सहा लाख महिला बनल्या ‘बॅंक साक्षर’ !

सहा लाख महिला बनल्या ‘बॅंक साक्षर’ !
सहा लाख महिला बनल्या ‘बॅंक साक्षर’ !

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गेल्या एकोणीस वर्षांच्या कालावधीत तब्बल सहा लाख महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणले. त्यांना आर्थिक प्रगतिचा मार्ग दाखविला नसून त्यांना बँक साक्षरही केले आहे. बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांना प्रगतीची कवाडे खुली केली. २००० पासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्यासाठी गटांची स्थापना केली. बॅंकेच्या विविध शाखांच्या माध्यमातून महिलांना एकत्रीत केले. यासाठी जिल्हा बॅंकेत महिला विकास कक्षच स्थापन करण्यात आला. सुरुवातीला केवळ चौदा गट स्थापन करून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मार्च २०१९ अखेर बॅंकेकडे तब्बल ४ हजार ८५१ गटांची नोंदणी करण्यात आली आणि त्यापैकी ३२ हजार ३२९ गटांना १११७०.३४ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. या रकमेतून महिलांना विविध व्यवसायाच्या दृष्टीने पाठबळ देण्याचे काम झाले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश अशिक्षित महिलांना एकत्र करून त्यांना बॅंकिंग साक्षर करण्याचे मोठे काम या माध्यमातून करण्यात आले. केवळ बॅंकिंगचे व्यवहारच न करता त्यांना घरगुती स्वरुपात उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. त्यांना व्यावसायिक स्तरावर सक्षम करण्यासाठी तातडीचे प्रयत्न झाले. त्यांना प्रेरणा म्हणून केंद्र कार्यालयात २०१० पासून कायमस्वरुपी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मध्ये विविध पदार्थांची विक्री व सेवा सुरू आहे.

संयुक्त देयता समूह(जेएलसी)अंतर्गत लघुव्यवसाय करणाऱ्या महिलांना २०१२ पासून कर्जपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मार्च २०१९ अखेर असा व्यवसाय करणारे ३०८८ गट स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी ३०३० गटांना २२९४.३० लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.

मार्केटिंगसाठी प्रयत्न राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) यांच्या वतीने दरवर्षी बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन भरविले जाते. गेल्या वर्षी पहिल्यांदाच कोल्हापुरात राज्यस्तरीय प्रदर्शन झाले. प्रदर्शनच्या माध्यमातून बचत गटांच्या पदार्थाची चांगली विक्री होत असल्याने बॅंकेच्या वतीने प्रत्येक तालुका पातळीवर जिल्हा स्तरीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम घेण्यात येतात. तालुक्‍यातील महत्त्वाच्या शहरात प्रदर्शने भरवून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. जास्तीत गास्त ग्राहकांनी या वस्तू खरेदी कराव्यात यासाठी बॅंकेच्या वतीने या प्रदर्शनांची प्रसिद्धी केली जाते.

मुंबईत बचत गटांच्या महिलांचा डंका नाबार्डच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हॉटेल ताज येथे गोधडी तयार करणारा रिद्धसिद्धी महिला बचत गट व कोल्हापुरी चप्पल बनविणारा वीरशैव ककय्या महिला बचत गटाने बॅंकेचे प्रतिनिधित्व केले. या गटाचे सादरीकरण केले. नाबार्डने चांगले काम करणाऱ्या बॅंकेच्या गटांची डाक्‍युमेंट्री तयार केली आहे. बॅंकेच्या अनेक बचत गटांची पहाणी राज्यस्तरावरून करण्यात आली आहे. विविध शेती व्यवसायाबरोबरच खत विक्री केंद्र, स्वस्त धान्य दुकान, रॉकेल विक्री केंद्र, महिला दूध संस्था, शेवया मशीन, चप्पल, आकाश कंदील, वाद्ये तयार करणे, गोधडी, पर्स पिशव्या, सर्व प्रकारचे तयार पिठे, मसाले, सौंदर्यप्रसाधने, गारमेंट उद्योग आदिसहीत अनेक व्यवसाय महिलांनी आपापल्या भागात उभारले.

बॅंकेकडून बचत गटांकरिता राबविण्यात येणारे उपक्रम

  • लघुउद्योजकता शिबिर
  • कपॅसिटी बिल्डींग योजनेअंतर्गत कार्यशाळा
  • उत्पादित मालाचे प्रदर्शन
  • खेळत्या भांडवलासाठी कर्ज पूरवठा
  • नाबार्डच्या अनेक उपक्रमात सहभाग
  • सदस्यांची खाती झिरो बॅलन्सवर उघडून देणे
  • आतापर्यंत ३५४५० महिलांची खाती उघडण्यात आली
  • जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आम्हाला आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली. खरं तर गटाने आम्हाला मोठा आत्मविश्‍वास दिला. या आधारेच आमच्या बचत गटांच्या सर्व महिलांना दुग्ध व्यवसायाबरोबरन अन्य शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे. ज्या महिलांच्या संसारात चहा मध्ये घालण्यासाठी दूध नव्हते. त्या महिलांनी पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करून संसाराला स्थिरता मिळविली आहे. - गीता पाटील, - अध्यक्ष जयलक्ष्मी बचत गट शेळेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ...

    जिल्हा बॅंकेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक लहान मोठ्या खेड्यात हजारो महिलांनी अनेक शेतीपूरक उद्योग सुरू केला. यातून रोजगार निर्माण झाला. महिलांना बॅंकेचे व्यवहार ही कळू लागले. अनेक महिलांनी बॅंकेला अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. - स्नेहल करंडे, महिला विकास अधिकारी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक, कोल्हापूर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com