हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक पर्याय

हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक पर्याय
हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक पर्याय

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेपासून केवळ २० किमी अंतरावर नंदकुमार याचं गाव. तळेगाव दाभाडे हे पूर्वीपासूनच हरितगृह पद्धतीच्या व्यावसायिक शेतीसाठी प्रसिद्ध. आधी त्यात मोठ्या १०० टक्के निर्यातक्षम कंपन्यांनी पाय रोवले होते. नंतर आंबीजवळ तर शासकीय पुढाकारातून पॉलीहाउसचे जाळेच पसरले गेले. त्यामुळे मावळ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हरितगृहाच्या शेतीविषयी माहीत नाही असे होत नाही. देवरामही त्यातलाच एक. फक्त आर्थिकदृष्ट्या ते आपल्याला शक्य होईल, एवढीच त्याला नेहमी धास्ती वाटे. एकदा बोलता बोलता त्याने ही धास्ती आपल्या मेव्हण्याला - देवरामला बोलून दाखवली. देवराम पूर्वी पॉलिहाउस कंपनीमध्ये काम करत होता. दोघांची गावे लगतच. दोघांच्या शेतजमिनीतील व वयातील अंतरही अत्यंत कमी, त्यामुळे बऱ्यापैकी मित्रत्वाचे नाते होते. कोणतीही गोष्ट दोघांमध्ये व्हायची. हरितगृहामध्ये तर देवरामने काम केलेले. त्याचा सल्ला घेतला. देवरामने नंदकुमारच्या मनातील भीती कमी केली. त्यात काही बाबी सांभाळल्या तर फारसे अवघड नसल्याचे स्पष्ट केले. त्याच्याही मनात किती दिवस दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचे, हा विचार घोळत होताच. आर्थिक परिस्थितीही सारखीच असल्याने हरितगृहासाठी पैशाची उभारणी कशी करायची, याचा विचार सुरू झाला. दोघे बँकेत जाऊन शाखाधिकाऱ्यांना भेटले. आपल्या पॉलिहाउस शेतीचा मनोदय सांगितला. त्यासाठी कितीपर्यंत कर्ज मिळू शकेल, याविषयी विचारणा केली. शाखाधिकाऱ्यांनी जमिनीचे क्षेत्र, गट नंबर, किती क्षेत्रावर हरितगृहाची उभारणी करणार, कोणते पीक घेणार, पाण्याची सोय, शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता याबाबतची विचारपूस केली. ते म्हणाले, ‘‘आपल्या शाखेमध्ये सोमवारी कृषी अधिकारी येत असतात. त्या वेळी तुम्ही दोघेही या. आपण त्याच्यासोबत तुमच्या गावी जाऊन तुमचे क्षेत्र पाहू. तोपर्यंत बँकेचा कर्ज मागणी अर्ज देऊन ठेवतो. कर्जासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची यादीही देतो. हा अर्ज तुम्ही भरून ठेवा. कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात करा.’’

शाखाधिकाऱ्यांच्या बोलण्याची पद्धत आणि दिलेल्या सल्ल्यामुळे देवराम आणि नंदकुमार दोघेही बऱ्यापैकी आश्वस्त झाले. त्यांनी आपला मोर्चा कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे वळवला. दिलेल्या यादीप्रमाणे खातेउतारा, सात बाराचे उतारे, फेरफार उतारे जमा केले. देवरामला त्याच्या पॉलिहाउस कंपनीकडून कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र मिळू शकत होते. मात्र, नंदकुमारला मात्र पॉलिहाउस विषयक प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. कारण, आपण ज्या वेळी इतकी मोठी गुंतवणूक एखाद्या क्षेत्रामध्ये करतो, त्या वेळी त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. नंदकुमारला तळेगाव येथील हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटरविषयी व पाच दिवसांच्या प्रशिक्षणाविषयी कळले. प्रशिक्षण कधी सुरू होते, फी किती अशी माहिती त्याने घेतली.

