परसबागेत वापरा सेंद्रिय खते

परसबागेतील लागवड
परसबागेतील लागवड

परसबागांसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. बागेसाठी जागा तयार करताना त्यामध्ये शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, घोड्याची लीद, कोंबडी खत, निमपाला, ताग, हिरवळीची खते वापरावीत. तसेच निंबोळी पेंड, करंज पेंड यांचाही वापर करावा.

भाग  २

परसबागेत लागवडीसाठी ऋतुमानानुसार वेलवर्गीय,  शेंगवर्गीय, पालेभाज्या, फळभाज्या आदी भाज्यांची निवड करावी. कुटूंबाच्या गरजेनूसार भाजीपाला लागवडीचे नियोजन करावे.   भाजीपाल्याची निवड  :  

  • एका कुटुंबाला वांगी, मिरची, कढीलिंब, कोथिंबीर, आळू, टोमॅटो, लिंबू, पालेभाज्या, कढीपत्ता इत्यादी भाज्या लागतात. छोट्या कुटूंबाला चार ते सहा वांगी व मिरचीची झाडे, एक कढीलिंबाचे, एक दोन केळीची, एक दोन पपईची झाडे पुरेशी होतात. 
  • मिरची व वांगी यांची झाडे वर्षभर टिकणारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वाफ्याच्या वरंब्यावर कोथिंबीर, मेथी किंवा मुळा, कांदा, लसूण, गाजर आदी भाज्या घ्याव्यात. धने व मेथी दर आठवड्याला टाकली तर त्यांचे नियमितपणे उत्पादन मिळू शकते. 
  • लिंबाचे झाड थोडे मोठे होते. त्यामुळे पुरेशी जागा असेल तरच ते लावावे. कढीपत्ता लावण्यास पुरेशी जागा नसल्यास कुंडीतही तो घेता येतो.  
  • दुधी भोपळा, दोडका, घोसावळी, कारली व इतर वेलभाज्या या घरावर, गॅलरीवर किंवा घराच्या कंपाउंडवर चढवून त्यांचे पीक घेता येते. तोंडली कंपाउंडच्या तारेवरही होऊ शकतात. 
  • हंगामनिहाय भाजीपाला निवड :   

  • पावसाळा (जून ते सप्टेंबर) : मेथी, पालक, चुका, दोडका, कारली, मुळा, भोपळा, गाजर.
  • हिवाळा (ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी) : गवार, भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, वाल, भोपळा, चवळी, मटार, फुलकोबी.
  • उन्हाळा (मार्च ते मे) : वांगी, काकडी, फुलकोबी, दोडका इत्यादी.
  • परसबागेचे महत्त्व :

  • आवडीची भाजी व रोज ताजी भाजी मिळते. 
  • ताज्या भाज्यांमुळे शरीरास भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. 
  • परसातील भाजीच्या देवाणघेवाणीमुळे संबंध सुधारतात. 
  • पैशाची बचत होते. उर्वरित भाजीच्या विक्रीमुळे आर्थिक उत्पन्न वाढते. 
  • महिला बचत गटांसाठी हा एक सामूहिक लघुउद्योग होऊ शकतो.
  • परसबागेतील ऑक्‍सिजन कॉर्नर : 

  • परसबागेतील ही नवीन संकल्पना आहे. घरासमोरील तुलसी वृंदावनाबरोबरच काही राखीव जागांमध्ये ऑक्‍सिजन कॉर्नर ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणता येईल. त्यासाठी बियापासून जून-जुलै महिन्यात तुळशीची रोपे तयार करून निवडलेल्या जागेमध्ये लागवड करावी जेणेकरून दिवसभर कामावरून थकून भागून आलेल्या घरातील सदस्यांसाठी ऑक्‍सिजन कॉर्नरमध्ये मनःशांती मिळेल. अलीकडे धकाधकीच्या व अतिशय व्यस्त असा युगामध्ये ही नवीन संकल्पना प्रभावी ठरत आहे; त्याचा समावेश आपल्या परसबागेत निश्‍चितच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
  • भाजीपाला, फळझाडे आदी पिके लावून जागा शिल्लक राहिल्यास हिरवळ किंवा मुद्दामहून सोडलेल्या खुल्या जागेमध्ये झोपाळ्याची रचना करावी. त्यामुळे घरातील छोटी मुले व वृद्धांसाठी विरंगुळा होतो. 
  • लागवड करताना महत्त्वाच्या बाबी : 

  • सांडपाणी व घरातील कचऱ्याचा योग्य वापर होईल अशा प्रकारे व्यवस्थापन करावे.
  • सांडपाणी जेथून येते ती जागा वर असावी व भाजीचा वाफा थोडा खाली असावा. म्हणजे सांडपाणी सहजपणे वाफ्याच्या बाजूला उतार असल्याने वाहू लागेल.
  • परसबागेतील माती घट्ट दाबून घ्यावी. त्या मातीत एक पन्हाळ काढवी. पन्हाळीत घाण अडकू नये यासाठी तिच्या कडेकडेने दगड गोटे किंवा मातीची कौले लावावीत. म्हणजे पाणी सतत भाजीच्या वाफ्यापर्यंत वाहत राहते. 
  • परसबाग छोटी असावी, त्यामुळे तिचे व्यवस्थापन सोपे जाते. 
  • बागेत स्वच्छता राहील अशापद्धतीने नियोजन करावे. 
  • शक्यतो बाहेरील मजूरांचा वापर करु नये. 
  • संपर्क :  एम. जी. आगळे, ९६२३६७९९७० (कृषी विज्ञान केंद्र, बारामती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com