कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
अॅग्रो विशेष
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक रणनीती
गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी घालण्यासाठी कपाशीच्या कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडाची उपलब्धता पूर्वहंगामी कपाशी लागवडी सातत्याने होत राहते. परिणामी किडींचा प्रादुर्भाव आणि प्रसार वाढत जातो. त्यासाठी पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळण्यासोबतच एकात्मिक कीडनियंत्रण रणनीतीचा वापर करणे गरजेचे आहे.
गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी घालण्यासाठी कपाशीच्या कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडाची उपलब्धता पूर्वहंगामी कपाशी लागवडी सातत्याने होत राहते. परिणामी किडींचा प्रादुर्भाव आणि प्रसार वाढत जातो. त्यासाठी पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळण्यासोबतच एकात्मिक कीडनियंत्रण रणनीतीचा वापर करणे गरजेचे आहे.
यंदाच्या कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच अकोला, यवतमाळ, नांदेड, धुळे, जळगांव जिल्ह्यांच्या काही भागांत पूर्वहंगामी लागवड केलेल्या कपाशीवर मागील आठवड्यापासून गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची प्राथमिक नोंद झाली आहे. या जिल्ह्यांतील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या काही भागांतील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केलेली कपाशी सध्या फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत (५० -७० दिवस) असल्याने तुरळक ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. परंतु हा प्रारंभिक स्वरूपाचा प्रादुर्भाव असून, आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सुचविलेल्या उपाययोजनांचा त्वरित अवलंब करावा. त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव रोखून पुढील नुकसान टाळणे शक्य होईल.
वास्तविक महाराष्ट्राच्या बहुतांश भागात (सिंचन सुविधा असलेल्या काही भागाचा अपवाद वगळता) कोरडवाहू कपाशीची लागवड केली जाते. त्यामुळे राज्यात साधारणपणे पुरेसा मॉन्सून (६०-८० मिमी) पडल्यानंतर १५ जून ते १५ जुलै या कालावधीतच कपाशीची लागवडीची शिफारस आहे. चालू हंगामामध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा व खानदेश या तीनही कापूस उत्पादक विभागांत सुरुवातीला लांबलेल्या मॉन्सूनमुळे कोरडवाहू कपाशीची पेरणी तशी बऱ्यापैकी उशिरा म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान झाली आहे. सध्या पीक हे शाकीय वाढीच्या (३०-३५ दिवस) अवस्थेत आहे. या कपाशीला अजून पात्या -फुले लागण्यास किमान १०-१५ दिवसांचा कालावधी असून, सध्यातरी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याचा फारसा धोका नाही. मात्र पुढे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गुलाबी बोंड अळीचा प्रसार रोखण्यासाठी
- पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन (हेक्टरी पाच) याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. दर आठवड्याला सापळ्यात अडकलेल्या पतंगांची निरीक्षणे नोंदवावीत. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
- प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. त्यामुळे पुढील प्रादुर्भाव रोखता येईल. १० टक्के डोमकळ्या ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फुलोरा अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिलि अधिक नीम तेल ५ मिलि अधिक धुण्याची पावडर १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाना अंडी घालण्यापासून रोखण्यास मदत होते. त्याचबरोबर पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात रसशोषक किडींनाही प्रतिबंध होतो.
- जिथे शक्य असेल तिथे उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकिडींचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेपासून (पेरणीपासून ४५ दिवसांनंतर) तीनदा प्रसारण करावे. किडींचे चांगले नियंत्रण मिळते.
- हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडाचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी (१० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
- पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशके कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे नोव्हेंबरपूर्वी वापरणे कटाक्षाने टाळावे. तसेच एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून वापरू नये, अन्यथा पांढरी माशी व इतर रसशोषक किडीचा उद्रेक होण्यास मदत होते.
कपाशीच्या वाढीनुसार गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली कीटकनाशके |
|
पेरणीनंतर दिवस | कीटकनाशक व मात्रा प्रति १० लिटर पाणी* |
६०-९० दिवस (सप्टेंबर) | क्विनॉलफॉस (२५ टक्के एएफ) २० मिलि किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २० ग्रॅम |
९०-१२० दिवस (ऑक्टोबर) | क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २५ मिलि किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २० ग्रॅम |
>१२० दिवस (नोव्हेंबरपासून पुढे) | फेनव्हलरेट (२० टक्के ईसी) १० मिलि किंवा सायपरमेथ्रिन (१० टक्के ईसी) १० मिलि |
*पावर स्प्रेसाठी कीटकनाशकाची मात्रा तिप्पट घ्यावी |
पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी
साधारणपणे ६०-८० मिमी पाऊस पडल्यानंतर १५ जून -१५ जुलैदरम्यान महाराष्ट्रात कपाशीची लागवड करण्याची शिफारस आहे. परंतु ओलिताखालील कापूस क्षेत्रात बहुतेक शेतकरी कापसाची लागवड एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्यादरम्यान करतात. यालाच पूर्वहंगामी लागवड असे म्हणतात. गुलाबी बोंड अळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. पूर्वहंगामी लागवड केलेल्या कापसाला पात्या-फुले लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. तसेच मागील हंगामातील सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंड अळ्यांपासून निघणारे पतंगही याच कालावधीत बाहेर पडतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळून येतात. गुलाबी बोंड अळीची नवीन हंगामातील पहिली पिढी ही पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. पुढे हाच प्रादुर्भाव नंतर जून-जुलैमध्ये लावलेल्या हंगामी कपाशी पिकावर प्रसारित होतो. पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळावे. जून-जुलैदरम्यान सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून अळ्या बाहेर पडल्या तरी त्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी कपाशी बोंडे उपलब्ध नसतात. त्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा “आत्मघाती उदय” (suicidal emergence) असे म्हणतात. अशा प्रकारे पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळून गुलाबी बोंड अळीची पुढची उत्पत्ती रोखता येते.
संपर्क ः ०७१०३ - २७५५३८, २७५५४९, २७५६१७, २७५६२०
ई-मेल : cicrnagpur@gmail.com
(केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)
फोटो गॅलरी
- 1 of 434
- ››