे शेंगमाशीचा जीवनक्रम ३ ते ४ आठवड्यात पूर्ण होतो.
सुरवातीस शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगेंवर दिसत नाही. मात्र, वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडून बाहेर पडते. तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेंत प्रवेश करून अर्धवट दाणे खाते. दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. यामुळे बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात.
४. पाने व फुले जाळी करणारी अळी
(इंग्रजी नाव -Spotted pod borer शा. नाव - Maruca vitrata) :
या किडीची प्रौढ मादी पिवळसर रंगाची असून, ती उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घालते. अळी १४ मि.मि. लांब, हिरवट पांढऱ्या रंगाची असून, त्यावर दोन्ही बाजूस काळे ठिपके असतात. कोष चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेला असतो.
या किडीचा प्रादुर्भाव साधारणत: पीक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त आर्द्रतेच्या वेळी आढळून येतो. ही अळी पाने, फुले, कळ्या व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करते. त्यात लपून बसते. वाढ होणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते व नुकसान होते. आतमध्ये अळी पाने पोखरत असल्यामुळे पानांची अन्न निर्माण करण्याची शक्ती कमी होते. झाड जोमदार वाढत नाही. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी शेंगामधील अपरिपक्व दाणे फस्त करते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन :
वातावरणातील विविध घटकांचा समन्वय साधत एकमेकास पूरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन होय. किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी मशागतीय, यांत्रिक, जैविक व किमान पातळीवर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो.
१. यांत्रिक पद्धती :
- पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत.
- शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
- तूर पीक कळी अवस्थेत आल्यापासून एकरी दोन कामगंध सापळे पिकाच्या वर एक फुटी उंचीवर लावावेत. त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावाची पातळी कळू शकेल.
- तुरीवरील मोठ्या अळ्या वेचून त्यांचा नायनाट करावा.
- तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावे. यामुळे पक्ष्यांना आश्रय मिळून ते पिकातील अळ्यांचे भक्षण करतील.
२. जैविक पद्धती :
- पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.ली. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
- शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ०.५ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी सायंकाळी करावी. हे विषाणू अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरात विषाणूची वाढ होते. परिणामी, अळ्या ५-७ दिवसांत मरतात.
३. रासायनिक पद्धत :
अन्य नियंत्रण पद्धतींचा अवलंब केल्यानंतरही किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक वाढल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
आर्थिक नुकसान पातळी -
१. शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) : कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १० पतंग प्रतिसापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर २ अळ्या प्रतिमीटर ओळीत.
२. पाने गुंडाळणारी अळी व पिसारी पतंग : ५ अळ्या प्रति १० झाडे
३. शेंगमाशी : ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा
शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडीची नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २.८ मि.ली. किंवा
फ्ल्यूबेंडायअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मिली किंवा
इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.६६ मि.ली. किंवा
लॅबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ०.८ मि.ली.
संपर्क ः बोकन एस. सी., ९९२१७५२०००
(कृषी कीटकशास्त्र विभाग, राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी)
फोटो गॅलरी
- 1 of 39
- ››