पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल फायदेशीर

पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल फायदेशीर
पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल फायदेशीर

आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची पाण्याची गरज कमी होते, तण नियंत्रण होते. पिकाला विशिष्ट रंगाच्या प्लॅस्टिक आच्छादनाचा जास्त फायदा होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे ठरावीक पिकासाठी विशिष्ट रंगाच्या आच्छादनाचा उपयोग केल्यास उत्पादनात वाढ मिळू शकते. आ च्छादनाचा पीकवाढीसाठी फायदा दिसून येतो. आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी होते. पिकाची पाण्याची गरज कमी होते, तणनियंत्रण होते. आच्छादनाच्या पृष्ठभागावरून सूर्यकिरणे परावर्तित होत असल्याने पिकाला हानिकारक कीटकांची वाढ कमी होते. जमिनीखाली उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते, मातीचे तापमान नियंत्रित राहते. या फायद्यांव्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट पिकाला विशिष्ट रंगाच्या आच्छादनाचा जास्त फायदा होत असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. त्यामुळे ठरावीक पिकासाठी विशिष्ट रंगाच्या आच्छादनाचा उपयोग केल्यास वाढीव उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्याच्या काळात पिकांमध्ये सुकलेला पालापाचोळा, वाळलेला पेंढा, पानांचा वापर आच्छादनासाठी केला जातो. याचबरोबरीने आता प्लॅस्टिक आच्छादनाचाही वापर वाढला आहे. या आच्छादनांमुळे विक्रीयोग्य उत्पादनात २४ ते ६५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याच बरोबरीने जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, तणांचे नियंत्रण होते. आच्छादनामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. चंदेरी किंवा काळ्या रंगाच्या आच्छादनामुळे ९५ ते ९८ टक्के तणनियंत्रण होऊ शकते. डोंगराळ उतार जमिनीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी देखील आच्छादनांचा चांगला उपयोग होतो. 

  •    प्लॅस्टिक आच्छादनाचा विशिष्ट रंग पिकाची वाढ आणि उत्पादनावर परिणाम करतो. 
  •    ठरावीक पिकाला विशिष्ट रंगाचे प्लॅस्टिक आच्छादन जास्त उपयुक्त ठरते. त्यामुळे आच्छादनाचे सामान्य फायदे विचारात घेऊन विशिष्ट रंगाच्या आच्छादनाचा उपयोग पिकासाठी करणे फायद्याचे ठरते.
  •    विविध रंगांच्या प्लॅस्टिक आच्छादनाची सूर्यप्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वेगवेगळी असते. गडद रंगाची आच्छादने जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतात. त्यामुळे अशा प्रकारच्या आच्छादनांमध्ये मातीचे तापमान खूप जास्त असल्याचे आढळते.
  •    थंड हवामानात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी गडद रंगाची आच्छादने वापरली जातात. उदा. ः स्ट्रॉबेरी, ब्रोकोली यासारख्या पिकांसाठी प्लॅस्टिक आच्छादाने फायदेशीर ठरतात.
  •    उष्ण हवामानात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी फिक्या रंगाची आच्छादने वापरणे फायद्याचे ठरते. कारण, अशा प्रकारची आच्छादने त्यांच्यावर पडलेली बहुतेक सूर्यकिरणे परावर्तित करतात. त्यामुळे आच्छादनाच्या खाली मातीचे तापमान नियंत्रित राहते. उदा. ः उन्हाळी टोमॅटोसाठी चंदेरी रंगाच्या आच्छादनाचा उपयोग फायदेशीर ठरतो.
  •    काही रंगांची आच्छादने विशिष्ट प्रकारच्या कीटकांना आकर्षित करतात. त्यामुळे त्यांचा उपयोग कीटकांना मुख्य पिकापासून दूर ठेवण्यासाठी करता येतो. 
  • आच्छादनांचा फायदा 

