डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूक

डाळिंब फळपिकांची काढणी, प्रतवारी व साठवणूक याबाबत योग्य ती काळजी घेतल्यास बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत होते.
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूक
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूक

महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक महत्त्वाचे नगदी पीक बनलेले आहे. सध्या सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांमध्ये डाळिंब काढणीला सुरवात झाली आहे. डाळिंब फळपिकांची काढणी, प्रतवारी व साठवणूक याबाबत योग्य ती काळजी घेतल्यास बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत होते. कोणत्याही फळांच्या काढणी करतेवेळी योग्य पक्वता ओळखणे आवश्यक असते. डाळिंब फळांच्या पक्वतेची लक्षणे जाणून घेऊ. अशी ओळखा फळांची पक्वता :

  • फळ धारणेपासून फळ तयार होण्यास जातीपरत्वे १३५ ते १७० दिवस लागतात.
  • पक्व फळांच्या शेंड्यांकडील पाकळ्या कडक होऊन पूर्णपणे वाळतात.
  • उन्हाळ्यात फळांच्या सालीचा रंग पक्वतेच्या वेळी गर्द पिवळा होतो, तर पावसाळ्यात तो गर्द तांबडा होतो.
  • पक्वतेच्या वेळी फळांच्या गोलसरपणा कमी होऊन फळांच्या बाजूंवर चपटेपणा येतो.
  • पक्व झालेल्या फळांची साल नखाने टोकण्याइतकी मऊ होते.
  • पक्व झालेल्या फळांच्या दाण्यांचा रंग गडद तांबडा होतो. फळ मऊ, लुसलुशीत व चवीला गोड असते.
  • अनुभवाने ही लक्षणे अधिक वेगाने तपासणे शक्य होते. त्यामुळे अनुभवी शेतकरी किंवा मजूर वेगाने पक्व फळांची काढणी करू शकतात.
  • फळांची प्रतवारी : डाळिंब फळांच्या प्रतवारीचे प्रकार :- सुपर साईज : आकर्षक लालभडक रंगाची आकाराने सर्वात मोठी आणि वजनाने ७५० ग्रॅम पेक्षा जास्त असलेली व डाग नसलेली फळे या प्रकारात येतात. किंग साईज : डाग नसलेली, आकर्षक रंगाची, मोठी व वजनास ५०० ते ७५० ग्रॅमपर्यत असलेली फळे या प्रकारात मोडतात. क्वीन साईज : यामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम पर्यत वजनाची मोठी आकर्षक रंगाची, डाग नसलेली फळे निवडली जातात. प्रिन्स : या प्रतवारीची फळे डागविरहीत आकर्षक रंगाची, तसेच पक्व झालेली व ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंत वजनाची असतात. फळांचे पॅकिंग :

  • फळांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये पॅकिंगला महत्त्वाचे स्थान आहे. पॅकिंगमुळे टिकवणक्षमता वाढण्यासोबतच ब्रॅण्डींग होऊन चांगला दर मिळण्यास फायदा होऊ शकतो.
  • योग्य पॅकिंगमुळे फळांची वाहतूक करणे सुलभ जाते. वाहतुकीतील फळांचे नुकसान टाळता येते.
  • पॅकिंगमुळे फळांची हाताळणी योग्य प्रकारे करता येते.
  • -आकर्षक पॅकिंगमुळे ग्राहक आकर्षित होऊन फळांचा खप वाढण्यास मदत होते.
  • फळांच्या पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी पुठ्ठ्याचे (कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्स) वापरले जातात. पॅकिंगसाठी पेट्यांचा आकार फळांच्या प्रतीनुसार घ्यावा.
  • सुपर साईज व किंग साईज फळासाठी : ३२.५ सेंमी. (१३ इंच) लांब, २२.५ सेंमी.(९ इंच) रुंद आणि १० सेंमी. रुंद अशा पेट्या वापराव्यात.
  • क्वीन साईज फळासाठी : ३७.५ सेंमी. लांब, २७.५ सेंमी. आणि १० सेंमी. उंचीच्या पेट्यांचा वापर करावा.
  • बारा ए व बारा बी आकाराच्या फळासाठी : ३५ सेंमी. (१४ इंच) लांब, २५ सेंमी. (१० इंच) रुंद आणि १० सेंमी. (४ इंच) उंचीच्या पेट्या वापराव्यात.
  • एका पेटीत सुपर साईजची चार किंवा पाच फळे, किंग साईजची सहा फळे, क्वीन साईजची नऊ फळे तर प्रिन्स साईज व बारा ए व बारा बी या प्रतीची बारा फळे भरली जाऊ शकतात.
  • पेटीमध्ये फळे भरताना : पेट्यांची निवड व फळांची प्रतवारी झाल्यानंतर पेट्या भरताना प्रथम पेटीच्या तळाशी कागदाचे तुकडे ठेवावेत. त्यावर प्रतवारी केलेली फळे ठेवावीत. त्यानंतर त्यावर लाल रंगाचा आकर्षक कागद लावून ती झाकावीत. पेटी बंद केल्यावर पुन्हा चिकटपट्टीने पेट्या चिटकवून घ्याव्यात. अशा तऱ्हेने भरलेल्या १०-१२ पेट्या एकावर एक रचून यांचा एक गठ्ठा तयार करावा. यालाच ‘पॅलेट्स’ असे म्हणतात. या पॅलेटायझेशन क्रियेमुळे वाहतुकीदरम्यान फळपेट्या व्यवस्थित हाताळल्या जातात. फळपेट्या वरून फेकणे किंवा निष्काळजीपणे हाताळणे असे प्रकार टाळले जाऊ शकतात. फळांची साठवण व वाहतूक : शीतगृहात ८ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० टक्के आर्द्रता ठेवावी. या वातावरणामध्ये फळे ३ महिन्यापर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. शीतकक्षातील तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस आणि ८० टक्के आर्द्रता ठेवली असता फळे ४८ दिवस उत्तम तऱ्हेने साठवता येतात. फळांची काढणी झाल्यांनतर फळे लवकरात लवकर बाजारात पाठविणे जरुरीचे असते. फळांची वाहतूक वातानुकूलित व शीतगृहाची सोय असणाऱ्या ट्रक व रेल्वे वॅगन्समधून केल्यास नुकसान टाळता येते. निलेश फुटाणे, ७८८५५४४४५८ (काढणी पश्चात व्यवस्थापन विभाग, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com