नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कडधान्ये
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
मागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान राहिल्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पिकावर या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फुले, पाने व शेंगा भरण्याची अवस्थेवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते.
मागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान राहिल्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पिकावर या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फुले, पाने व शेंगा भरण्याची अवस्थेवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते. या किडीचा वेळीच बंदोबस्त केल्यास उत्पादनातील घट टाळता येऊ शकते.
शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer) :
शास्त्रीय नाव ः हेलिकोवर्पा आर्मिजेरा (Helicoverpa armigera)
तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा रंग हिरवट पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. या किडीचा पतंग रंगाने फिक्कट पिवळसर असून पुढील पंखावर काळे ठिपके असतात.
या किडीचा मादी पतंग सुमारे ७०० ते ३ हजार अंडी कळ्या फुले, देठ पाने, शेंगा यावर घालते. अंड्यातून ३ दिवसात अळी बाहेर येते. अळी अवस्था १४-१५ दिवस असते. अळी जमिनीत कोषावस्था एका आठवड्याची असते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.
नुकसानीचा प्रकार :
प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळी कळी व फुलावर प्रादुर्भाव करते. नंतरच्या अवस्थेतील अळी शेंगाचे नुकसान करते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६०-८० टक्के नुकसान होते. एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांचे नुकसान करते.
अधिक प्रादुर्भावाचा कालावधी :
ढगाळ वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
एकात्मिक व्यवस्थापन :
- तुरीमध्ये एकरी ४ गंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांपेक्षा एक फूट अधिक उंचीवर लावावेत.
- तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
- पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १५०० पीपीएम) २.५ मिली या प्रमाणे फवारणी करावी.
- घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (२५० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मिली प्रती लीटर पाणी प्रमाणे हेक्टरी ५०० लीटर द्रावणाची फवारणी करावी.
- आर्थिक नुकसानीची पातळी : ८-१० पतंग प्रती सापळा २-३ दिवसात किंवा १ अळी प्रती १-२ झाड किंवा ५-१० टक्के नुकसान झालेल्या शेंगा.
किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आल्यास
फवारणी प्रती लीटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा
क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा
प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) २ मि.लि.
अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास,
इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के ) ०.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डीअमाईड (३९.३५ एस.सी.) ०.२ मिली
के. एम. जाधव, ८९८३१०४९१९
(साहाय्यक प्राध्यापक, महात्मा गांधी मिशन, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद.)
- 1 of 3
- ››