कासारवेली लक्ष्मीनारायणवाडीत शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीचा फंडा

कासारवेली लक्ष्मीनारायणवाडीत शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीचा फंडा
कासारवेली लक्ष्मीनारायणवाडीत शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीचा फंडा

वाडीतील प्रत्येकाला समान पाणी, किमान पट्टी आणि महिन्याला १०० टक्के पाणीपट्टी वसुली हे खरंच शक्य आहे? होय, २००८ पासून रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली लक्ष्मीनारायणवाडीतील नळपाणी योजना १२ वर्षांपासून याच वैशिष्ट्यांसह यशस्वीपणे चालवली जात आहे. यातून महिन्याला होणारा खर्चही वाचला आहे. राज्यातील विविध गावागावांत राबविलेल्या पाणी योजना वेळेत पट्टी भरली जात नसल्याने अडचणीत आल्या आहेत. काही योजना बंद पडल्या असून काहींची थकबाकी वाढली आहे. बिल भरणा न केल्याने वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीला करावी लागत आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कासारवेली-लक्ष्मीनारायणवाडीतील ग्रामस्थांनी बारा वर्षांपूर्वीच २००८ मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खबरदारीही घेतली आहे. पन्नास कुटुंबे असलेल्या या वाडीला भारत निर्माण योजनेतून नळपाणी योजनेसाठी सव्वासहा लाख रुपये निधी मंजूर झाला. विहीर, पंप, पाइपलाइन आणि प्रत्येक कुटुंबाजवळ स्टॅण्डपोस्ट यावर पाच लाख रुपयांचा निधी खर्च झाला. गावात एक किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ४९ फूट खोल विहीर उभारली आहे. त्याला बारमाही पाणी असल्यामुळे टंचाईची तीव्र समस्या जाणवत नाही. एप्रिल, मे या दोन महिन्यात उन्हाळ्याच्या काळातही लक्ष्मीनारायणवाडीला माफत पाणी मिळते. साडेसात हायपॉवरचा पंप बसवण्यात आल्यामुळे मिनिटाला सहाशे लिटर पाणी खेचले जाते. अर्ध्या तासात सुमारे अठरा हजार लिटर पाणी नळाला येते. त्याचबरोबर वाडीमध्ये २० हजार लिटरची पाणी साठवण टाकी उभारण्यात आली असून वेळ पडल्यास त्यातील पाण्याचा उपयोग केला जातो.

समान पाणी प्रत्येक कुटुंबाला समान पाणी मिळावे यासाठी घराजवळ स्टॅण्डपोस्टला रेग्युलेटर बसविण्यात आला आहे. आतमध्ये फिल्टर बसविण्यात आला असून गाळलेले पाणी विशिष्ट प्रेशरने पुढे येईल एवढी काळजी घेतली आहे. त्यातून मिनिटाला दहा लिटर पाणी ग्राहकाला जाते. सकाळी ६.३० ते सात वाजेपर्यंतच्या कालावधीत अर्धा तास पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येकाला तीनशे लिटर पाणी दिले जाते. पंप बंद आणि सुरू करण्यासाठी कर्मचारी नेमलेले नाहीत. ती यंत्रणा ऑटोवर ठेवली असून वेळ सेट केलेली आहे.

पट्टी जमा करण्याची संकल्पना वाडीतील पन्नास कुटुंबांची नोंदवही तयार केली आहे. पैसे जमा करण्यासाठी एक लाकडी पेटी तयार केली आहे. ती पेटी दर महिन्याला एका कुटुंबाकडे ठेवली जाते. उर्वरित कुटुंबांनी त्या महिन्यात १० तारखेपर्यंत प्रत्येकी ४० रुपये पाकिटात भरून पेटीत टाकायचे. दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक दिवस लागले तर दंडाची तरतूद केली आहे. परगावी असलेल्या कुटुंबातील ग्रामस्थ सहा महिन्यांची किंवा वर्षाची पट्टी एकदम भरून ठेवतात. जमा झालेल्या रकमेतून वीजबिलाची रक्कम पेटी असलेल्या कुटुंबातील ग्रामस्थाने भरणा करावयाची. महिन्याला दोन हजार रुपये जमा होतात. महिन्याला येणारी बिलाची रक्कम भरून उर्वरित पैसे पोस्टाच्या खात्यात भरावयाचे. सरासरी १४०० रुपये वीजबिल येते. सहाशे रुपयांची महिन्याला बचत होते. पोस्टात पाणी तपासणी कमिटीमधील सदस्यांच्या नावे बचत खाते काढण्यात आले आहे. या समितीमध्येही तीन महिला सदस्य आहेत. त्यांच्याकडेच नियोजनाची जबाबदारी दिली आहे. लग्न, साखरपुडा किंवा कार्य असेल तर वीस मिनिटे जादा पाणी दिले जाते; परंतु त्यापोटी शंभर रुपये घेतले जातात. त्या रकमेचीही नोंद दिलेल्या वहीत केली जाते. महागाईमुळे पाणीपट्टीत गेल्या वर्षी दहा रुपयांनी वाढ केली आहे.

वेळ आणि खर्चाची होते बचत पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती करणे, पट्टी जमा करणे, वीजबिल भरणा करणे यासाठी गावात कर्मचारी नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे महिन्याचे किमान तीन हजार रुपये या प्रमाणे २४ हजार रुपयांची बचत करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

‘‘गावात एकी असल्यामुळे पाणी योजनेची पट्टी जमा करणे किंवा पाण्याचे नियोजन करणे यात अडथळे येत नाहीत. महिलांना प्राधान्य देतानाच पाणी तपासणी कमिटीवर त्यांनाच नेमण्यात आले आहे.’’ - विद्याधर वामन दाते, ज्येष्ठ ग्रामस्थ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com