  •    आच्छादनाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारी सूर्यकिरणे ही मुख्यतः दोन प्रकारची असतात. एक म्हणजे ‘फोटोसिंथेटिक किरणे’, जी प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत करतात, त्यासाठी आवश्यकही असतात. दुसरी किरणे म्हणजे ‘फोटोमोर्फोजिनिक किरणे’. 
  •    वेगवेगळ्या रंगांची आच्छादने ही वेगवेगळ्या प्रमाणात फोटोसिंथेटिक किरणे तसेच फोटोमोर्फोजिनिक किरणे परावर्तित करतात. सामान्यतः असा कल दिसून येतो, की वाढीव फोटोमोर्फोजिनिक किरणांना प्रतिसाद म्हणून वनस्पती तिच्या वरील टोकाच्या भागाला जास्त वाढते. याचे मुख्य कारण किंवा उद्देश प्रकाशसंश्लेषणासाठी जास्तीत जास्त फोटोसिंथेटिक किरणे मिळवणे, हा असतो. या उलट जेव्हा आच्छादने जास्त फोटोसिंथेटिक किरणे परावर्तित करतात, तेव्हा वनस्पतीला प्रकाशसंश्लेषणासाठी अर्थात अन्ननिर्मितीसाठी लागणारी किरणे जास्त मिळत असतात. त्यामुळे वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत जास्त अन्न तयार करतात. या अन्नाला ‘फोटोसिंथेट’ असे म्हणतात. फोटोसिंथेटबरोबर वाढीव रासायनिक ऊर्जाही तयार केली जाते. 
  •    फोटोसिंथेट व रासायनिक ऊर्जा वनस्पतीमध्ये फळांच्या स्वरूपात साठवली जाते. त्यामुळे वाढीव फोटोसिंथेट व रासायनिक ऊर्जा साठवण्यासाठी वनस्पती वाढीव फळांची निर्मिती करते. अशाप्रकारे वाढीव फोटोसिंथेटिक किरणांना प्रतिसाद म्हणून पीक उत्पादनात वाढ होते.
  •    फोटोसिंथेटिक किरणांची तरंग लांबी ४०० ते ७०० नॅनोमीटर, तर फोटोमोर्फोजिनिक किरणांची तरंग लांबी ७०० ते ८०० नॅनोमीटर एवढी असते. अशाप्रकारे वनस्पतीला किंवा पिकाला किती प्रमाणात फोटोसिंथेटिक किरणे प्राप्त होतात, यावर उत्पादनवाढ अवलंबून असते. आच्छादनाची फोटोसिंथेटिक किरणे परावर्तित क्षमता ही पिकाची वाढ व उत्पादन यावर परिणाम करते. त्याचबरोबर वनस्पतींची फोटोसिंथेटिक किरणे वापरायची क्षमताही वेगवेगळी असते. 
  •    वनस्पतीमध्ये फायटोक्रोम रंगद्रव्य हे फोटोसिंथेटिक किरणे वापरण्याचे काम करीत असते. या रंगद्रव्याचे प्रमाण व विकासावर वनस्पतीची फोटोसिंथेटिक किरणे वापरण्याची क्षमता अवलंबून असते. त्यामुळे एखाद्या वनस्पतीला जास्त फोटोसिंथेटिक किरणे मिळूनही जर तिच्याकडे विकसित फायटोक्रोम रंगद्रव्य नसतील तर तिच्याकडे फोटोसिंथेटिक किरणे उपयोगात आणण्याची क्षमताही कमी असते. त्यामुळे त्या वनस्पतीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत नाही. त्यामुळे आच्छादनाच्या रंगाचा त्या पिकाच्या उत्पादनावर फारसा परिणाम दिसत नाही.  याउलट जेव्हा एखाद्या वनस्पतीला तुलनात्मकरीत्या कमी फोटोसिंथेटिक किरणे मिळत असूनही जर तिच्यात फायटोक्रोम रंगद्रव्य योग्य प्रमाणात विकसित असेल, तर ती वनस्पती सूर्यापासून थेट मिळणाऱ्या फोटोसिंथेटिक किरणांसहित आच्छादनाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारी वाढीव फोटोसिंथेटिक किरणे योग्यरीत्या वापरू शकते. तिच्या उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. फायटोक्रोम रंगद्रव्य हे विविध वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रमाणात विकसित होते. एकाच जातीच्या दोन वनस्पतींमध्येसुद्धा ते वेगवेगळ्या प्रमाणात असू शकते. 
  •    आतापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या संशोधनांमध्ये केळीसाठी चंदेरी रंगाचे आच्छादन, वांगी पिकासाठी निळ्या रंगाचे आच्छादन, टोमॅटोसाठी चंदेरी रंगाचे आच्छादन जास्त उपयुक्त ठरल्याचे आढळून आले आहे.
  •  : विनायक पराडकर, ९४०५५९५९३५ : भाग्यश्री जालगावकर, ८००५५१८१६८ (पीएचडी विद्यार्थी, मृदा आणि जल अभियांत्रिकी विभाग, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com