हरित गृह उभारणी करणाऱ्या परिसरातील तीन कंपन्या, ठिबक संच वितरक व डच गुलाबाची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांना भेट देत कोटेशन घेतले. रोपांसाठी किती दिवस आधी नोंदणी करावी लागते, याची माहिती घेतली. पाणी टाकी बांधकामाचेही कोटेशन घेतले. दोघांनीही आपल्या शेतातील माती व पाणी यांचे नमुने घेऊन परीक्षणासाठी पाठवले. अशा अनेक कामांत त्यांचा आठवडा संपूण सोमवार उगवला. ठरल्याप्रमाणे बँकेचे शाखाधिकारी व कृषी अधिकारी यांनी देवराम व नंदकुमार यांच्या शेताची पाहणी केली. पाण्याची उपलब्धता जाणून घेतली. नंदकुमार त्याबाबत सांगितले, ‘‘या भागात पावसाळ्यात खूप पाऊस असला तरी उन्हाळ्यात पूर्वी पाण्याचा हाल होत असत. जास्त पावसामुळे मुख्य पीक भाताचे घेतो. त्यानंतर पाण्याची अडचण भासत असे. अलीकडे पाझर तलाव झाल्यामुळे बऱ्यापैकी वर्षभर पाणी पुरते. थोड्याफार प्रमाणात भाजीपालाही आम्ही करत आहोत. आमची जमीन लाल मातीची असून, गुलाब लागवडीस योग्य आहे. तरीही माती व पाणी तपासण्यासाठी पाठवले आहे. फुलांची लागवड ते काढणी पर्यंतच्या कामाची या देवरामला चांगली माहिती आहे. मी पण प्रशिक्षण घेणार आहे.’’ त्या दोघांच्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यामुळे शाखाधिकारी व कृषी अधिकारी दोघांनाही समाधान वाटल्याचे दिसले. 

देवरामने पुढे संगितले की ,"कृषी विभागाकडेही पॉलीहाऊससाठी संपर्क केला आहे. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने एलओवाय (लेटर ऑफ इंडेट) साठी अर्ज केला आहे. आता ते ऑनलाइन झाल्यामुळे काम सोपे झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.’’ बॅंकेच्या कृषी अधिकाऱ्यांनी सर्व ऐकून घेतले तरी कोणतेही मत प्रदर्शन केले नव्हते. ते शांतपणे एकेका तांत्रिक बाबींची पडताळणी करत होते. खरोखरच वर्षभर पाणी पुरणार का, ही त्यांच्या मनामध्ये मोठी शंका होती. शेवटी त्यांनी ती बोलून दाखवली. यांचे अजून समाधान झालेले दिसले नाही. नंदकुमार व देवराम या दोघांनी मग सविस्तर माहिती दिली. त्यावर सध्या तरी आमच्या दोघांच्या बोअरला चांगले पाणी असल्याचे त्यांनी दाखवले. गेले दोन वर्षे अगदी उन्हाळ्यापर्यंत भाज्या बाजारसमितीमध्ये विकल्याचा पावत्या दोघांनी दाखवल्या. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांचे समाधान झाले. ते म्हणाले, ‘‘बाकी सारे खरे असले हरितगृह यशस्वी व्हायचे असले तर वर्षभर पाणी पुरले पाहिजे. उन्हाळ्यांमध्ये पाण्याची गरज आणखी वाढते. त्यामुळे अधिक चिंता असते. नीट खात्री करा, मगच धाडस करा.’’ कृषी अधिकाऱ्यांच्या थोडे अधिक स्पष्ट बोलण्यामुळे नंदकुमारच्या चिंता वाढल्या. मात्र, देवरामने नंदकुमार आणि कृषी अधिकारी दोघांनाही आश्वस्त केले. ‘‘पाण्याची काळजी करण्याची कारण नाही. कारण आमच्या पासून केवळ तीन कि. मी. अंतरावर नदी आहे, तिथून पाणी आणण्यासाठी काही दिवसापूर्वीच आमच्या गावात मिटिंग झाली आहे. सगळेजण सहमत आहेत. त्याचे कामही लगेच सुरू होईल.’’

या बोलण्याने मात्र शाखाधिकारी व कृषी अधिकारी दोघाचं समाधान झाले. त्यांनी उलट देवरामला त्या उपसा सिंचन प्रकल्पालाही आपल्या बॅंकेकडून सामूहिक तत्त्वावर अर्थसाह्य मिळू शकेल, असे सुचवले. जाता जाता त्यांनी गावातील सरपंचाची भेटही घेतली. महत्त्वाच्या बाबी...

  • स्थिर भांडवलामध्ये हरितगृह, ठिबक सिंचन, पूर्व मशागत, मातीचे गादीवाफे बनवणे यासोबतच रोपांची खरेदी, लागवड आणि व खऱ्या अर्थाने फुलांचे उत्पादन सुरू होईपर्यंत पिकांच्या देखभालीचा सर्व खर्च धरला जातो.
  • आपल्या विभागातील हरितगृह व ठिबक सिंचन यांच्या अनुदानाविषयीच्या नेमक्या योजना, मंजुरी याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घ्यावी.
  • हे कर्ज मुदत कर्ज स्वरूपाचे असून, त्याची परतफेड ७ वर्षांमध्ये करावी लागते.
  • त्या सात वर्षामध्ये पहिल्या वर्षी हप्ता नाही, फक्त व्याज भरावे लागते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com